उद्या जरी निवडणुका झाल्या, तरी भाजपाचा विजय बहुमताने निश्चित...

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले. मात्र, मंत्री आपसात वाद करीत असल्याने राज्याचे नुकसान होत असल्याचा आरोप आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
उद्या जरी निवडणुका झाल्या, तरी भाजपाचा विजय बहुमताने निश्चित...
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणुकांचे चित्र स्पष्ट होईल. पण अगदी उद्या जरी निवडणुका झाल्या, तरी भारतीय जनता पार्टी बहुमताने जिंकून येईल. त्यासाठी कुणाशीही युती करण्याची गरज नाही. भाजपच राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येणार असल्याचा विश्वास माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) ओबोसी आरक्षणाच्या बाबतीत वेळकाढूपणा केला. त्यामुळे राज्यातील निवडणुका लांबणीवर पडल्याचे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. ते यवतमाळ येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. येत्या २५ एप्रिलला ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होणार आहे. जर न्यायालयाने वेळ वाढवून दिली, तर निवडणुका पुढे ढकलल्या जातील. अन्यथा तात्काळ निवडणुका जाहीर होतील असे ते म्हणाले.

महत्वाचे म्हणजे आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीची तयारी पूर्ण झाली आहे. विजय खेचून आणण्यासाठी कुणाशीही युती करण्याची गरज नसल्याचे आमदार बावनकुळेंनी सांगितले. ओबीसींच्या भल्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पूर्ण सहकार्य केले. बहुमताने कायदा पारित करवून घेतला. पण ओबीसींचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकविता आले नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडणे अपेक्षित होते. केवळ दुर्लक्ष केल्यामुळे ओबीसींच्या आरक्षणात अडचणी निर्माण झाल्या.

राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला गांभीर्याने घेतले असते तर राज्यात होऊ घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असता, असे सांगताना गेल्या दोन वर्षांपासून महाविकास आघाडीने ओबीसी समाजावर केवळ अन्याय केला असून, राज्य सरकारचा दुटप्पी चेहरा समोर आल्याचे आमादर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Video: नागपूरातील पाणी प्रश्नावर भाजप संतप्त; चंद्रशेखर बावनकुळे

दोन मंत्र्यांच्या वादात पोळतोय महाराष्ट्र..

राज्यात जवळपास १५ लाख शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. शेतकऱ्यांना केवळ दोन तास वीज पुरवठा मिळत आहे. आदिवासी भागात सर्वात जास्त प्रमाणात भरनियमन होत आहे. वित्तमंत्री व ऊर्जामंत्री यांच्या वादात महाराष्ट्र पोळला जात आहे. राज्य सरकार कोळसा खरेदी करू शकले नाही. आता मात्र केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडण्याचे काम केले जात आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना एकही तासाचे भरनियमन केले नाही, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले. मात्र, मंत्री आपसात वाद करीत असल्याने राज्याचे नुकसान होत असल्याचा आरोप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.