तडकफडक; तेवढ्याच विनम्र, अन् आव्हानांना आव्हान देणाऱ्या यशोमतीताई ठाकूर…

प्रचंड ऊर्जादायी व्यक्तिमत्त्व म्हणून आज यशोमतीताईंची Minister Yashomati Thakur राज्याला ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे आज महिला व बालविकास खात्याला नावलौकिक प्राप्त झाला आहे.
Minister Yashomati Thakur
Minister Yashomati ThakurSarkarnama

नागपूर : नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व यांचा तिहेरी संगम म्हणजे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर. विकासाची दूरदृष्टी आणि जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव लढा देणारे नेतृत्व म्हणून आज त्यांना मान्यता मिळाली आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सतत नवनवीन संकल्पनांचा ध्यास घेणे, त्या प्रत्यक्षात उतरविणे, हे यशोमतीताईंचे विशेष कौशल्य. उच्चविद्याविभूषित असलेल्या ताईंनी सतत लोकांमध्ये राहून, त्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्याची सोडवणूक करून हे कौशल्य आत्मसात केलेलं आहे. ताईंना खोटेनाटे जमत नाही. त्या तडकफडक स्वभावाच्या आहेत, पण तेवढ्या विनम्रदेखील. आव्हानांना आव्हान देणाऱ्या लढवय्या नेत्या म्हणून आज त्यांची ओळख आहे. लोकसेवेच्या ध्यासाचे आणि कामाच्या झंझावाताचे दुसरे नाव म्हणजे यशोमती ठाकूर…

सदासर्वकाळ लोकसंपर्क आणि नवनवीन प्रकल्प आणण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. आपल्या मतदारसंघासह राज्यासाठी ठोस काहीतरी करण्यासाठी यशोमतीताई झपाटल्यागत काम करतात. यातूनच त्यांनी एक व्यवहारी राजकीय नेत्या आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी अशी छाप उमटविली आहे. त्यांच्याकडे कायम लोकांची गर्दी आणि कामांचा ढीग असतो. हा ढीग उपसत असलेल्या लोकनेत्या गेल्या २० पेक्षा अधिक वर्षांपासून लोक बघत आहेत. सतत कामात व्यग्र असणाऱ्या. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आणि प्रचंड ऊर्जादायी व्यक्तिमत्त्व म्हणून आज यशोमतीताईंची राज्याला ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे आज महिला व बालविकास खात्याला नावलौकिक प्राप्त झाला आहे.

एखाद्या कामाची घोषणा झाल्यानंतर ते पूर्णत्वास येईपर्यंत आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या ॲक्टीव ठेवतात. त्या कामाचा पाठपुरावा त्यांच्या कार्यालयीन यंत्रणेमार्फत सातत्याने सुरू असतो. उद्दिष्ट ठेवून काम केल्यास संकल्प पूर्ण होतात, असे त्या नेहमी सांगतात. संकल्पपूर्तीची क्षमता विकसीत केल्यास आपण जनतेच्या आशा आकांक्षांना न्याय देऊ शकतो, यावर त्यांचा विश्‍वास आहे. महिला व बालविकास मंत्री म्हणून महाराष्ट्राने त्यांचे वेगळेपण अनुभवले आहे आणि त्यांच्या विकासकामांचा झंझावात राज्यातील लोक अनुभवतच आहेत. राजकारण करताना निवडणुकांतील विरोध हा तात्कालिक असावा अन् यातूनच माणसे जोडत जावी, हा मंत्र ताईंनी जोपासला. यातून हे उमदे नेतृत्व विकसीत झाले आणि राज्याच्या विकासाची दिशा निश्‍चित करण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावत आहे.

