Ranjeet Patil यांच्यावरील नाराजी, ''नुटा'ही नाही, त्यात बच्चू कडूंनी वाढवली भाजपची डोकेदुखी !

Congress News: कॉंग्रेसने नुटा आणि विज्युक्टासारख्या संघटनांचे पाठबळ मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
Ranjeet Patil and Bacchu Kadu
Ranjeet Patil and Bacchu KaduSarkarnama

Amravati Graduate Constituency Election : अमरावती (Amravati) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपला प्रहार जनशक्तीने आव्हान देत उमेदवार रिंगणात आणला आहे. हा उमेदवार प्रभावी ठरणार नाही, असा दावा भाजपकडून करण्यात येत असला तरी मतांचे विभाजन करू शकणार आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कॉंग्रेसने (Congress) हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यासाठी संपूर्ण जोर लावला आहे. धिरज लिंगाडे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र येऊन लढते, तेव्हा काय होते, हे गेल्या वर्षी झालेल्या नागपूर (Nagpur) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बघायला मिळाले. अभिजित वंजारी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पार सफाया करून टाकला होता. येथेही कॉंग्रेसने नुटा आणि विज्युक्टासारख्या संघटनांचे पाठबळ मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे महाविकासची रणनीती बघून भाजप पावले टाकत आहे. त्यातच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी असलेले प्रहार जनशक्तीचे संस्थापक, माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) सरकारला घरचा अहेर देत मेस्मा संघटनेसोबत किरण चौधरी या उमेदवाराला उभे केले आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने जुन्याच खेळाडूला मैदानात उतरविले आहे. या मतदारसंघात डॉ. रणजीत पाटील यांनी सलग दोन वेळा विजय मिळविला आहे. यावेळी स्थिती मात्र वेगळी आहे. अमरावती व अकोला या दोन जिल्ह्यांतील मतदारसंख्या व भाजपच्या उमेदवाराविरुद्ध असलेला रोष याचा सामना त्यांना करावा लागणार आहे. याशिवाय राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या प्रहार जनशक्तीचे प्रमुख माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी किरण चौधरी यांना मैदानात आणून डोकेदुखी वाढविली आहे. गतवेळी रणजीत पाटील यांना नुटाने मदत केली होती, यंदा ती सोबत नाही.

नुकत्याच झालेल्या विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत नुटाने मिळवलेले वर्चस्व व भाजपशी संबंधित शिक्षण मंचची सुमार कामगिरी डॉ. पाटील यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे. त्याचवेळी काँग्रेसने नुटा व विज्युक्टासारख्या कार्यरत संघटनांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नावर त्यांची ठोस कामगिरी नाही. या मुद्द्यावरही निवडणुकीत त्यांची चांगलीच अडचण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉ. पाटील यांना त्यांच्या मूळ अकोला जिल्ह्यातून विशेषतः स्वपक्षातूनच असंतोषाचा सामना करावा लागत असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपने मतदार नोंदणीत आघाडी घेतली होती, मात्र त्याचवेळी बोगस नोंदणीचा मुद्दा समोर आला आणि तक्रारीही झाल्या आहेत. न्यायालयात हे प्रकरण गेले आहे.

Ranjeet Patil and Bacchu Kadu
Bachchu Kadu : 'मूर्ख आहोत का आम्ही', बच्चू कडू सरकारवर संतापले

विभागातील पाचही जिल्ह्यातून एक लाख ८६ हजार ३६० मतदारांची नोंदणी झाली असली तरी गतवेळच्या तुलनेत ती २४ हजार १५१ ने कमी झाली आहे. अमरावती व अकोला या दोन जिल्ह्यांत सर्वाधिक मतदार असून ते महत्त्वाची भूमिका निभावणारे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. नामांकन दाखल करण्यासाठी ते आज स्वतः अमरावतीमध्ये आले होते. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसुद्धा होते. या पार्श्वभूमीवर दसरा मैदान येथे पदवीधरांसोबत त्यांनी संवाद साधला. या मेळाव्याचा पदवीधर मतदारांवर किती प्रभाव झाला, हे सुद्धा थोड्याच दिवसांत कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com