
Chandrapur BJP District President Change News : भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आणि त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले. काही घडामोडींनंतर पवारांनी राजीनामा मागे घेतला. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले. (Chandrasekhar Bawankule signaled to change the district president)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप संघटनात्मक बदल करणार आहे. भाजपने नुकतेच राज्याच्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये अनेकांना नारळ देत नवीन पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. त्यानंतर आता राज्यभरातील जिल्हाध्यक्ष बदलले जाणार असल्याची माहिती आहे.
जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपचे राज्य पदाधिकारी विविध ठिकाणी जाऊन, कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्यासाठी विविध बैठकांचे आयोजन जिल्हास्तरावर केले जात आहे. त्यामुळे लवकरच भाजप भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
चंद्रपुरात मागील अडीच वर्षांपासून देवराव भोंगळे भाजपचे ग्रामीण आणि डॉ. मंगेश गुलवाडे शहरअध्यक्ष आहेत. या दोघांबाबत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य समाधानी आहेत काय, याची चाचपणी शनिवारी (ता. ६ मे) करण्यात आली. प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोड त्यासाठी चंद्रपुरात आले होते. त्यांनी वैयक्तिकरीत्या विद्यमान ग्रामीण आणि शहर अध्यक्षांबाबत भाजप पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. नुकताच कॉंग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना भाजपशी युती केली म्हणून पदावरून काढून टाकले. आता त्यानंतर भाजपमध्ये बदलाचे वारे सुरू झाले आहेत.
चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षपदासाठी सध्यातरी कुणी इच्छुक पुढे आलेला नाही. पण शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांना बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे जाणवते आहे. त्यांच्या जागी माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सातत्याने बदल करणे, हा भाजपचा स्वभाव आहे आणि भाकरी फिरवायची, राज्यभरातील जिल्हाध्यक्ष बदलायचे, असे जर वरिष्ठ पातळीवर ठरलेच असेल, तर तसे होईलही, अशी माहिती सूत्रांनी 'सरकारनामा'ला दिली.
चंद्रपूर जिल्हा भाजपमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचेच आजवर वर्चस्व राहिले आहे. शहरअध्यक्ष डॉ. गुलवाडे आणि ग्रामीण अध्यक्ष भोंगळे मुनगंटीवार त्यांच्या खास मर्जीतील आहेत. डॉ. गुलवाडे यांना राजकारणाचा गंध नसतानाही अनेकांचा विरोध पत्करून त्यांना शहराध्यक्षपद देण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्याविषयी भाजपच्या एका गोटात नेहमी रोष राहिला आहे.
देवराव भोंगळेंची संघटनेमध्ये चांगली पकड आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी पक्षासाठी नवीन लोक जोडले आहेत. राजकीय कारकिर्दीच्या सुरूवातीपासून भाजपमध्ये आहेत, पक्षाशी एकनिष्ठ आहेत, याचे फळ त्यांना मिळून ते कायम राहू शकतात, असेही सूत्र सांगतात.
प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घोषणा केल्यापासून अध्यक्ष आणि शहरअध्यक्ष पदासाठी काहींनी मोर्चेबांधणी सुरू केली. भाजपमध्ये (BJP) गटातटाचे राजकारण उफाळून आले आहे. प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोड यांनी भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. प्रत्येकाशी बंदद्वार चर्चा केली. त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठवला जाईल आणि येत्या १५ दिवसांत यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.