Congressमधील घोळ मिटेना, भाजपमध्येही धुसफुस, उमेदवारांना घाम फोडतेय ही निवडणूक..

BJP News: नागो गाणार यांच्यावर भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे.
Nago Ganar, Rajendra Zade, Sudhakar Adbale, Satish Itkelwar.
Nago Ganar, Rajendra Zade, Sudhakar Adbale, Satish Itkelwar.Sarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर (Nagpur) शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होऊ घातली आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पण कॉंग्रेसमधील (Congress) घोळ अद्यापही संपलेला नाही. तर भाजपने समर्थन दिलेले शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांच्यावर भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रमुख उमेदवारांपैकी कुणालाही सोपी नाही, असं सध्यातरी दिसतंय.

शिस्तबद्ध म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) नागो गाणार यांचा प्रचार सुरू केला आहे. पण पक्षातील काही लोकांची त्यांच्यावर नाराजी असल्याची माहिती आहे. कारण यावेळी गाणार यांना उमेदवारी देऊ नये, दुसऱ्या कुणाला संधी द्यावी, या विचाराचे काही लोक भाजपमध्ये आहेत. संजय भेंडे, कल्पना पांडे, अनिल शिवणकर, योगेश बन हे चार जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते.

या चौघांसह पूर्व विदर्भातील काही आमदार आणि खासदार गाणारांवर नाराज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गाणारांना यावेळची निवडणूक सोपी नाही, असं दिसतंय. शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे यांनी खूप आधीपासून तयारी सुरू केली. नागपूर पदवीधर निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांना मदत केली होती. वंजारींनी मोठा विजय मिळविला. तेव्हा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत शिक्षक भारतीला मदत करू, असे वचन कॉंग्रेसने दिले होते.

आता कॉंग्रेसने मदत करावी, अशी मागणी राजेंद्र झाडे यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि इतर कॉंग्रेस नेत्यांना केली. पण अद्याप कॉंग्रेसने वचनपूर्तीकडे पाऊल टाकलेले नाही. कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीने अद्याप राजेंद्र झाडे यांना पाठिंबा घोषित केलेला नाही. त्यामुळे झाडे यांना ही निवडणूक सोपी नाही. मागच्या निवडणुकीत झाडे दुसऱ्या स्थानावर राहिले होते.

त्यांना याही वेळी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यास राजेंद्र झाडे विजयी होतील, असे सांगितले जात आहे. त्यासाठी ते कॉंग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी जोर लाऊन आहेत. कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांचा पाठिंबा मिळविण्यात झाडेंना यश आले. पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अद्याप घोषणा केलेली नाही. त्यामुळे झाडेंना संघर्ष करावा लागेल, हे निश्‍चित.

Nago Ganar, Rajendra Zade, Sudhakar Adbale, Satish Itkelwar.
MVA : आता नागपूर शिक्षक कॉंग्रेस, तर नाशिक पदवीधर शिवसेना लढवणार?

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले हेसुद्धा महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी धडपडत आहेत. येवढेच नव्हे, तर महाविकास आघाडीचा पाठिंबा आपल्यालाच आहे, हे त्यांनी काल घोषीतही करून टाकले. कॉंग्रेस नेते आपल्या प्रचारात लागल्याचेही ते काल म्हणाले.

पण त्यांच्या बाबतीतही कॉंग्रेसकडून काहीही ठोस सांगण्यात आलेले नाही. काल रात्री मुंबईत कॉंग्रेस नेत्यांची बैठक झाली. त्यामध्येही निर्णय झाला नाही. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी बोलून घोषणा करणार असल्याचे नाना पटोलेंनी काल सांगितले. महाविकास आघाडीच्या पाठिंब्याशिवाय अडबालेंनही ही निवडणूक जड जाणार, असं दिसतंय.

नागो गाणार, राजेंद्र झाडे आणि सुधाकर अडबाले यांच्यात तिरंगी लढत होईल, असे अनुमान आहे. तिघांसाठीही निवडणूक सोपी नाही. कॉंग्रेसमधील घोळ लवकर मिटल्यास चित्र थोडेफार स्पष्ट होऊ शकते. पण त्यांच्याकडून एक-एक दिवस पुढे ढकलला जात आहे.

इकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर सतीश इटकेलवार जोर लावून आहेत. सर्व राजकीय पक्षांतील अदृश्य हात आपल्याला मदत करतील, अशी अपेक्षा त्यांना आहे. असे झाल्यास ही लढत चौरंगी होईल, यात शंका नाही. पण ही निवडणूक प्रमुख उमेदवारांना घाम फोडणारी ठरणार, हे मात्र निश्‍चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in