भाजपचा गेमप्लॅन काय आहे? सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या पुन्हा हालचाली...

काल आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी वरील मागण्‍यांच्‍या अनुषंगाने उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्‍यांना निवेदन सादर केले.
Sudhir Mungantiwar and Devendra Fadanvis
Sudhir Mungantiwar and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : राज्‍यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीतील अध्‍यक्ष जनतेतून थेट निवडणुकीद्वारे निवडावे तसेच ग्राम पंचायतींचे सरपंच सुध्‍दा जनतेतून थेट निवडणुकीद्वारे निवडावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे केली. या दोन्‍ही मागण्‍या लोकहित जपणा-या असून त्‍या माध्यमातून नगरविकास व ग्रामविकासाला योग्‍य चालना मिळेल, असे सांगत लवकरच याबाबत योग्‍य निर्णय घेण्‍याचे आश्‍वासन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भाजप या मागणीसाठी आग्रही झाला असून लवकरच त्यावर निर्णय होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी आणि आपले जाळे स्थानिक स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपचा हा गेमप्लॅन तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. सरपंच असो की नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडल्यामुळे मतदारांची संख्या जास्त होते. स्थानिक प्रश्नांपेक्षा मग अशा मतदारांवर पक्षाचा आणि नेत्याचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते. त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कमळाच्या चिन्हावर या निवडणुका जिंकणे सोपे होईल, असे भाजपचे गणित आहे.

काल आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी वरील मागण्‍यांच्‍या अनुषंगाने उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेऊन त्‍यांना निवेदन सादर केले. महाराष्‍ट्र (Maharashtra) नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यातील विद्यमान तरतुदींनुसार नगरपरिषदेतील व नगरपंचायतीतील निवडून आलेल्‍या परिषद सदस्‍यांमधून अध्‍यक्ष निवडला जात आहे. नगरपरिषद व नगरपंचायतीच्या कामकाजामध्‍ये स्‍थैर्य प्राप्‍त होण्‍याकरिता लोकांमधून नगरपरिषद व नगरपंचायतीच्‍या अध्‍यक्ष पदाकरिता थेट निवडणूक घेणारी यंत्रणा पुन्‍हा अंगीकारणे आवश्‍यक आहे.

नगरपरिषद व नगरपंचायतीच्‍या परिणामकारक कामकाजासाठी आणि विकासासाठी अध्‍यक्षाचे पद सक्षम करण्‍याकरिता व निवडून आलेला अध्‍यक्ष हा आपल्‍या नगरातील लोकांना थेट जबाबदार असण्‍याकरिता अध्‍यक्ष थेट जनतेतून निवडून येणे आवश्‍यक आहे. नगरपरिषद व नगरपंचायतीच्‍या सुरळीत कामकाजाची सुनिश्चित करण्‍याच्‍या दृष्‍टीने तरतुदीमध्ये यथोचितरित्‍या फेरबदल करणे आवश्‍यक असल्‍याने महाराष्‍ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ यांमधील तरतुदीमध्ये सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्र. २६ नुसार योग्‍य त्‍या सुधारणा करण्‍याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, असे आमदार मुनगंटीवार या चर्चेदरम्‍यान म्‍हणाले.

महाराष्‍ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९च्‍या विद्यमान तरतुदीनुसार पंचायतीच्‍या निवडून दिलेल्‍या सदस्‍यांमधून सरपंचांची निवड केली जात आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढविणा-या उमेदवारास सदस्‍यांकडून बहुमत मिळणे आवश्‍यक आहे. त्‍याचबरोबर, सदस्‍यांच्‍या एकूण संख्‍येच्‍या एक तृतीयांशापेक्षा कमी नसतील इतक्‍या सदस्‍यांना अविश्‍वासाचा प्रस्‍ताव मांडता येत असल्‍यामुळे सदस्‍य वारंवार अविश्‍वासाचा ठराव मांडतात. त्‍यामुळे सरपंचाच्‍या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन पंचायतीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्‍यामध्‍ये व्‍यत्‍यय निर्माण होतो.

Sudhir Mungantiwar and Devendra Fadanvis
मुनगंटीवार थेटच बोलले, म्हणाले तुम्ही गेले नाही म्हणून उपमुख्यमंत्री झाले नाही जयंतराव..!

पंचायतीच्‍या कामकाजामध्ये स्‍थैर्य प्राप्‍त होण्‍याकरिता लोकांमधून ग्राम पंचायतीच्‍या सरपंच पदाकरिता थेट निवडणूक घेणारी यंत्रणा पुन्‍हा अंगीकारणे आवश्‍यक आहे. पंचायतीच्‍या परिणामकारक कामकाजासाठी आणि विकासासाठी सरपंचाचे पद सक्षम करण्‍याकरिता व निवडून दिलेला सरपंच हा आपल्‍या गावातील लोकांना थेट जबाबदार असण्‍याकरिता सरपंच थेट जनतेतून निवडून येणे आवश्‍यक आहे. सबब, महाराष्‍ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ यांमधील तरतुदीमध्ये सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्र. ५६ नुसार योग्‍य त्‍या सुधारणा करण्‍याबाबत संबंधितांना निर्देश देण्‍यात यावे, असे देखील आमदार मुनगंटीवार या चर्चेदरम्‍यान म्‍हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in