
नागपूर : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) व नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हेतुपुरस्सरपणे सक्तवसुली संचालनालयाची नोटीस (ईडी) बजावल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने (Congress) सोमवारी १३ जून रोजी सकाळी ११ वाजता ईडीच्या मुंबईतील बेलॉर्ड इस्टेट आणि नागपुरातील सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयात तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्रातील भाजप प्रणीत मोदी सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी विरोधी धोरणासह ईडीच्या नोटीसचा विरोध कॉंग्रेसतर्फे केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणाऱ्या मुंबईतील आंदोलनात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शिक्षण मंत्री ॲड. वर्षा गायकवाड, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मत्स्य व बंदरे विकासमंत्री अस्लम शेख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि अमर राजूरकर यांच्यावर आंदोलनाच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नागपुरातील ईडी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत हे करणार आहेत. ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, पशुसंवर्धन व क्रीडामंत्री सुनील केदार, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, आमदार कुणाल पाटील यांच्यासह नागपूर, अमरावती व संपूर्ण विदर्भातील काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
नागपुरातील आंदोलनाच्या समन्वयाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख आणि नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.