शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख निष्क्रिय; बळकटीसाठी आता हवे दमदार नेतृत्व !

ईटकेलवार यांनी आपल्या गावात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीतही शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार उभे केले नाहीत. हरणे काटोलच्या बाहेर पडत नाहीत.
शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख निष्क्रिय; बळकटीसाठी आता हवे दमदार नेतृत्व !
ShivsenaSarkarnama

नागपूर : नागपूर ग्रामीणमधील सद्यस्थितीत असलेले दोन्ही जिल्हाप्रमुख निष्क्रिय असल्याची ओरड शिवसैनिक करीत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नागपूर दौऱ्यावर आलेले असताना तक्रारीही करण्यात आल्याची माहिती आहे. पक्षप्रमुखांना विदर्भात सेना मजबूत करायची आहे. त्यासाठी जिल्हाभर गरजत राहणाऱ्या दमदार नेतृत्वाच्या शोधात शिवसेना असल्याची माहिती आहे.

शिवसेनेला (Shivsena) आगामी निवडणुकांसाठी लढवय्यांची गरज असल्याने माजी जिल्हाप्रमुख आणि माजी खासदार प्रकाश जाधव यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जात असल्याचे बोलले जात आहे. सध्या नागपूर (Nagpur) ग्रामीणमध्ये राजू हरणे आणि संदीप इटकेलवार असे दोन जिल्हाप्रमुख आहेत. इटकेलवार यांना नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या गावात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार उभे केले नाहीत. हरणे काटोलच्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर वचक ठेवणाऱ्या जिल्हाप्रमुखाच्या शिवसेना असल्याचे कळते.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख बदलताच नागपूर ग्रामीणमध्ये जिल्हाप्रमुख बदलण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे. यात प्रकाश जाधव यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. शिवसेनेने खासकरून नागपूरमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरात शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत दोनदा मुक्कामी राहून गेले. मात्र यानंतरही शिवसैनिक फारसे चार्ज झाल्याचे दिसत नाही. भाजपला अंगावर घेण्याची कोणी हिंमत दाखवत नसल्याचे नेत्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रकाश जाधव यांचे नाव समोर आले असल्याचे समजते. याकरिता सर्वप्रथम ग्रामीणचे संपर्क प्रमुख सूर्यवंशी यांची विकेट घेण्यात आली. त्यांच्या ऐवजी मधुकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Shivsena
तेव्हा शिवसेना कुठे होती हे सुंदर सिंह भंडारींना विचारा : राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

खासदार विनायक राऊत नागपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख असताना देशमुख रामटेक विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख होते. विनायक राऊत यांना नागपूर जिल्ह्याची बारीकसारीक माहिती आहे. राऊत यांच्या सांगण्यावरूनच देशमुख काही काही शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. नवा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. अनेकांना त्यांनी मुंबईला बोलावून चर्चाही केल्याचे समजते. प्रकाश जाधव यांची जडणघडणच शिवसेनेत झाली आहे. रांगडा आणि कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. ते रामटेकचे खासदारही होते.

माजी केंद्रीयमंत्री सुबोध मोहिते मध्येच शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. नारायण राणे यांच्यासह भारी नेत्यांची फौज मोहिते यांनी रामटेकमध्ये प्रचारासाठी आणली होती. मात्र जाधवांनी एका झटक्यात मोहिते यांचे राजकारण संपुष्टात आणले. रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर जाधव यांची खासदारकीची कारकीर्द पुढे सरकू शकली नाही. युती तुटल्यानंतर शिवसेनेने पुन्हा आपले सर्व जुने मतदारसंघ व बालेकिल्ले मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.