BJP : सेवा पंधरवाड्याच्या नमनालाच स्थानिक आमदाराला दिला डच्चू !

भारतीय जनता पक्ष (BJP) तत्त्वनिष्ठ राजकारण व शिस्तबध्द कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे पालुपद भाजपचे नेते नेहमीच गात असतात.
Lakhan Malik
Lakhan MalikSarkarnama

वाशीम : "पार्टी विथ डिफरंट" ही उपाधी स्व:तला लावत प्रोटोकॉलची तुतारी फुंकणाऱ्या भारतीय जनता पक्षात वाशीम जिल्ह्यात गटबाजीचे प्रयोग वेळोवेळी होतात. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सेवा पंधरवाड्याच्या नमनालाच भाजपचे आमदार लखन मलिक यांच्या नावाला पत्रिका व बॅनरवर डच्चू दिल्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.

मुख्य म्हणजे आमदार लखन मलिक (MLA Lakhan Malik) यांच्या मतदारसंघातच झालेल्या या कार्यक्रमात आमदार मलिकांना डावलणे ही बाब भाजपमधील (BJP) भावी महाभारताची बिजपेरणी करणारी असल्याची चर्चा जिल्‍ह्यात आहे. भारतीय जनता पक्ष तत्त्वनिष्ठ राजकारण व शिस्तबध्द कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे पालुपद भाजपचे नेते नेहमीच गात असतात. वाशीम (Washim) जिल्ह्यात मात्र जुने एकनिष्ठ कार्यकर्ते बाजूला सारण्याची मोहीम फत्ते झाल्यानंतर आता वाशीम विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा प्रतिनिधित्व केलेले आमदार लखन मलिक यांनाच जाणीवपूर्वक डावलण्याचा कार्यक्रम आखला जात असल्याची चर्चा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातील घडामोडीवरून याला पुष्टी मिळत आहे. वाशीम जिल्हा भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा या उपक्रमाची आखणी केली होती. यासाठी मंगरुळपीर वाशीम वारला सावळी टो येथे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेवर व बॅनरवर आमदार लखन मलिक यांचे नाव व छायाचित्र नसल्याने अनेक राजकीय जाणकारांनी भाजपच्या या प्रोटोकॉल थेअरीवर आश्चर्य व्यक्त केले.

मुख्य म्हणजे हे सर्व कार्यक्रम आमदार लखन मलिक यांच्या वाशीम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघात पार पडले आहेत. एरवी विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या संस्थेचा कार्यक्रम असला तरी प्रोटोकॉलनुसार स्थानिक लोकप्रतिनिधीचे नाव कार्यक्रम पत्रिकेत असणे अनिवार्य आहे. इथे तर पंतप्रधानांचा वाढदिवस, भाजपचा कार्यक्रम आणी भाजपच्याच आमदाराला कार्यक्रमातून डच्चू ही बाब भाजपमधे काहीच आलबेल नसल्याजे दर्शवित असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

Lakhan Malik
ग्रामपंचायतीचा धुराळा : भाजप एक नंबर तर शिवसेनेची पीछेहाट, अनेक दिग्गजांना धक्का!

वाशीम येथे एका हॉटेलमधे आमदार रामदास आंबटकर आमदार राजेंद्र पाटणी यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवाडा उद्घाटन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमला आमदार लखन मलिक यांची उपस्थिती नव्हती मात्र मंगरुळपीर व इतर ठिकाणच्या कार्यक्रमाचे बॅनर व कार्यक्रम पत्रिका व्हायरल झाल्यानंतर वाशीम येथील कार्यक्रमात लखन मलिकांची अनुपस्थिती याच प्रोटोकॉल भंग योजनेचा भाग असल्याचीही चर्चा आहे

भाजपा जिल्हाध्यक्ष नॉट रिस्पाडींग

भाजपमधील या सुंदोपसुंदीच्या चर्चा होत असताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी भ्रमणध्वनी केला असता त्यांनी तो रिसीव्ह केला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका गुलदस्त्यात राहीली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in