
Budget sessions News : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कांद्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कांद्याचा मुद्दा उपस्थित करताच सभागृहात चांगलाच गदारोळ उडाला. एका शेतकऱ्याने ५१४ किलो कांदा विकल्यानंतर त्याला केवळ २ रुपयांचा चेक मिळाला, हे सांगताच विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले.
सभागृहात अंबादास दानवे म्हणाले, कांदा आणि कापूस उत्पादकांची जी स्थिती आहे, तीच इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांची आहे. हे सांगत असताना प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांचा विषय मांडावा, असे सभापती निलम गोऱ्हे यांनी म्हणताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ केला.
त्यांना सभापतींनी शांत केल्यानंतर दानवे म्हणाले, जुन्नर तालुक्यातील उदापूरचे शेतकरी दशरथ केदारे यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवशी पत्र लिहून आत्महत्या केली होती. आताही फारशी वेगळी स्थिती नाही. त्यापेक्षाही वाईट स्थिती शेतकऱ्यांची आहे. परवा बार्शी तालुक्यातील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने सूर्या ट्रेडींग कंपनीला ५१४ किलो कांदा मार्केट कमिटीला दिला.
बदल्यात त्याला २ रुपयाचा चेक मिळाला. १७ तारखेला कांदा दिला. त्याला ८ मार्च २०२३चा चेक तोसुद्धा २ रुपयांचा दिला गेला. एक शेतकरी ५१४ किलो कांदा जमा करतो. त्याला २ रपयांचा चेक दिला जातो, याकडे सरकारचे लक्ष आहे का, असा प्रश्न दानवेंनी सभागृहाला केला.
जागतिक बाजारपेठेत कांद्याची कमतरता आहे. युक्रेन, रशीया, फिलिपीन्समध्ये कांद्याला ३००० रुपये भाव आहे. नेदरलॅंड मोठा निर्यातदार देश असूनही तेथे कांद्याचा तुटवडा आहे. मध्य आशियातील देशांमध्ये तुटवडा आहे. मोरक्को, तुर्कीस्थान, उजबेकीस्तान या देशांमध्येही भयावह स्थिती आहे. आपल्याकडे शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकावर नांगर फिरवला. सरकार त्यांना आधार देणार आहे का, हमी भाव देणार का, आदी प्रश्न अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपस्थित केले.
अमरावतीमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज..
नाफेडची खरेदी केंद्र सुरू करणार, असे सरकार (State Government) सांगते. पण तेथेही कांद्याची खरेदी सुरळीत होईल, असे वाटत नाही. काल अमरावतीला (Amravati) शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला. बुलढाण्यात (Buldhana) रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले, तर त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. कापसाचीसुद्धा अशीच स्थिती आहे. घराघरांत कापूस पडून आहे आणी सरकार ऑस्ट्रेलियावरून कापूस गाठी मागव आहे, हा शेतकऱ्यांवरील अन्याय केव्हा थांबणार, असाही सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.