NMC : अतिक्रमण पांढरपेशांचे; अधिकारीच कारभारी, आमदार ठाकरेंचा खळबळजनक आरोप

Winter Session :अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विकास ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.
Vikas Thakre
Vikas ThakreSarkarnama

MLA Vikas Thakre News : उपराजधानीत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यास, महानगर पालिका, नझूलच्या जागांवर शहरातील पांढरपेशा लोकांनी अतिक्रमण करून लॉन, शोरूम थाटले. यावर कारवाईसाठी महापालिकेने ठराव करून नगर विकास खात्याकडे पाठवला. परंतु नगर विकास खाते निर्णय घेत नसल्याने महापालिकेची (Municipal Corporation) अडवणूक होत आहे, असा खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी विधानसभेत केला.

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विकास ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी महापालिकेतील खाजगीकरण, माहिती जनसंपर्क विभागातील घोटाळा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे रखडलेले विद्यावेतन, अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जागा खाजगी कंपनीला दिल्यावरून सरकारला जाब विचारला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे विद्यावेतन व निर्वाह भत्ता रखडले असून ते तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

उपराजधानीत पीकेव्हीच्या जागेवर लॉन, शोरूम उभारण्यात आले असून महापालिकेकडून नळ, महावितरणने वीज जोडणी दिली. याबाबत महापालिकेने अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली. परंतु नगर विकास विभाग महापालिकेची अडवणूक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. अंबाझरी येथील जागा पर्यटन विभागाने एका खाजगी कंपनीला दिली. या कंपनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तोडले. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमत..

१०-१० वर्षापासून ठेकेदार आणि महानगर पालिकेचे अधिकारी संगनमत करून सरकारी जमिनी बळकावतात आणि वापरतात. वापरणारे अधिकाऱ्यांना नियमित मोबदला देत राहतात. अशाच प्रकारे अंजना लॉजिस्टिक या कंपनीने फुटाळा तलावानजीकच्या एका जागेवर कब्जा करून ठेवला आहे. तेथे मी ५० लाख रुपये समाज मंदिरासाठी मंजूर केले. पण त्या जमिनीचा निकाल अद्यापही लागला नाही. नाही म्हणायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणांमध्ये चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्‍वासन सभागृहात दिले आहे, असे आमदार ठाकरे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

Vikas Thakre
नागपुरातील क्रीडांगणे शाबूत ठेवणार की नाही : आमदार विकास ठाकरे

नागपूर शहरातील सरकारी जमिनींवर लोक कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण ही जमीन शेतीच्या वापराची आहे. या जागांवर मोठमोठाले लॉन आणि हॉटेल तयार झाले आहेत. तेथे महानगरपालिकेने विजेचे मीटर आणि पाणी पुरवठाही दिला, हे कसे काय शक्य होते. सामान्य माणसाचे थोडेसे जरी बांधकाम सरकारी जमिनीवर आढळले तर ते जेसीबी पाठवून तात्काळ तोडले जाते. काही विषयांत महानगरपालिका नोटीस देते. त्यानंतर तो विषय नगरविकास खात्याकडे जातो. त्यावर अधिकारी संबंधितांना न्यायालयाचे दार ठोठावण्याचा सल्ला देतात. न्यायालयात महानगरपालिकेचे वकील केस लढत नाहीत आणि मग मांडवली करून व्यवसाय करत राहतात. वॉर्ड अधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे. या अधिकाऱ्यांना सरकार लाखो रुपये पगार कशासाठी देतात, असाही सवाल आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in