देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसह पत्नी अमृतांचाही घेतला समाचार...

या वादात नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadanvis) यांनी उडी घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून ‘ए भोगी काहीतरी शिक आमच्या योगींकडून’, असे ट्विट केले होते.
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसह पत्नी अमृतांचाही घेतला समाचार...
Amruta - Devendra Fadanvis and Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : मुख्यमंत्री महोदय उद्धवजी आणि माझी पत्नी अमृता या दोघांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टींना उत्तर देणं सोडत नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचे टोमणे आल्यानंतर माझ्या पत्नीने त्याला उत्तर देण्याचे कारण नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी अमृता या दोघांनाही सुनावले आहे.

अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे. हा त्या दोघांचा प्रश्‍न आहे, त्यामुळे जास्त काही या विषयावर मी बोलणार नाही, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. गेल्या काही दिवसांत हनुमान चालिसा आणि भोंग्यांवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यातच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला आव्हान देऊन वातावरण आणखीनच चिघळवून टाकले होते. या वादात नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadanvis) यांनी उडी घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्देशून ‘ए भोगी काहीतरी शिक आमच्या योगींकडून’, असे ट्विट केले होते.

अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उद्धव ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिले. त्याबाबत आज देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी राज्यातील राज्यकर्त्यांना भोगी म्हणत हिणवले होते. तोच धागा पकडून मग अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर ट्विटरयुद्ध रंगले होते. योगी सरकारने उत्तर प्रदेशातील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले, तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्‍चित करून दिली. यावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका केली होती.

तेव्हा मी नगरसेवक होतो !

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले जे मर्सीडीज बेबी आहेत, त्यांना संघर्ष करावा लागला नाही आणि त्यांना संघर्ष पाहण्याचीही गरज पडली नाही. त्यामुळेच ते कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात. पण कितीही थट्टा उडवली तरी आमच्यासारख्या लाखो कारसेवकांना गर्व आहे की, ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला गेला, त्यावेळी आम्ही तेथे होतो, मी स्वतः तेथे होतो आणि त्यावेळी मी नगरसेवक होतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Amruta - Devendra Fadanvis and Uddhav Thackeray
फडणवीस यांचा `बूस्टर डोस` दहा हजार बूथप्रमुखांना `चार्ज` करणार

१८५७ च्या लढ्यातही देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते, अशी खोचक टिका त्यांच्यावर करण्यात आली. याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी हिंदू आहे, मागचा जन्म आणि पुर्नजन्मावरही माझा विश्‍वास आहे. त्यामुळे १८५७ मध्ये जर मी राहिलो असेन तर तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी तेव्हा लढत असेन आणि तुम्ही असाल, तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांशी युती केली असेल, असा जोरदार पलटवार करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. आज तुम्ही अशा लोकांशी युती केली आहे की, जे १८५७ च्या लढ्याला युद्धच मानत नाहीत. ते शिपायांचे बंड होते, असे ते म्हणतात. त्यामुळे त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.