
Akola District Political News : कॉंग्रेसला कुणी पराभूत करू शकत असेल, तर ती म्हणजे कॉंग्रेसच. भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस नेते एकत्र आल्याच्या कितीही बाता केल्या जात असल्या तरी कॉंग्रेस नेत्यांमध्ये एकमत नाही, ही बाब वारंवार पुढे आली आहे. आता अकोला जिल्ह्यात नेतृत्व बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (Movements have started to change the leadership in Akola district)
लोकसभा निवडणुकीपूर्वीच अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच नाराज आजी-माजी पदाधिकाऱ्यांची अकोट येथे मंगळवारी (ता. २९) बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्याचे नेतृत्व बदलण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. अकोला जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांच्याकडे आहे.
त्यांच्या नेतृत्वाबाबत गेल्या काही दिवसांपासून अकोला (Akola) जिल्हा काँग्रेसमध्ये धुसफुस सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत कुणीही तक्रार करण्यासाठी पुढे आले नव्हते. आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना काँग्रेसमधील (Congress) नाराज नेत्यांमधील अस्वस्थता उफाळून आली असून, त्यांनी अकोट येथे मंगळवारी एकत्र येत नेतृत्व बदलावर चर्चा घडवून आणली.
विशेष म्हणजे, या बैठकीला जिल्ह्यातील माजी आमदारांसह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. काही युवक नेतेही या बैठकीला उपस्थित होते. अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष हिदायत पटेल, माजी आमदार नातिकोद्दीन खतीब, माजी आमदार बबनराव चौधरी जिल्हा परिषद सदस्य (ZP) सुनील धाबेकर आदींसह आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावत नाराजीचा सूर आवळला. त्यामुळे अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये सर्वच काही आलबेल नसल्याचे या दिसून येत आहे.
जिल्हाध्यक्षांनी कार्यपद्धत बदलावी..
अकोला जिल्हा काँग्रेसला मरगळ आली आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्षांनी इतरांच्या मनाप्रमाणे निर्णय न घेता, स्वनिर्णयावर ठाम रहावे. त्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा. आम्हाला कुणाकडे तक्रार करण्यात स्वारस्य नाही. तक्रार करण्याने कोणताही फरक पडत नाही, अशीही चर्चा बैठकीत झाल्याची माहिती आहे.
लवकरच तालुका स्तरावर बैठका..
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी संघटनात्मक बांधणी करण्यासाठी जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन तालुका स्तरावर बैठका आयोजित करण्याचा निर्णयही या बैठकीत घेतल्याचे समजते.
पुन्हा त्याच तक्रारी..
अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये एकोपा नाही. त्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यात कोणत्याही निवडणुकीत यश येत नाही. पदाधिकारी एकमेकांविरुद्ध तक्रारींचाच पाढा आतापर्यंत वाचत आले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता जिल्हाध्यक्षांविरुद्ध एकत्र आलेले नेत्यांच्या नाराजीत काहीही नवीन नाही. पुन्हा त्याच तक्रारी व तशीच नाराजी पुढे येत असल्याने काँग्रेसला अच्छे दिन येणार का, असा असा प्रश्न काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी उपस्थित केला आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.