डॉ. आशिष देशमुख यांनी सांगितले राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’चे ‘राज’...

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही ‘भारत जोडो यात्रा’ ७ सप्टेंबर २०२२ पासून म्हणजेच मागील २ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संपूर्ण देश पादाक्रांत करीत आहे. ६ नोव्हेंबरपासून ती महाराष्ट्रात आलेली आहे.
Dr. Ashish Deshmukh and Rahul Gabdhi
Dr. Ashish Deshmukh and Rahul GabdhiSarkarnama

नागपूर : भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही ‘भारत जोडो यात्रा’ ७ सप्टेंबर २०२२ पासून म्हणजेच मागील २ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संपूर्ण देश पादाक्रांत करीत आहे. ६ नोव्हेंबरपासून ती महाराष्ट्रात आलेली आहे. १५ दिवस विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागातून ही यात्रा जात आहे. कॉंग्रेसची ही यात्रा महत्त्वाची का आहे? या यात्रेमुळे काय-काय राजकीय बदल होतील, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारत तुटलेला आहे म्हणून जोडायचा आहे का, ही यात्रा राजकीय आहे की अराजकीय आहे, असे अनेक प्रश्न चचिले जात आहेत. विविध संस्था, संघटना, विचारवंत, लेखक, राजकीय नेते हे या यात्रेला पाठिंबा देत असून हा विषय फार महत्त्वाचा आहे, असे काॅंग्रेस नेते माजी आमदार डाॅ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले.

लोकशाही म्हटले की, एक सत्ताधारी प्रमुख पक्ष राहील आणि सोबत काही विरोधी पक्ष राहतील, ही आतापर्यंतची अनुभवलेली भारतीय लोकशाही आहे... आणि तीच खरी लोकशाही आहे. परंतु, सध्या भारतात (India) विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. अलीकडच्या काही वर्षात सत्ताधारी भाजपकडून (BJP) एकपक्षीय लोकशाही निर्माण केल्याचे चित्र दिसत आहे. विविध विरोधी पक्ष शिल्लक राहायला नकोत, आमचाच पक्ष शिल्लक राहिला पाहिजे, ही भाजपची मानसिकता आहे. आता पारंपरिक लोकशाहीसमोर जे आव्हान उभे आहे ते म्हणजे भाजप प्रणीत एकपक्षीय लोकशाहीचे! भाजपतर्फे याचा बचाव असा केला जातो की, पूर्वीच्या काळात म्हणजेच कॉंग्रेसच्या (Congress) काळात एकपक्षीय सत्ता नव्हती का? परंतु, सत्ता आणि पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. कॉंग्रेसची एकपक्षीय राजवट आपल्या देशात होती तशी ती आता भाजपची आहे, यात कोणाचीही हरकत नाही. लोकशाहीने दिलेला तो कौल आहे, हे आम्हां सर्वांना मान्य आहे. परंतु, लोकशाहीत एकपक्षीय लोकशाही व्हावी, हे एक मोठे संकट घोंगावत आहे. अलीकडच्या १५-२० वर्षांच्या काही काळात आपल्या लोकशाहीचे विचित्र असे संक्रमण सुरू आहे. बहुमताची लोकशाही बहुसंख्याक वादाकडे चालली आहे. हा मोठा फरक आहे. हा लोकशाहीला मोठा धोका आहे. हा धार्मिक आणि हिंस्र वाद आहे. समाजामध्ये मोठी दरी वाढावी आणि आपण सत्ताधारी व्हावे, ही जी महत्वाकांक्षा बाळगली जात आहे, हा आपल्या लोकशाहीसाठी फार मोठा धोका आहे, असे डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले.

विशेषत: २०१४ पासून भाजपच्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सत्तेतून काही प्रश्न निर्माण झाले आहेत तसेच राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात एक प्रकारची घुसमट निर्माण झाल्याचे दिसत आहे. आमच्याशिवाय कोणीच नको, ही भावना त्यातून स्पष्टपणे नजरेस पडत आहे. त्यातून हा समाज दुभंगला जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या धोक्याच्या विरुद्ध कोणीतरी उभे राहण्याची गरज आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपल्या देशात ठामपणे उभे राहणारे नेतृत्व शिल्लक राहिले नाही. जे उरले आहेत ते म्हणजे फक्त राहुल गांधी आणि २-३ अपवाद आहेत. राहुल गांधी हे सगळं प्रकरण सर्वांसमक्ष घेऊन चालले आहेत. यात राजकीय आणि अराजकीय याचा मिलाप आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

तपास यंत्रणांचा गैरवापर..

