शिवसंपर्क अभियानातून भावना गवळी गायब, संजय राऊतांनी अशी सावरली बाजू...

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhawana Gawali) गायब आहेत. कालपासून नागपुरात आलेले शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गवळींची बाजू तूर्तास सावरून घेतली आहे.
Sanjay Raut and Bhawana Gawali
Sanjay Raut and Bhawana GawaliSarkarnama

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सूचनेवरून विदर्भ आणि मराठवाड्यात आजपासून शिवसंपर्क अभियानास सुरुवात झाली. पण या अभियानातून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी गायब आहेत. कालपासून नागपुरात आलेले शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गवळींची बाजू तूर्तास सावरून घेतली आहे.

या अभियानामुळे विदर्भातील शिवसेनेमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसत आहे. तीन दिवस सेनेचे सर्व खासदार त्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यांमध्ये तळ ठोकून असणार आहेत. या काळात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कालपासूनच विदर्भात या अभियानाची चर्चा सुरू होती. पण खासदार भावना गवळी (Bhawana Gawali) या अभियानात कुठेच दिसल्या नाहीत आणि कुठल्याही जिल्ह्याच्या अभियानप्रमुख म्हणून त्यांचे नावही पुढे आले नाही. त्यामुळे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले.

यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारणा केली असता, भावना गवळी वाशीम-यवतमाळ मतदारसंघातून सतत ५ वेळा निवडून आलेल्या आहेत. शिवसेनेच्या त्या धडाडीच्या नेत्या आहेत. त्यांची कार्यपद्धतीही कुशल आहे. शिवसेनेच्या मोहिमेत त्या अग्रेसर असतात. पण मागील काळात त्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे शिवसंपर्क अभियानात त्या सहभागी होऊ शकल्या नाहीत. तशी परवानगीही त्यांनी पक्षप्रमुखांकडून घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघाची जबाबदारी अभियानप्रमुख म्हणून प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

Sanjay Raut and Bhawana Gawali
सेनेचे सर्व खासदार कामाला, पण भावना गवळी शिवसंपर्क अभियानातून गायब !

भावना गवळी सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्यामुळे पक्षात त्यांचे चांगले वजन आहे, असे सांगितले जात होते. मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागू शकते, अशाही चर्चा २०१९च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर केल्या गेल्या. पण मंत्रि‍पदाची माळ काही त्यांच्या गळ्यात पडली नाही. त्यामुळे त्यावेळी त्या पक्षनेतृत्वावर नाराज असल्याही बोलले जात होते. पण नंतरच्या काळात त्या सक्रिय झाल्या होत्या. कापूस, पीकविमा आदी मुद्द्य़ांवर त्यांनी आंदोलने केली, ती आंदोलने चांगली गाजलीसुद्धा. पण दरम्यानच्या काळात त्यांच्या वाशीम येथील प्रकल्पाची ईडी चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्या फारशा कुठे दिसल्या नाहीत आणि या अभियानातूनही त्या गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com