भाजप नेत्यांनी नवनवीन मुहूर्त काढले, पण त्यांचा एकही मुहूर्त साधला नाही...

आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाहीत. एकजुटीने दडपशाहीचा प्रतिकार करतील, असे नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडण्यासाठी भाजपने कसोशीने प्रयत्न केले. त्यासाठी नवनवीन मुहूर्त काढले. पण त्यांचा एकही मुहूर्त साधला नाही आणि साधणारही नाही. कारण संघर्षातून तयार झालेले हे सरकार आहे, यांना ते पाडणे शक्य नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज म्हणाले.

केंद्रातील भाजपचे (BJP) सरकारने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कितीही त्रास दिला, ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला तरी ते महाविकास आघाडी सरकार पाडू शकत नाहीत. आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनही पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडणार नाहीत. एकजुटीने दडपशाहीचा प्रतिकार करतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (MPCC) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

आज टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री, विधानसभा व विधानपरिषद सदस्य तसेच लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची बैठक पार पडली. या बैठकीत डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, खासदार कुमार केतकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार आणि प्रमोद मोरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, खासदार व विधानसभा व लोकसभेचे उमेदवार उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची स्थापना मोठ्या संघर्षाने झाली आहे. भाजप नेत्यांनी दररोज नवनव्या तारखा दिल्या मुहूर्त काढले, पण सातत्याने प्रयत्न करूनही त्यांना सरकार पाडता आले नाही. आता पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून तोच प्रयत्न पुन्हा सुरू असल्याचे संजय राऊत यांनी उघड केले आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असून भाजपने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि तिन्ही पक्ष एकत्रितपणे भाजपच्या दडपशाहीचा मुकाबला करतील. राज्यातील जनता सर्व उघड्या डोळ्यांनी पहात असून ते भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असे पटोले म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, गेल्या वेळच्या अधिवेशनासारखी यावेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणती अडचण येईल, असं वाटत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर पक्षश्रेष्ठी उमेदवारही जाहीर करतील. कोरोनाचे संकट आता हळूहळू कमी होऊ लागले असून आता जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कोरोनामुळे सरकार आणि पक्षाच्या कामावर अनेक बंधने नियंत्रणे आली होती. पण आता रूग्णसंख्या कमी होत असल्याने १० मार्चनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांचे जनता दरबार होणार आहेत. काँग्रेस पक्षाचे मंत्री जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडवणार आहेत. तसेच मुंबईतील प्रदेश कार्यालयातही मंत्र्यांच्या जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहेत. सरकार आणि पक्षाच्या कामकाजात १० मार्चनंतर बदल करून ते अधिक लोकाभिमुख करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात व्हावे अशी आमची इच्छा आहे पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच आजारातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे नागपूर ऐवजी मुंबईत अधिवेशन होतेय. ते अधिवेशनापर्यंत ठणठणीत बरे झाले तर ठिकाण बदलता येईल. अधिवेशन कुठे होते

यापेक्षा विदर्भाचे प्रश्न सुटतात की नाही हे महत्त्वाचे आहे. अधिवेशन मुंबईत झाले तरीही विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेच्या हिताचे तिथल्या विकासाला चालना देणारे निर्णय महाविकास आघाडी सरकार घेईल. मराठवाडा, विदर्भातील औद्योगिक वापराची विद्युत बिलाची समसीडी सुरू ठेवण्यात यावी तसेच कृषी पंपासाठी दररोज १२ तास सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली आहे. विदर्भाचा मुख्यमंत्री असताना विदर्भाचा विकास झाला नाही, विधानभवन पाण्यात बुडाले होते. त्यांनी विदर्भाच्या विकासाची काळजी करू नये महाविकास आघाडी विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com