Dalit Panther : दलित पँथरची डरकाळी पुन्हा घुमणार? रविवारी नागपुरात बैठक !

Nagpur : बैठकीत पँथरच्या पुनर्गठनामागील भूमिका जाहीर करण्यात येणार आहे.
Dalit Panther, Nagpur.
Dalit Panther, Nagpur.Sarkarnama

Dalit Panther's meeting in Nagpur : सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या विरुद्ध आपल्या कार्यशैलीने खळबळ उडवून देणाऱ्या दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे निमित्त साधत विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या विदर्भातील जुन्या नव्या पँथर्सना, कार्यकर्त्यांना एकत्र आणले जाणार आहे.

या संदर्भात येत्या रविवारी दुपारी बारा वाजता रविभवनात जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधण्यात येणार आहे. पँथरचे ज्येष्ठ नेते आर.एम. पाटील, सुरजितसिंग, डॉ.रविदत्त कांबळे, अशोक मेश्राम व प्रा. डॉ. विनोद राऊत यावेळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत पँथरच्या पुनर्गठनामागील भूमिका जाहीर करण्यात येणार आहे.

या बैठकीला विदर्भातील दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक प्रा.डॉ.विनोद राऊत, राजन वाघमारे, डॉ.मनोज मेश्राम,भूषण सोमकुळे, पुंडलिक तायडे इत्यादींनी केले आहे. दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे १९७२ साली उदयास आली.

सामाजिक विचारांचे प्रबोधन हा संघटनेचा गाभा आहे. दलित पॅंथर 'लोकशाही मध्यवर्तित्व' हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, विज्ञानी व एकजिनसी समाजनिर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करणे आहे.

प्रामुख्याने मागास, कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाति-जमाती, आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना म्हणून समाजात ओळखली जाते. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या निधनाने रिक्त झालेल्या दलित पॅंथरच्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी मल्लिका नामदेव ढसाळ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

Dalit Panther, Nagpur.
Nagpur : महानगरपालिका हातून गेली, तर भाजपला लोकसभा जिंकणे अवघड; म्हणून...

नागपुरात झाले होते अधिवेशन..

पॅंथर संघटनेचे नेते नामदेव ढसाळ कम्युनिस्टवादी व राजा ढाले हे आंबेडकरवादी असा वाद पुढे आला. १९७४ साली नामदेव ढसाळ यांनी नागपूर येथे दलित पॅंथरचे अधिवेशन भरविले व स्वतःचा गट वेगळा केला, तर १९७६ साली राजा ढाले यांच्या गटातून भाई संगारे व अविनाश महातेकर बाहेर पडले. त्यांनी संगारे, महातेकर गट निर्माण केला. ७ मार्च १९७७ ला राजा ढाले यांनी नाशिक येथे आपल्या गटाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन तेथे पॅंथर बरखास्तीचा निर्णय घेतला. व ‘मासमुव्हमेंट' या संघटनेची स्थापना केली.

ढाले गटाच्या या कृतीचा निषेध करून अरुण कांबळे, मनोहर अंकुश, रामदाम आठवले, (Ramdah Athavale) दयानंद म्हस्के, ज. वि. पवार, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगांवकर इत्यादी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन २८ एप्रिल १९७७ला औरंगाबाद (Aurangabad) येथे भारतीय दलित पॅंथरची निर्मिती करून आपले कार्य चालू ठेवले. आता नागपुरातील (Nagpur) मंडळी प्रा. डॉ. विनोद राऊत यांच्या पुढाकारने ही चळवळ पुन्हा गतीमान करण्याचा प्रयत्न करीत आहे. दलित पॅंथरची डरकाळी पुन्हा घुमणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in