
Nagpur Political News : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे झंझावाती दौरे सुरू आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार कसे लोकाभिमुख कार्य करीत आहे, याचा जोरदार प्रचार-प्रसार तीनही नेते करीत आहेत. (The BJP-Shiv Sena (Shinde group) coalition government is working for the people)
नागपुरातील वाठोडा भागात आज (ता. ११) रोजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मन जिंकणाऱ्या आमदाराची फडणवीस यांनी तोंडभरून स्तुती केली. देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेते आपला वाढदिवस साजरा करू देत नाहीत. त्यामुळे आरोग्य शिबिर, विविध लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमांतून चाहते नेत्यांचा वाढदिवस साजरा करतात.
नागपुरातील (Nagpur) भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी अशीच शक्कल लढविली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खोपडे यांनी एक-दोन नव्हे तर आपल्या मतदारसंघात तब्बल सात विविध शिबिरांचे आयोजन केले. त्यातून सुमारे ३५ ते ४० हजार नागरिकांना लाभ देण्यात आला.
आज वाठोड्यात अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला आमदार मोहन मते, आमदार टेकचंद सावरकर आदी उपस्थित होते. आपल्या भाषणात आमदार खोपडे यांनी फडणवीसांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या शिबिरांचे आयोजन करीत असल्याचे स्पष्टच सांगितले. भाजपचा (BJP) गड असलेल्या नागपुरात यशस्वी झालेल्या या आयोजनामुळे खूष झालेल्या फडणवीस यांनी मग आमदार खोपडे यांचे आपल्या भाषणातून तोंडभरून कौतुक केले.
फडणवीस उदाहरणादाखल म्हणाले की, आमदार खोपडे यांची ‘कन्व्हिंसिंग पॉवर’ इतकी आहे की, त्यांनी ठरविले की नागपुरात समुद्र आणायाचा तर ते जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडून कामे करवून घेऊ शकतात. खोपडे यांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामांची यादी देत फडणवीस यांनी पूर्व नागपुरात भविष्यात आणखी उड्डाणपूल, अंडरपास, सिमेंटचे रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या विकासाची ग्वाहीच जाहीरपणे या वेळी दिली.
राज्यासह केंद्रातही बऱ्यापैकी वजन असणारा नेता म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. अशात खुद्द त्यांनीच जाहीरपणे तोंडभरून कौतुक केल्याने आमदार खोपडेंबद्दल नागपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.