जनतेच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी सदैव तत्पर असलेल्या यशोमतीताई त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी स्वतःच एक चालतीफिरती कार्यशाळा आहेत, प्रेरणास्थान आहेत. सामाजिक कार्याची मोठी ऊर्जा त्यांच्यात सामावली आहे. ताईंचे नेतृत्व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आज त्या मंत्री असल्या तरी सामान्य व्यक्ती म्हणून त्यांची उंची फार मोठी आहे. पालकमंत्री म्हणून अमरावती जिल्ह्याचा विकास करीत असताना इतर जिल्ह्यांवर अन्याय होऊ नये, याची पुरेपूर काळजी त्या घेतात. त्यांच्या नेतृत्वावर आबालवृद्धांचा विश्‍वास आहे. त्यांच्यामुळे अमरावती जिल्ह्याला विकासाची झालर चढत आहे. विरोधात लढणाऱ्यांनाही त्या आपलेसे करतात, हा त्यांच्यातला एक विशेष गुण येथे सांगितला पाहिजे. येणाऱ्या काळात तळागाळातील लोकांचा विकास व्हावा, ही यशोमतीईंची तळमळ आहे.

अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण असलेल्या तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ते राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री, असा यशोमती ठाकूर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. त्यानंतर २०१४ आणि २०१९मध्ये तिवसा विधानसभा मतदार संघात निवडणूक जिंकून त्यांनी हॅट्ट्रिक साधली. पण हा प्रवास वाटते तितका सहज निश्चितच नव्हता. खानदेश आणि विदर्भातील कॉग्रेसच्या एकमेव महिला आमदार म्हणून त्यांच्या नावावर त्यावेळी एक विक्रम स्थापित झाला होता. राजकीय कुटुंबात जन्म झाल्यामुळे साहजिकच

राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे बाळकडू त्यांना कुटुंबातूनच मिळाले. वडील दिवंगत भैय्यासाहेब ठाकूर हेसुद्धा तिवसा मतदारसंघाचे आमदार होते. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमीच कार्यकर्त्याचा राबता असायचा.

भैय्यासाहेबांना यशोमती आणि संयोगिता अशा दोन मुली आहेत. दोघींनाही त्यांनी कधी मुली मानलंच नाही. मुलगा अन मुलगी असा भेद त्यांनी कधीच पाळला नाही. मतदारसंघ हे कुटुंब अन् इथला प्रत्येक माणूस कुटुंबातील सदस्य, हा त्यांचा शिरस्ता राहिला अन् तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला आणि हीच परंपरा यशोमतीईंनीसुद्धा कायम ठेवली आहे. यशोमतीताईंना शालेय जीवनापासूनच क्रीडाक्षेत्रात विशेष रुची होती. नेमबाजीत त्या अव्वल होत्या. म्हणूनच गणतंत्र परेडसाठी निवड होण्याचा बहुमान त्यांना शालेय जीवनात मिळाला. तडकफडक, अन तितकाच नम्र स्वभाव असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे.

शालेय शिक्षण अमरावतीमध्ये झालं असलं तरी पुढील शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. कायद्याच्या पदव्युत्तर असलेल्या यशोमती यांचा राजकीय क्षेत्रात सक्रिय प्रवेश झाला ते वर्ष आहे २००२. त्यानंतर २००४ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढली. मात्र अल्पशः मताने त्यांचा पराभव झाला. पण मुळातच जिद्द, चिकाटी अन परिश्रम हा पिंड असलेल्या यशोमतीताईंनी अपयश ही यशाची पायरी मानून पुढील निवडणुकीची रणनीती आखली अन् पक्ष संघटना मजबूत करण्याची जोरदार तयारी सुरू केली. संपूर्ण ग्रामीण असलेल्या तिवसा मतदारसंघातील गाव अन गाव पिंजून काढलं. कार्यकर्त्यामध्ये एक नवा जोश निर्माण केला. अनेक आंदोलने केली. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या राजकीय जीवनाचा असा खडतर प्रवास असला तरी, हाच प्रवास निर्णायक ठरला. काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी देशातील अन् राज्यातील निवडक युवा नेत्यांची टॅलेंट हटच्या माध्यमातून निवड केली. त्यामध्ये यशोमती ठाकूर त्यात अव्वल ठरल्या. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला विलक्षण वळण मिळालं.

