Budget Session News: ‘या’ सहायक निबंधकांच्या निलंबनासाठी विरोधक आक्रमक, गोंधळानंतर कामकाज तहकूब !

DDR : डीडीआर चोर आहे. त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे अनेक आरोप आहेत.
Vidhan Parishad
Vidhan ParishadSarkarnama

Vidhan Parishad News: भ्रष्टाचाराचे एक नाही तर डझनभर आरोप असलेल्या सहायक निबंधकाला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत विधानपरिषदेत आज विरोधी पक्षातील सदस्य आक्रमक झाले. सरकारच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यानंतर सभापती निलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केली.

आमदार नरेंद्र दराडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. डझनभरापेक्षा जास्त भ्रष्टाचाराचे आरोप सहायक निबंधक अभिजित देशपांडे यांच्यावर असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर या विषयावर अभिजित वंजारीसुद्धा आक्रमक झाले. ते म्हणाले, हा अधिकारी भ्रष्ट आहे. डीडीआर चोर आहे. त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे अनेक आरोप आहेत.

संस्थांचे कार्यक्षेत्र बदलवणे. कामांना विलंब लावणे, असे गंभीर आरोप आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीही तक्रारी केल्या. एका राजकीय पक्षाचा अजेंडा राबवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केव्हा करणार असा प्रश्‍न आमदार वंजारींनी केला. आमदार अमोल मिटकरींनीही अभिजित देशपांडे यांच्यावर गंभीर आरोप केले. देशपांडे आधी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे होते.

तक्रारींनंतर त्यांची बदली भुसावळ येथे त्यानंतर धुळे येथे करण्यात आली. अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. यावर सभापती निलम गोऱ्हे यांनी प्रश्‍न उपस्थित केले. लक्षवेधी लागली नसती, तर या प्रकरणात चौकशी केलीच नसती का, असा प्रश्‍न करीत पुढील ७ दिवसांत चौकशी करा आणि त्यानंतर निलंबनाची घोषणा करा, असे त्या म्हणाल्या.

Vidhan Parishad
Nilam Gorhe News : नवे महिला धोरणात अंमलबजावणी करणारे कायदे असावेत..

कोण टिकोजीराव लागला ?

या चर्चेत सहभागी होताना भाई जगताप म्हणाले, यासंदर्भात २००२ पासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. उच्च न्यायालयालाही हा देशपांडे जुमानत नाही. दोन महिने बसून राहतो. कोण टिकोजीराव लागला हा. आता कसली चौकशी करणार आहात. त्याने गुन्हा केला आहे. उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. यापेक्षा काय चौकशीची गरज आहे सरकार भ्रष्ट अधिकाऱ्याला संधी देत आहे.

अधिकाऱ्यासमोर सरकार हतबल..

या देशपांडेने धुळ्यामध्ये काय केले, ते बघावे. १० ते १२ गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. हस्ती कोऑप बॅंकेच्या निवडणुकीत २० लाख रुपये नॉमिनेशन साठी त्याने घेतले. त्यावेळी आमदारांनी तक्रार केली तरीही कारवाई झाली नाही. मजूर संस्थांचे काम पैसे घेतल्याशिवाय करत नाही. रेणुका देवी, गोदामाई, सप्तऋंगी मजूर संस्थेसोबत हे घडले आहे, असे जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. या एका अधिकाऱ्यापुढे मंत्री हतबल झाले आहेत. प्रशासनासमोर मंत्री हतबल होत असेल, तर काय म्हणावे. निलंबित केल्यानंतरही चौकशी होऊ शकते. असे झालेले आहे. चौकशीत अडथळेही येणार नाही, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

Vidhan Parishad
Nagpur : ...आणि म्हणून महानगरपालिकेच्या थकित ७०० कोटी मिळण्याच्या आशा उंचावल्या !

निवडणूक (Election) झाल्यावर १५ दिवसांत अधिकारी नेमले पाहिजे. हा माणूस दोन-तीन महिने अधिकारी नेमत नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत. यापूर्वीही सभागृहात या देशपांडेबाबत प्रश्‍न उपस्थित केले. पण आजतागायत त्याच्यावर कारवाई झालेली नाही. उच्च न्यायालयाचे (High Court) निर्देश न पाळल्याने देशपांडेला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली. अभिजित देशपांडे यांची चौकशी सुरू आहे. त्यावर एक महिन्याच्या आत कारवाई करू. चौकशी सुरू असताना कारवाई करणे योग्य नाही. चौकशीच्या आधी निलंबित केले, तर आम्ही अडचणीत येऊ, असे उत्तर मंत्री साळवे यांनी देताच सभागृहात विरोधकांनी गदारोळ सुरू केला. त्यानंतर आधी ५ मिनिटांसाठी त्यानंतर १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in