माजी राज्यमंत्री देशमुखांनी घेतली खासदार सावंतांची भेट, लवकरच शिवसेनेत एन्ट्री ?

संजय देशमुख यांनी रविवारी अकोल्यात शिवसैनिकांच्या (Shivsena) मेळाव्याकरिता आलेले शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची गुप्त भेट घेतली.
MLA Nitin Deshmukh, Sanjay Deshmukh and MP Arvind Sawant.
MLA Nitin Deshmukh, Sanjay Deshmukh and MP Arvind Sawant.Sarkarnama

ऋषिकेश हिरास

दिग्रस (जि. यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी रविवारी अकोल्यात शिवसैनिकांच्या मेळाव्याकरिता आलेले शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांची गुप्त भेट घेतली. या भेटीमुळे माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेनेत एन्ट्री करणार असल्याची चर्चा सध्या यवतमाळ जिल्ह्यात सुरू झाली आहे.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचं राजकारण १९९९ पासून कायम दोन ‘संजय’ भोवती फिरत आहे. यातील एक 'संजय' म्हणजे संजय राठोड. (Sanjay Rathod) तर दुसरे संजय देशमुख. दोघांचीही कारकिर्द सुरू झाली शिवसेनेतून. दोघंही कधीकाळचे कट्टर मित्र होते मात्र, आता एकदम कट्टर राजकीय शत्रू आहेत. दिग्रसचे आमदार असलेले संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करीत शिवसेनेशी (Shivsena) बंडखोरी केली. त्यामुळे संजय राठोडांचं बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) फारच जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. यातूनच संजय राठोडांना राजकीय धडा शिकविण्यासाठी सेना नेतृत्वानं आता पावलं टाकायला सुरूवात केली आहे. यातील सेनेचा पहिला मोहरा हे संजय देशमुख असण्याची शक्यता आहे. यातूनच उद्धव ठाकरेंनी आता थेट संजय देशमुखांना शिवसेनेत घेत संजय राठोडांना धडा शिकवण्याची रणनिती आखली आहे.

अकोला येथे खासदार अरविंद सावंत यांच्यासोबत भेट घेण्यापूर्वी मुंबईला त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रविवारी झालेल्या भेटीदरम्यान खासदार अरविंद सावंतांसोबत प्रवेशासंदर्भातील अंतिम बोलणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीच्या वेळी बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय मालोकार, अकोल्याचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर उपस्थित होते. त्यामुळे आता लवकरच संजय देशमुख मातोश्रीवर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय देशमुखांनी १९९९ ते २००९ असं तब्बल १० वर्ष दिग्रस मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, २००९ मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर संजय देशमुख मतदारसंघाच्या राजकारणात काहीसे बॅकफूट वर आल्याचं चित्र होतं. मात्र, दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत ७५ हजार मते घेतली होती. संजय देशमुखांच्या याच ताकदीला आता बळ देण्याचा विचार सेना नेतृत्वाने केला आहे. यासंदर्भात संजय देशमुखांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार अरविंद सावंतांशी प्रवेशासंदर्भात चर्चा झाली आहे. आता लवकरच संजय देशमुख मातोश्रीवर शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

MLA Nitin Deshmukh, Sanjay Deshmukh and MP Arvind Sawant.
मंत्री संजय राठोड म्हणाले, तीन चाकांचे सरकार नीट चालत नव्हते, म्हणून...

संजय देशमुखांचा राजकीय प्रवास..

संजय देशमुखांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. सन १९९८ मध्ये त्यांचा दिग्रस तालुक्यातील सिंगद-मांडवा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर पराभव झाला. पुढे सन १९९९ मध्ये ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख झाले. मात्र, विधानसभेचं तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उभे राहत बंडखोरी केली, अन् चमत्कार घडवत फक्त १२५ मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव केला. यावेळी विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे मंत्रीमंडळात क्रीडा खात्याचे राज्यमंत्री बनले. २००४ मध्येही ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आले. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पुनर्रचित दिग्रसमधून निवडणूक लढविली होती मात्र, संजय राठोडांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

२०१९ च्या लोकसभेपुर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. मात्र, भाजपा-सेनेच्या युतीमूळे तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोडांविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी करीत तब्बल ७५ हजार मतं घेतली. दरम्यान, दिग्रसचे माजी आमदार राहिलेल्या संजय देशमुख यांना सेनेत घेत शिंदे गटात गेलेल्या दिग्रसचे आमदार संजय राठोडांना शह देण्याचा प्रयत्न सेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. संजय देशमुखांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे. देशमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला तर यवतमाळ जिल्ह्यात त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com