
नागपूर : रातोरात मुंबई सोडून गुजरातमधील सुरतमध्ये गेलेले आणि राज्याच्या राजकारण खळबळ उडवणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. तेथे त्यांच्यासोबत सध्या ४६ आमदार असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रातील (Maharashtra) एकंदर राजकीय परिस्थितीबाबत काय निर्णय घ्यावा, याबाबतीत ते आज सायंकाळी आमदारांची बैठक घेणार आहेत. (Eknath Shinde News in Marathi)
राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर राजकीय वर्तुळासह जनसामान्यांचेही लक्ष आहे. प्रत्येक घडामोड टिपली जात आहे. गेल्या ३० वर्षांतील शिवसेनेत (Shivsena) झालेले हे सर्वात मोठे बंड आहे. राज्यातील सर्व प्रमुख पक्षांतील नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. शिवसेनेने विधिमंडळ पक्षाची बैठक आज सायंकाळी ५ वाजता ठेवण्यात आली आहे. बैठकीचे पत्र बंडखोर आमदारांना पाठवण्यात आले आहे. त्या पत्राला एकाही बंडखोराने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दुसरे पत्र पाठविले जाणार असल्याचीही माहिती आहे.
बंडखोर आमदार बैठकीला न आल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे. पण ज्यावेळी या आमदारांनी बंड पुकारले, तेव्हाच आपल्यावर कारवाई होऊ शकते, हे त्यांना ज्ञात होते. आम्ही पक्षाच्या विरोधात कारवाई केलेली नाही. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत आणि शिवसैनिकच आहोत. त्यामुळे कारवाईची आम्हाला भिती नाही, असे आमदारांनी सांगितल्याची माहिती आहे. सध्या आमदार कुठल्याही दडपणात नाहीत, हे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज सायंकाळी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला बंडखोर आमदार पोहोचतील, याची सुतरामही शक्यता नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी बैठक घेण्यात येऊ शकते, हा अंदाज एकनाथ शिंदे यांनाही आला असावा. म्हणून त्यांनी सोबत असलेल्या सर्व आमदारांना फोन बंद ठेवण्यासाठी सांगितले आहे. गुवाहाटीला गेलेल्या विदर्भातील आमदारांशी ‘सरकारनामा’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे फोन स्विच्ड ऑफ असल्याचे आढळले. त्यामुळे आजच्या बैठकीला बंडखोर आमदारांची उपस्थिती राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. यानंतर एकनाथ शिंदे एकतर मुंबई किंवा गोव्याकडे निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.