
Omkar Anjikar News : सहायक शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे घेऊन तब्बल ६ वर्ष कोणताही मोबदला न देता वेठबिगारी म्हणून सेवा करून घेतली. नागपूरच्या (Nagpur) ओंकार मल्टिपर्पज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओंकार आंजिकर यांच्या विरोधात चैतन्य मांगलकर यांनी पाचपावली पोलीस (Police) स्टेशनला तक्रार केली आहे. यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहिती नुसार नागपूर येथील चैतन्य मांगलकर हे सुशिक्षित बेरोजगार असल्याने सन २०१६मध्ये जय हिंद विद्यालय, गुलशन नगर नागपूर येथे नोकरीच्या निमित्ताने चौकशी करण्यासाठी गेले असता तत्कालीन मुख्याध्यापिका ममता कराडे यांनी ओंकार मल्टीपरपज एज्युकेशन सोसायटी नागपूरचे अध्यक्ष ओंकार भाऊराव अंजीकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट घालून आमच्या संस्थेची शाळा ८०% अनुदानावर असून पुढल्या वर्षी पूर्ण १००% अनुदानावर येईल, असे आश्वासन देऊन मी आमच्या संस्थेत नोकरी लाऊन देतो, असे आश्वासन दिले. त्यासाठी मला २० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले. ते ऐकून आम्ही घरी परत आलो. त्यानंतर तब्बल तीन ते चार वेळा ओंकार भाऊराव अंजीकर यांचे स्वतःहून फोन आल्यानंतर मुलाला पक्की नौकरी लाऊन देतो. हमी देवून मुलाची नौकरी पक्की करून घ्या, अशी संधी पुन्हा येणार नाही व त्याचे वेतन चार ते सहा महिन्यांत चालू होईल, असे आश्वासन अध्यक्ष ओंकार आंजिकर यांनी दिले.
त्यांच्या भूलथापांना बळी पडून २०१६ मध्ये तब्बल १७ लाख ५० हजार रुपये घेवून चैतन्य मांगलकर याला सहायक शिक्षक म्हणून एस.के.बी. उच्च प्राथमिक विद्या मंदिर, यादव नगर नागपूर येथे तब्बल ६ वर्ष बिनपगारी कोणतेही शासकीय आदेश पत्र न देता व कोणताही मोबदला न देता वेठबिगारीसारखी नोकरी करवून घेतली. दरम्यान शासकीय आदेश व वेतनाची वारंवार चौकशी केली असता अध्यक्ष ओंकार अंजीकर यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देवून तब्बल ६ वर्षे टाळाटाळ केली. अध्यक्ष ओंकार अंजीकर व तत्कालीन मुख्याध्यापिका ममता ताई कराडे यांनी संगनमताने फसवणूक केली हे लक्षात आल्यावर मुलाच्या नोकरीसाठी दिलेली सतरा लक्ष पन्नास हजार रुपये परत करण्यासाठी वारंवार विनंती केल्यानंतर ओंकार अंजीकर यांनी स्वतःच्या सहीचे ५ लक्ष रुपयांचे दोन चेक दिले, परंतु त्यांच्या खात्यात रक्कम नसल्याने ते चेक बाऊन्स झाला व कोणतीही रक्कम मिळालेली नाही.
दरम्यान आमची तक्रार करू नका, अशी विनंती करून RTGS च्या माध्यमातून माझ्या खात्यात एकूण १२ लाख रुपये वळते केले. त्यानंतर उर्वरित रुपयांची वारंवार विचारणा केली असता टाळाटाळ करून आज देतो, उद्या देतो अशी बतावणी करून पुन्हा फसवणूक केली व नंतर ओंकार अंजीकर यांनी आपले हस्तक म्हणून ऋषी काळे (मुख्याध्यापक, स्वामी विवेकानंद विद्यालय, बुटीबोरी, नागपूर) यांनी मला वारंवार फोन करून तुम्ही कोणतेही कायदेशीर कार्यवाही करू नका, असे सांगून आम्हाला पुन्हा टोलवाटोलवीची उत्तरे देऊन वेळ वाया घालवला व कायदेशीर कार्यवाही न करण्यासाठी दबाव आणला. या प्रकाराची तक्रार नागपूरच्या पाचपावली पोलिस स्टेशन आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
रॅकेट चालवीत असल्याचा संशय..
नोकरी लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना हेरून नोकरीचे आमिष दाखवून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सदर संस्था शिक्षक भरती घोटाळ्यात व TET घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागातील काही उच्चपदस्थ अधिकारीही यात समाविष्ट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची चौकशी करून, संस्थेची व शाळेची मान्यता रद्द करून न्याय मिळवून देण्याची व फसवणूक करणाऱ्या कथित संस्थेचे अध्यक्ष ओंकार अंजिकर यांनी २०१४च्या विधानसभेत उमेदवार म्हणून अर्जही भरला होता. तेव्हा त्याचा त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत तपासून बेरोजगार तरुणांना फसविणाऱ्या ओंकार आंजीकर व त्यांच्या संचालक मंडळाला गजाआड करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.