
BJP State President MLA Chandrashekhar Bawankule News : भाजपमध्ये १८ ते २५ वयोगटातील २५ लाख युवा वॉरिअर्स महाराष्ट्रात सक्रियपणे काम करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवभारताचा संकल्प केला आहे. २०२४मध्ये पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात हा संकल्प पूर्ण करण्याकरिता २५ लाख युवा सहकार्य करणार आहेत. त्यासाठी यात्रा काढण्यात येत असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Equations are different in each state)
आज (ता. १५) आमदार बावनकुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक बूथवर २५ वॉरिअर्स तयार करण्याची योजना आहे. नमो चषक स्पोर्टच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देणे आणि भारताचे युवक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले पाहिजे, त्यासाठी ही तयारी चाललेली आहे.
कर्नाटकमधील पराभवानंतर महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुका २०२४ नंतर घ्याव्या, असे सांगितले जात आहे. पराभवाच्या भीतीने तो निर्णय घेण्याच्या विचारात भाजप आहे का, असे विचारले असता राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेल्यामुळे या निवडणुकांना उशीर होतो आहे. या निवडणुका त्यांच्यामुळे थांबल्या आहेत. आम्ही यात कुठेही अडचण निर्माण केलेली नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण मागे घेतले, तर निवडणुका केव्हाही लागू शकतात. पण त्यांनी नियमबाह्य पद्धतीने नगरसेवकांच्या जागा वाढवल्या आहेत, प्रभाग वाढवले आहेत. २०२१ची जनगणना न होऊ देता प्रभागांची संख्या वाढवली आहे. आमच्या सरकारने त्यांचा तो निर्णय रद्द केल्याने हा विषय थांबलेला आहे, असे बावनकुळे म्हणाले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी बैठक घेतल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. त्यावर बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, त्यांना काय करायचे आहे, ते त्यांनी ठरवावे. उद्या महाविकास आघाडी एकत्र जरी लढली, तरी आम्ही आपली ५१ टक्क्यांची लढाई लढू. ते तिघे एकत्र आहेत तर इकडे शिवसेना आणि भाजप आम्ही दोघे एकत्र आहोत.
लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील, असे मला वाटत नाही आणि त्या का व्हाव्या? लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा सहा ते साडेसहा महिने असतात आणि हा काळ सर्वांनाच हवा आहे. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची सुतराम शक्यता नाही, असे बावनकुळे म्हणाले. कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत आणि करत आहे, याबाबत विचारले असता, महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष आहे.
भाजप बाजार समित्यांमध्ये आहे, अगदी ग्रामपंचायतींमध्येही आहे. शिवसेना आणि भाजप राज्यात सर्वत्र आहे. आम्ही मिळून ५१ टक्क्यांच्या लढाईची तयारी करत आहोत. कर्नाटकमधील निकालावरून महाराष्ट्राचे अनुमान लावता येत नाही. कारण एखाद्या राज्याच्या निकालाचा संबंध दुसऱ्या राज्याशी जोडता येत नाही. एखादी ग्रामपंचायत जरी जिंकली, तरी त्यांना वाटतं की आम्ही महाराष्ट्रातील निवडणुका जिंकू. पण राजकारण असं नसतं.
कर्नाटकमध्ये (Karnataka) भाजपचे १५ ते २० उमेदवार अगदी ५००पेक्षा कमी मतांनी पडले आहेत. जेडीएसची पाच टक्के मते कॉंग्रेसकडे (Congress) गेली त्याचा फायदा त्यांना झाला. कर्नाटकचा फायदा महाराष्ट्रात (Maharashtra) होईल, असे काही नसते. प्रत्येक राज्यातील समीकरणे वेगवेगळी असतात, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.