भाजपचे खासदार रामदास तडस म्हणाले, शरद पवारांचा मला आशीर्वाद !

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणूक येत्या ३१ जुलै रोजी नागपुरात (Nagpur) होत आहे. अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता तडस (MP Ramdas Tadas) पत्रकारांशी बोलत होते.
MP Ramdas Tadas and Sharad Pawar
MP Ramdas Tadas and Sharad PawarSarkarnama

नागपूर : उज्ज्वल परंपरा लाभलेल्या राज्यातील कुस्तीची गाडी एकेकाळी सुसाट वेगाने धावत होती. सर्व पदाधिकारी व कुस्तीप्रेमी अतिशय खूष होते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये कुस्तीचे व्यापारीकरण झाल्याने व काही जणांनी पैशाची अनियमितता केल्याने या देशी खेळाची प्रतिमा डागाळली. आम्ही या प्रकारांना विरोध केला. त्यामुळेच आम्ही एकत्र होऊन निवडणुकीत उतरलो आहे. बहुतांश मतदार आमच्यासोबत असल्याने निवडणूक बिनविरोध होऊन यावेळी प्रथमच विदर्भाचा अध्यक्ष बनेल, असे मत माजी कुस्तीपटू खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणूक येत्या ३१ जुलै रोजी नागपुरात (Naagpur) होत आहे. अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता तडस (MP Ramdas Tadas) पत्रकारांशी बोलत होते. खासदार तडस म्हणाले, १९५३ मध्ये कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाल्यापासून शरद पवारांपासून (Sharad Pawar) अनेकांनी अध्यक्षपद भूषविले. या काळात कुस्तीची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये हे चित्र बदलले. अधिवेशन भरविताना कुस्तीमध्ये कंपन्या आल्या. ते पैसे देत गेले. त्यातून पुढे आर्थिक गैरव्यवहार झाले.

साताऱ्यातील स्पर्धेच्या वेळी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मिळालेल्या पैशांमध्ये खोटी बिले काढून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. शिवाय काही वयोगटांतील स्पर्धादेखील झाल्या नाहीत. त्यामुळे कुस्तीपटूंचे नुकसान झाले. याविरोधात अनेकांनी आवाज उठविला, उपोषणही केले. ही बाब पवार साहेबांच्याही कानावर टाकण्यात आली. दुर्दैवाने व्यस्ततेमुळे ते याकडे लक्ष देऊ शकले नाही. यासंदर्भात महासंघाकडे तक्रार गेल्यानंतर अखेर राज्य संघटना बरखास्त करून सर्व कारभार तीन सदस्यीय हंगामी समितीकडे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तडस म्हणाले, ९० पैकी ८० मतदारांचा आम्हाला पाठिंबा असल्यामुळे निवडणूक बिनविरोध होऊन नवीन कार्यकारिणी सत्तेत येईल आणि परिषदेच्या अध्यक्षपदी प्रथमच वैदर्भी व्यक्ती येणार आहे. राज्यातील कुस्तीचा सर्वांगीण विकास, हेच आमचे ध्येय आहे. आम्हाला महाराष्ट्रात ऑलिम्पिकदर्जाचे उत्तम पहेलवान तयार करायचे आहेत. आतापर्यंत केवळ दोनच कुस्तीपटू ऑलिंपिकला गेले आहेत. दुर्दैवाने एकालाही पदक जिंकता आले नाही. त्यामुळे भविष्यात आम्हाला ऑलिंपिक पदकेही जिंकायची आहेत. राज्यात पारदर्शी कारभार आणि अनुकूल वातावरण राहिले तरच खऱ्या अर्थाने कुस्तीचा विकास होणार आहे.

MP Ramdas Tadas and Sharad Pawar
Video: ...अन् खासदार रामदास तडस उतरले कुस्तीच्या आखाड्यात

विदर्भातील कुस्तीला चालना देणार..

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत आतापर्यंत विदर्भातील कुस्तीचा पाहिजे तेवढा विकास झाला नसल्याचे दुःख त्यांनी यावेळी बोलून दाखविले. ते म्हणाले, विदर्भात टॅलेंटची कमतरता नाही. केवळ त्यांना संधी आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी भांडणतंटे दूर ठेवून अधिकाधिक स्पर्धा घेण्यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. दर्जेदार खेळाडू तयार करण्यासाठी भविष्यात विदर्भात खेलो इंडियाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तसेच एप्रिल महिन्यात नागपूर किंवा वर्धा येथे हिंदकेसरी स्पर्धा घेण्याचाही आमचा विचार आहे. याशिवाय विदर्भ कुस्तीला मान्यता देण्यासंदर्भातही पावले उचलली जाणार असल्याचे तडस यांनी सांगितले.

शरद पवार आश्रयदाते राहणार..

गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेले शरद पवार यावेळी निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे तडस यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात ते म्हणाले, मी काही दिवसांपूर्वीच स्वतः पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन पाठिंबा व्यक्त केला. त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हालाही गरज आहे. त्यामुळे ते परिषदेचे सल्लागार व आश्रयदाते राहणार आहेत.

कुस्ती लीगला दर्शविला विरोध..

आयपीएलच्या धर्तीवर खेळल्या जाणाऱ्या कुस्ती लीगला रामदास तडस यांनी विरोध दर्शविला आहे. अशा प्रकारच्या लीगमध्ये खेळाडूंचा जास्तीतजास्त कल पैशाकडे असतो. त्यामुळे देशाभिमान शिल्लक राहात नाही. याच कारणामुळे आमचा कुस्ती लीगला पूर्णपणे विरोध आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in