फडणवीस वारंवार खोटे बोलून ते खरे करून दाखवण्याचा प्रयत्न करतात…

इडी, आयटी यांसारख्या स्वायत्त संस्थांचा केंद्राकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जातोय. त्यावर आमदार रोहित पवारांनी MLA Rohit Pawar जोरदार हल्ला चढवला.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama

पुसद (जि. यवतमाळ) : देवेंद्र फडणवीस वारंवार खोटे बोलून खरे करून दाखविण्याचा प्रयत्न करतात. जे वास्तव घडले, ते शरद पवार साहेबांनी सांगितले. त्यामुळे फडणवीसांच्या टिकेला उत्तर देणे त्यांना आवश्यक वाटले असावे. विरोधी पक्ष भाजपची हीच नीती आहे, अशी घणाघाती टिका जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी फडणवीसांवर केली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी महत्त्वाकांक्षी होते, अशी टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्रपरिषदेतून उत्तर का द्यावे लागले, याबाबतीत ते येथे पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकार जनतेच्या भल्यासाठी चांगले प्रयत्न करीत असताना ते लोकांपर्यंत पोहोचविण्यास आम्ही कमी पडतो, अशी कबुलीही त्यांनी दिली. इडी, आयटी यांसारख्या स्वायत्त संस्थांचा केंद्राकडून राजकीय हत्यार म्हणून वापर केला जातोय. त्यावरही आमदार पवारांनी जोरदार हल्ला चढवला.

सध्या महाराष्ट्रात ईडी, आयटी, एनसीबी यांसारख्या स्वायत्त संस्थांचा केंद्र सरकार राजकीय हत्यार म्हणून वापर करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्धही हा प्रयोग करण्यात आला. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी व लोकांच्या मनावर खोट्या गोष्टी बिंबविण्यासाठी हा प्रयोग होत असेल तर उद्या या स्वायत्त संस्थांवर कोण विश्वास ठेवणार? हे राजकीय हत्यार वापरून लोकांपुढे चुकीचे पर्सेप्शन तयार करण्याची भाजपची ही खेळी आहे, अशी खरमरीत टीका आमदार रोहित पवार यांनी आज केली.

आमदार रोहित पवार यांच्या पुसद भेटीत नाईक बंगल्यावर संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री मनोहर नाईक, आमदार इंद्रनील नाईक, नगराध्यक्ष अनिता नाईक, ययाती नाईक उपस्थित होते. ते म्हणाले की, स्वायत्त संस्थांची पहिली माहिती भाजपचे किरीट सोमय्या यांना कशी मिळते? या संस्था धाडी टाकतात. नंतर मात्र त्यात काहीही सापडत नाही. परंतु भाजपा अशारीतीने प्रपोगंडा करते की लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. बिहार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चित्रपट अभिनेता सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी असाच संभ्रम निर्माण करण्यात आला. चित्रपट अभिनेता शाहरूख खानच्या मुलावरिल एनसीबी धाड प्रकरणातही लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हीच नीती वापरण्यात आल्याची चर्चा आहे.

गडचिरोली, चंद्रपूरात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ, खा.सुप्रिया सुळे दौऱ्यावर आहेत. आपलेही आगमन विदर्भात झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील प्रसार वाढविण्यासाठी कार्यक्रम आखला आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, लगतच्या मराठवाड्यातून माझे मित्र आमदार इंद्रनील नाईक व ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांच्या भेटीसाठी आपण पुसदला आलो आहे. मंत्री भुजबळ त्यांच्या बैठकीच्या निमित्त आले असतील. एक मात्र खरे की, महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा त्या त्या भागात गेल्याशिवाय स्थानिक प्रश्न कळणार नाहीत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीतून पक्षवाढीसाठी हा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मराठा आरक्षणावर भाजपला बोलण्याचा हक्क नाही. हा संपूर्ण विषय केंद्राचा आहे. संसदेच्या अधिवेशनात एकाही भाजप खासदाराने हा प्रश्न मांडला नाही. संभाजी राजे यांनाही खासदार संजय राऊत यांच्या हस्तक्षेपानंतर बोलण्याची संधी देण्यात आली, असे आमदार रोहित पवार म्हणाले. भाजपवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे अर्थात राज्याचे हक्क केंद्राने काढून घेतले आहे. केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या 'फेडरलायझेशन अमेंडमेंट'ने हा हक्क काढण्याचा निर्णय घाईत पारित केल्यानंतर भाजप गप्प बसले व नंतर आरक्षणाची टिमकी बजावण्यासाठी पुढे आले. भाजपाची ही बेरकी चाल आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपा वेगवेगळ्या सभा घेत आहे. हा नुसता आपुलकीच्या देखाव्याचा फुगा आहे, अशी टीका करताना केंद्राने ओबीसीचा २०१४ ला संग्रहित झालेला एम्पिरिकल डाटा राज्याला का दिला नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. उत्तरप्रदेश, बिहारमध्ये ओबीसीचा स्ट्रॉंग होल्ड आहे. ओबीसीची टक्केवारी वाढू शकते व त्याद्वारे भाजपला धक्का बसू शकतो, अशी भीती असल्यानेच भाजपची तयारी नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले. सध्या तोडफोडीचे राजकारण वाढले असून या राजकीय गोंधळात विकासाचे प्रश्न मागे पडले आहेत, असे ते म्हणाले.

राज्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी केलेली मदत तुटपुंजी आहे का? यावर बोलताना आमदार रोहित पवार यांनी केंद्राच्या दुजाभावाची चिरफाड केली. नैसर्गिक संकटात केंद्राच्या एनडीआरएफ मदतीचा वाटा मोठा असतो. गेल्यावेळी गुजरातमध्ये वादळ होताच पंतप्रधानांनी दुसऱ्याच दिवशी दौरा करून एक हजार कोटीची मदत केली. मात्र, महाराष्ट्रात अतिवृष्टी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीला दोन महिने लागले. राज्यात ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे मोठे नुकसान झाले. केंद्राची मदत आली नाही. ही बाब पंतप्रधानांना ठाऊक नसेल तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्राकडे का मांडली नाही, असा सवाल त्यांनी केला. राज्याला जीएसटीचे ३५ हजार कोटी मिळाले नाही, पंधराव्या वित्त आयोगाचे केंद्राने पैसे दिले नाही, असेही त्यांनी सांगितले.

MLA Rohit Pawar
आरोग्य विभागाच्या परिक्षेतील सावळ्या गोंधळावर रोहित पवार संतापले

आधी आग्रह इंद्रनील नाईकांसाठी...

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये युवांचे स्थान कमी आहे, आपली वर्णी केव्हा लागणार, या प्रश्नाच्या उत्तरात आमदार रोहित पवार म्हणाले की, हे सरकार तयार करताना वेगळे समीकरण समोर होते. यावेळी अनुभवी लोकांना संधी देण्यात आली. पुढील वीस वर्षांचा विचार मोठे पवार साहेब करतात. पुढे मंत्रिमंडळात बदल झाल्यास आधी पुसदचे वारसा लाभलेले युवा आमदार इंद्रनील नाईक यांच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरणार, असे रोहित पवार म्हणाले. मुलांच्या हातांना काम व शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडविण्यासाठी मंत्री झाल्यास आपण प्रयत्न करू, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. पुसद मधील विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी आपण इंद्रनील नाईक यांच्यासोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com