भाजप सरकारच्या नरेंद्र मोदींचे अपयश, लोकशाहीचा होणारा संकोच, लोकशाहीच्या बदलणाऱ्या स्वरूपाबद्दल दाटून आलेले सावट अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत. भूतकाळात आजपर्यंत असे कधी घडले नाही की, कोणीच सरकारला जाब विचारू नये. जनता सरकारला जाब विचारत असायची आणि सरकार उत्तर द्यायचे. परंतु, आता तसे होताना दिसत नाही. सरकार उत्तरच देत नाही. मुळात प्रश्न विचारण्याची प्रवृत्तीच कमी झालेली आहे. कारण प्रश्न विचारायचे तर कोणाला? एकीकडे लोकशाहीचा संकोच चालू आहे, दुसरीकडे सत्ता बेधुंदपणे वापरली जात आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. संजय राऊत यांच्या संदर्भात आलेला निर्णय बघा... त्यांची अटक बेकायदेशीर होती. अशा अनेक आव्हानांच्या विरोधात ही भारत जोडो यात्रा आहे. हे भारत तुटल्याचे लक्षण आहे का? नाही... भारत एकसंघ आहे. मुद्दा हा आहे की, भारताच्या समोर जे धोके उभे ठाकलेले दिसत आहेत त्या धोक्यांच्या विरोधात ही भारत जोडो यात्रा आहे. म्हणूनच या यात्रेचं स्वागत सर्व पक्षांकडून, अनेक संघटनांकडून केल्या जात आहे.

Dr. Ashish Deshmukh and Rahul Gabdhi
वेगळ्या विदर्भासाठी आशिष देशमुख मैदानात, प्रशांत किशोर देणार चळवळीला गती...

आता गांधी घराणे कॉंग्रेसाध्यक्ष पदापासून दूर आहे. त्यांच्या अनुपस्थितीत मल्लिकार्जुन खर्गे हे कॉंग्रेसला चांगले दिवस दाखवू शकतात का, हा मोठा विषय आहे. किती नेते पुढे येऊन पक्ष-विस्ताराची धुरा सांभाळायला तयार आहेत? राष्ट्रीय स्तरावरील कॉंग्रेसप्रमाणेच महाराष्ट्र स्तरावरील कॉंग्रेसलासुद्धा शैथिल्याचे कवच झटकून टाकावे लागणार आहे. कॉंग्रेसच्या उज्वल भविष्यासाठी विदर्भातील नेता कोण, मराठवाड्यातील नेता कोण, हे प्रश्न कॉंग्रेसजनांनी स्वत:लाच विचारल्यास त्याचे उत्तर सापडणार नाही. परंतु, मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न विचारल्यास बरीच नावे पुढे येतील. कॉंग्रेसची मानसिकता ही सत्ताकेंद्रित असल्यामुळे असे प्रश्न निरुत्तरित राहतात. म्हणूनच, पक्षकेंद्रित मानसिकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे.

दीर्घ परंपरा असलेला पक्ष संपत नसतो. महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे भविष्य हे महाराष्ट्रातील लोकांच्या हातात आहे. कॉंग्रेसला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मजबूत नेते आणि कार्यकर्त्यांचं नेटवर्क तयार करावे लागणार आहे. भाजप २ वरून ३०० पेक्षा अधिक खासदारांपर्यंत कशी पोहोचली, याचा अभ्यास करून आपण आत्मपरीक्षण करू शकतो... पक्षातील राजकारण बाजूला ठेऊन एक नवे मॉडेल उभे करू शकतो. कॉंग्रेस पक्षातर्फे सामाजिक कार्यांसोबतच संघटनेत बळ निर्मिती करावी तसेच जास्तीत जास्त खासदार व आमदार निवडून आणण्यावर भर देऊन संसदीय प्रणालीत सकारात्मक बदल घडवावेत. या बाबी होणार नाहीत, तोपर्यंत पक्ष वाढणार नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कॉंग्रेससाठी अत्यंत महत्वाची असून या यात्रेचं राजकीय यश काय आहे, याची वाट न बघता समस्त कॉंग्रेसजनांनी कंबर कसून मेहनत करावी, जेणेकरून कॉंग्रेस पक्ष मोठा होईल, असेही डॉ. आशिष देशमुख म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com