देवेंद्रजी, एक जलआक्रोश मोर्चा नागपुरातही काढा, आम्ही सोबत येऊ !
Atul Londhe, CongressSarkarnama

देवेंद्रजी, एक जलआक्रोश मोर्चा नागपुरातही काढा, आम्ही सोबत येऊ !

ही विनंती कॉंग्रेसचा प्रवक्ता म्हणून नव्हे, तर एक नागपूरकर, नागरिक म्हणून करतो आहे, असे कॉग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले.

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात पाणी टंचाई तशी नाहीच. पण योग्य वितरण व्यवस्था नसल्यामुळे पुरेसे पाणी असूनही नागपूर तहानलेलेच आहे. राज्यातील भाजपचे प्रमुख नेते, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्यभर जलआक्रोश करीत फिरत आहेत. पण हाच आक्रोश ते नागपुरात करतील का, हा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

गेल्या १५ वर्षांपासून नागपूर (Nagpur) महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. या काळात विविध आश्‍वासने देण्यात आली. पाण्यासाठी २४ बाय ७ योजना राबविणार येथपासून पासून ते योजना कार्यान्वीत झाली, येथपर्यंत भाजप नेत्यांनी वक्तव्ये केली. पण आजही नागपुरात ही योजना अस्तित्वात असल्याचे जाणवत नाही. नाही म्हणायला देवेंद्र फडणवीसांचे निवासस्थान असलेल्या धरमपेठ भागात ही योजना सुरू होती. पण उन्हाळ्यात तेथेही योजनेला सुरूंग लागला. फडणवीसांनी आधी औरंगाबाद आणि त्यानंतर जालन्यात पाणी प्रश्‍नावर मोर्चा काढला. पण राज्यभर जलआक्रोश करणारे फडणवीस नागपुरातही हे आंदोलन करतील का, या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थी येईल. कारण येथे आत्तापर्यंत त्यांचीच सत्ता होती, असे बोलले जात आहे.

उन्हाळ्यात नागपुरात २४ बाय ७ तर दूरच पण तासभरही पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती उन्हाळ्यातली आहे. त्यामुळे येत्या महानगरप्लिकेच्या निवडणुकीत एकट्या पाणी प्रश्‍नावर भाजप तोंडघशी पडू शकते. पण इतर राजकीय पक्ष त्यासाठी कमी पडत आहेत. हीच परिस्थिती इतर कोण्या राजकीय पक्षामुळे नागपुरात झाली असती, तर आत्तापर्यंत भाजपने पाण्यासाठी रान उठवले असते. प्रस्थापित राजकीय पक्ष जरी यामध्ये मागे असले तरी पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवून आत्मविश्‍वास दुणावलेल्या आम आदमी पक्षाने मात्र हा प्रश्‍न सोडवण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. आपकडून नागपुरकरांना शुद्ध व मोफत पाणी देण्याची पहिली ग्यारंटी देण्यात आली आहे. त्यासाठी आज संविधान चौकात त्यांचे आंदोलन सुरू आहे.

आप करणार खुलासा..

गेल्या काही दिवसांपासून शहरात पाण्याची टंचाई सुरू आहे. वर्षोवर्षे अनेक भागांत पाईपलाईन नाही, टॅंकर माफिया राज सुरू आहे, तर दुसरीकडे २४ बाय ७ च्या नावावर जनतेची लुट व फसवणूक चालू आहे. याबाबत आज आम आदमी पार्टी ओसीडब्ल्यू व महानगरपालिका यांच्यातील गोंधळाचा खुलासा करणार आहे. आम आदमी पार्टीने पाणी प्रश्‍न हाती घेतला आणि सोडवून दाखवला तर, तोंडावर आलेल्या महानगरपालिका निवडणूकीत भाजपला त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२०१२ साली आपण पाण्यासाठी २४ बाय ७ योजना आणली. त्यासाठी नागपुरकरांकडून पैसे आकारले अन् हवेने फिरणारे मिटर लोकांना दिले. त्यानंतर टंचाई मिटली तर नाही, पण टॅंकरची संख्या लक्षणीय वाढली. आता आपण राज्यक्षरात जलआक्रोश मोर्चे काढताय, असे समजले. त्यामुळे एक जलआक्रोश मोर्चा नागपुरातही काढा, ही विनंती कॉंग्रेसचा प्रवक्ता म्हणून नव्हे, तर एक नागपूरकर म्हणून करतो आहे, असे कॉग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले.

नितीन गडकरीही नाराज..

नागपूर शहराला पेंच आणि कन्हान या नद्यांतून पुरेसा पाणी पुरवठा होतो. पण वितरण व्यवस्था योग्य नसल्यामुळे शहर आजही तहानलेलेच आहे. जलवाहिन्यांची कामे अर्धवट पडलेली आहेत. त्यामुळे वितरण योग्यरित्या होत नाही. शहराच्या एकाही भागात २४ तास पाणी मिळत नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाणी प्रश्‍नावरील आढावा बैठकीत केले. विशेष म्हणजे वितरण व्यवस्था महानगरपालिकेकडून काढून खासगी कंपनीला देण्याची काम भाजपच्याच काळात करण्यात आले. व्यवस्था सुधारेल अशी अपेक्षा तेव्हा व्यक्त करण्यात आली होती. पण झाले उलटेच, जी सुरळीत होती, त्या व्यवस्थेचेही १२ वाजले. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे टंचाई नाही, पण आताही उपाय न केल्यास उन्हाळ्यात पुन्हा तीच गत होणार, यात तीळमात्रही शंका नाही.

Atul Londhe, Congress
सोमय्यांच्या दंडेलशाहीला राज्य सरकारने चाप लावावा... अतुल लोंढे

नितीनजींची नाराजी प्रशासनावर..

शहराच्या एकाही भागात २४ तास पाणी मिळत नाही, असे म्हणत केंद्रीय नितीन गडकरी यांनी नागपुरातील पाण्यासाठीच्या २४ बाय ७ योजनेच्या कामावर नाराजी दर्शविली आहे. याबाबत भाजप प्रवक्ते गिरीष व्यास यांना विचारले असता, नितीनजींची नाराजी प्रशासनावर, संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. यावरून गडकरींनी फडणवीसांच्या अपयशाची कबुली दिल्याचा जावईशोध कुणीतरी लावला, हे योग्य नाही. नागपूरसाठी २४ बाय ७ ही योजना फार चांगली आहे. पण ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये ती राबवणे तेवढे सोपेही नाही. योजनेचे काम अद्यापही सुरू आहे, असे गिरीष व्यास महणाले.

पुन्हा सत्ता येईल, आणि योजना पूर्ण करू..

महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्यानंतर पाणी प्रश्‍न अधिक पेटला. पण योजनेचे बरेचसे काम झालेले आहे. जवळपास पाण्याच्या ८० टाक्या बांधून तयार आहेत. पूर्ण प्लॅनिंग झाले आहे. पण शुअर लाइन, रस्त्याची कामे आणि इतर कामांमुळेही योजनेच्या कामावर प्रभाव पडला. राहिला प्रश्‍न फडणवीसांच्या जल आक्रोश मोर्चाचा. तर जथे त्यांनी मोर्चे काढले, तेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य भीषण आहे. नागपुरात ते नाही, त्यामुळे येथे मोर्चा काढण्याची काही गरज नाही. आमच्या विरोधकांना वाटत असल्यास त्यांनी मोर्चे काढावे, त्याचे उत्तर आम्ही देऊ, असे आव्हान गिरीष व्यास यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in