BJP's victory resolution : भाजपचा विजय संकल्प, दर्गा व्हाया मंदिर...

J. P. Nadda : एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांनी दर्ग्यावर माथा टेकल्याचे बोलले जात आहे.
J.P. Nadda, Sudhir Mungantiwar and Chandrashekhar Bawankule
J.P. Nadda, Sudhir Mungantiwar and Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chandrapur BJP's News : सन २०१९च्या निवडणुकीत राज्यात फक्त चंद्रपूर (Chandrapur) लोकसभा मतदार संघात भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मिशन-१४४च्या विजयी संकल्प सभेचा शंखनाद चंद्रपुरातूनच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या उपस्थित आज करण्यात आला. हा विजय संकल्प दर्गा व्हाया मंदिर, असा बघायला मिळाला. त्यामुळे भाजपचे (BJP) समर्थकसुद्धा आश्चर्यचकित झाले.

सन २०२४च्या निवडणुकीत प्रत्येक समाज घटकाला चुचकारण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांनी दर्ग्यावर माथा टेकल्याचे बोलले जात आहे. तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव कॉंग्रेसचे बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी केला. चार वेळेचे खासदार आणि केंद्रात मंत्री अहीर यांचा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यातच अहीर राज्यात पराभूत झालेले भाजपचे एकमेव उमेदवार ठरले. राज्यात कॉंग्रेसची नामुष्की धानोरकर यांच्या विजयाने टळली. भाजपच्या कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नात धानोरकर यांचा विजय अडथळा ठरला. तेव्हापासून ही जागा परत घ्यायची, याची खूणगाठ भाजपने बांधली आहे.

दुसरीकडे अहीर यांनी पक्षांतर्गत कुरघोड्यामुळे पराभव झाल्याचे शल्य अनेकदा बोलून दाखविले. आता अहीर यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद दिले आहे. यामाध्यमातून अहीर यांनी पराभव विसरून लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढविणे सुरू केले आहे. पराभूत मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी मिशन-१४४ची आखणी केली. यामाध्यमातून या मतदारसंघात विजय संकल्प सभा, मंत्र्याचे दौरे होतील. त्यांची सुरुवात चंद्रपुरातून झाली. न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित या सभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा स्वतः उपस्थित होते. सभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर नड्डा यांनी टिका केली. हिंद्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा त्यांना सोडली, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी नड्डा यांचे जंगी स्वागत भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले.

सभा आटोपल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी नड्डा जातील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र नड्डा यांनी मैदानावरील दर्ग्याकडे मोर्चा वळविला. तिथे नड्डा यांनी मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत दर्ग्यावर माथा टेकला. चादर चढविली. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर हिंदुत्वाची धार तीव्र झाली. त्यामुळे विरोधी पक्षाचे नेते दर्गा, मशिदीत गेले की त्यांचे छात्राचित्र समाज माध्यमांवर टाकले जाते. भाजप समर्थकांकडून या नेत्यांची येथेच्छ टिंगलटवाळीसुद्धा केली जाते. ‘पाकिस्तानात जा..’ असा सल्लाही दिला जातो. आता स्वतः भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच सर्व धर्म समभावाचा धडा दिला. त्यामुळे भाजपचे समर्थक आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन नड्डा यांनी घेतले. विजयासाठी साकडे घातले. सन २०१९ च्या लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढायचा, असा निर्धार आजच्या सभेत करण्यात आला. तो मार्ग दर्गा व्हाया मंदिरातून जातो, असा संदेशही या नेत्यांनी या निमित्ताने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला.

J.P. Nadda, Sudhir Mungantiwar and Chandrashekhar Bawankule
जे.पी. नड्डा म्हणतात, दिलेला शब्द पाळणारा भाजप हा देशातील एकमेव पक्ष...

दीक्षाभूमीवर वाहनतळ, आंबेडकरी संघटनाचा निषेध..

भाजपच्या विजय संकल्प सभेसाठी चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली. येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहे. ज्या पवित्र दिक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या ठिकाणी एका राजकीय पक्षाच्या सभेसाठी वाहनतळ देणे निंदनीय आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूरच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा निषेध दीक्षाभूमी मुक्ती जनआंदोलन समितीचे मुख्य संयोजक प्रतीक डोर्लिकर यांनी केला. तसेच दीक्षाभूमीच्या संबंधाने लवकरच बुद्ध उपासक - उपासिका तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निष्ठावंत अनुयायांची बैठक आयोजित केली जाणार आहे. यामुळे आंबेडकरी आणि बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी केला. दीक्षाभूमीवर भाजपच्या सभेला येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्याची परवानगी प्रशासनाच्या सांगण्यावरून केली, अशी प्रतिक्रिया राहुल घोटेकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com