कॉंग्रेसने डुबती नाव सावरण्यासाठी विश्‍वजित कदमांना केले पुढे, वाघायेंची घरपवापसी...

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात आपली नाव डुबताना पाहून कॉंग्रेसने (Congress) पालकमंत्री विश्‍वजित कदम (Vishajeet Kadam) यांच्या माध्यमातून वाघायेंना घरी परत आणले.
कॉंग्रेसने डुबती नाव सावरण्यासाठी विश्‍वजित कदमांना केले पुढे, वाघायेंची घरपवापसी...
Vishwajeet Kadam and Sevak Waghaye CongressSarkarnama

भंडारा : तब्बल दोन वर्षांपासून जिल्ह्यातून गायब असलेले कॉंग्रेस नेते माजी आमदार सेवक वाघाये आज अचानक कॉंग्रेसच्या (Congress) व्यासपीठावर दिसले, अन् अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. भंडारा जिल्ह्यात आपली नाव डुबताना पाहून कॉंग्रेसने पालकमंत्री विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्या माध्यमातून वाघायेंना घरी परत आणले. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून या घडामोडी झाल्याची चर्चा कॉंग्रेसच्या गोटात दबक्या आवाजात सुरू आहे.

जे झाले ते विसरून जा. आता आम्ही तुमचा हात सोडणार नाही आणि तुम्ही आमचा हात सोडू नका, असे म्हणत पालकमंत्री विश्‍वजित कदम यांनी सेवक वाघायेंचे पक्षात स्वागत केले. उल्लेखनीय म्हणजे, कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर नाराज होऊन आपल्या पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत वाघायेंनी वंचित बहुजन विकास आघाडीची वाट धरली होती. आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस अपेक्षित यश मिळविणार नाही, अशी धाकधूक कुठेतरी असल्याने आणि भविष्यात धोका पत्करायचा नसल्याने वरिष्ठांनी वाघायेंच्या घरवापसीसाठी प्रयत्न केल्याचेही सांगण्यात येते.

सन २०१९ च्या निवडणुकीमध्ये साकोली विधानसभा मतदार संघामध्ये ऐन वेळी सेवक वाघाये यांना डावलून नाना पटोले यांना उमेदवारी दिल्याने वाघायेंनी कॉंग्रेस सोडली होती. त्यानंतर कॉंग्रेसला वेळोवेळी त्याचा फटकाही बसला होता. वंचितमध्ये जाऊन वाघायेंनी कॉंग्रेसला फटके देण्याचे काम केले. आज पालकमंत्री विश्‍वजित कदम यांचा भंडारा दौरा होता. हे औचित्य साधून त्यांनी वाघायेंच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली आणि त्यांना स्वगृही परत आणले. हे करताना आम्ही तुमचा हात सोडणार नाही, तुम्हीही आमचा हात सोडू नका, असे त्यांना सांगितले. वाघायेंनीसुद्धा त्यांना प्रतिसाद दिला. पण नाना पटोले यांच्याबद्दलची नाराजी वाघाये लपवू शकले नाहीत आणि जाहीर सभेत ते बोलले.

Vishwajeet Kadam and Sevak Waghaye Congress
नानांच्या भंडारा जिल्ह्यात प्रचाराचे पैसे मिळेनात म्हणून काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

माझ्यासारखा अन्याय कुणावर होऊ नये…

एनएसयुआयपासून मी पक्षासोबत आहे. पक्षाने माझ्यावर अन्याय केला, हे होत असते. पण माझ्यासारखा अन्याय इतर कुणावर होऊ नये, असे माजी आमदार सेवक वाघाये कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर म्हणाले. सोनिया गांधीसुद्धा माझ्या घरी येऊन गेल्या आहेत. मी कॉंग्रेस सोडणे शक्य नव्हते. पण अन्याय झाल्यामुळे मला ते पाऊल उचलावे लागले. मी काही जागा मागितल्या होत्या, त्या मला देण्यात आल्या नाही. आता ३९ जागांचे सोडा, पण मला ज्या ४ जागा दिल्या आहेत, त्यामध्ये १०० टक्के निकाल मिळणार आहे. मी कॉंग्रेसमध्ये परतलो खरा, पण माझी पुढची जबाबदारी डॉ. विश्‍वजित कदम यांची आहे, असेही वाघाये यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in