गडकरींच्या कार्यक्रमातील उपस्थितीनंतर भाजपच्या माजी आमदाराने दिला राजीनामा…

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकार्पण सोहळ्यामध्ये बाळा काशीवार यांनी उपस्थिती दर्शविली होती. मात्र काल अचानक प्रदेश कार्यकारिणीचा राजीनामा दिला.
गडकरींच्या कार्यक्रमातील उपस्थितीनंतर भाजपच्या माजी आमदाराने दिला राजीनामा…
Nitin Gadkari

भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षातील गटबाजी यापूर्वीही पुढे आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमधून त्याचा प्रत्यय आला. आता भाजपचे साकोली-लाखनी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश ऊर्फ बाळा काशीवार यांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

विशेष म्हणजे रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) जिल्ह्यात होते. त्यांच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळा काशीवार उपस्थित होते. पण त्यानंतर काय झाले कुणास ठाऊक, त्यांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पाठविला आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील भाजपची परिस्थिती ठीक नाहीये. त्यामुळे संघटनात्मक कार्य करण्यात असमर्थ आहे, असे त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे.

नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकार्पण सोहळ्यामध्ये बाळा काशीवार यांनी उपस्थिती दर्शविली होती. मात्र काल अचानक प्रदेश कार्यकारिणीचा राजीनामा दिल्याने जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान त्यांनी भंडारा भाजप मध्ये सुरू असलेल्या संघटनात्मक कार्य प्रणालीवर ताशेरे ओढले असून सध्याच्या कार्यकारिणी सोबत काम करण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे. दरम्यान त्यांनी आपण मोदीजी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सिद्धांताला मानणारे असल्यामुळे आपण सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप पक्षातील आपसी वाद चव्हाट्यावर आला आहे.

Nitin Gadkari
नितीन गडकरी `ते` तापदायक ११० स्पीड ब्रेकर हटवतील का?

भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचेदेखील जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बिनसले होते. जिल्ह्यात काम करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनी मला संपवण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी आपली वेगळी चूल मांडली होती. नुकत्याच पार पडलेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी हातमिळवणी केली. तेसुद्धा भाजपच्या बाहेर पडलेलेच आहेत. त्यांचा विषय धरमपेठ बंगल्यावर देखील पोहोचला होता. त्यानंतर काही काळ शांतता होती. पण ती शांतता वादळापूर्वीचीच ठरली.

आता बाळा काशीवार यांच्या रूपाने जिल्हा भाजपमधील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांना आता याबाबतीत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील भाजप नेते एक-एक करून पक्ष सोडून गेले, तर भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे. आज बाळा काशीवार यांनी राजीनामा देऊन पक्षातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आणली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in