या संधीच पुढं त्यांनी सोनं केलं. राज्याचं नेतृत्व आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं होत. रोखठोक भूमिका, विकासाची आत्यंतिक तळमळ अन् विकासाची दूरदृष्टी असलेल्या यशोमतींताईंनी २००४ ते २००९ असे पाच वर्ष त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचा परिपाक म्हणजे २००९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयाचा इतिहास रचला. आमदार झाल्यानंतर कधीकाळी विकासापासून कोसो दूर असलेल्या या ग्रामीण मतदारसंघात त्यांनी केलेली विकास कामे दृष्ट लागण्यासारखी आहेत. राजकारण करताना समाजकारणाला त्यांनी कधीही अंतर दिले नाही. लोकांमध्ये राहून, लोकांच्या साथीने त्यांनी तिवसा तालुक्याचे चित्र पालटले. तालुकावासीयांसाठी विकासाची नवी परिभाषा तयार केली. विकास कामे करताना त्यांनी कधीच पक्षीय भेदाभेद केला नाही. विरोधी पक्षातला कुणीही ताईंकडे आला अन् त्याचे काम झाले नाही, असे कधीच घडले नाही. म्हणूनच आज स्वपक्षासोबतच इतर पक्षांतील लोकंही त्यांचे कौतुक करतात.

कोटी, कोटींची विकास कामे अन दांडगा जनसंपर्क हे त्यांचं बलस्थानं राहिलं आहे. विकासाबाबत कायम आग्रही अन आक्रमक पिंड असलेल्या यशोमती म्हणजे ‘आव्हानांना आव्हान देणाऱ्या’ आणि ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’, अशी धम्मक असलेलं नेतृत्व, अशी नवीन ओळख त्यांनी निर्माण केली. अप्पर वर्धा धरणातून शेतकऱ्यांना पाणी मिळावं, यासाठी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात त्यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी केलेलं जनआंदोलन संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलं होतं. तसेच शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर संपूर्ण ताकदीनं त्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा देऊन त्या रस्त्यावर उतरल्या. तो उन्हाळा आजही लोकांच्या स्मरणात आहे.

खंजिरी भजन आणि समाजाला पुरोगामी विचार देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोझरी गुरुकुंज हे यशोमती यांच जन्म गाव. पंचक्रोशीतील दानशूर कुटुंब असलेल्या दिवंगत रावसाहेब ठाकूर(आजोबा) कुटुंबाच्या वारसदार असलेल्या यशोमती यांच्यावर तुकडोजी महाराजांच्या पुरोगामी विचारांचा पगडा कायम राहिला आहे. तसेच मतदारसंघातील वलगाव ही झाडूच्या माध्यमातून समाजमन स्वच्छ करणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची निर्वाण भूमी असल्याने त्याचा विचारांचा प्रभावही त्यांच्यावर राहिला आहे.

आमदार ते राज्याच्या महिला व बालविकास मंत्री, असा प्रवास असलेल्या यशोमती यांना कधी सत्ता असल्याचा मोह स्पर्श करून गेला नाही. जमिनीवरचं नेतृत्व तेव्हाही अन् आताही कायम आहे. उच्च विद्याविभूषित असुनही जिथं जातील तिथं आणि त्या वातावरण, परिस्थितीशी सहज एकरूप होतात, हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मतदारसंघ ते दिल्ली असा मोठा टप्पा त्यांनी गाठला आहे. तरीही तळागाळातील प्रत्येकाला यशोमतीताई ह्या जनसामन्यांशी नाळ जुळलेल्या, अन आपल्या वाटतात. येथेच त्यांचे कर्तृत्व सिद्ध झाले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com