Gadchiroli जिल्ह्यात भाजपला आली सत्तेची सुस्ती, आगामी राजकीय समीकरणे होणार क्लिष्ट !

NCP राजे धर्मरावबाबा आत्राम ॲक्टीव मोडवर असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे चांगली कामगिरी केली.
Gadchiroli
GadchiroliSarkarnama

राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाची सरकार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, अशी अपेक्षा होती. पण अपेक्षेप्रमाणे कामगिरी झालेली दिसत नाही. राजे धर्मरावबाबा आत्राम ॲक्टीव मोडवर असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात चांगली कामगिरी केली, तर भारत जोडो यात्रेचा फायदा घेत कॉंग्रेसनेही (Congress) नाव कायम ठेवले. पण भाजपला सत्तेची सुस्ती आल्याचे दिसून आले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, (NCP) शिवसेनेचे दोन्ही गट आणि आदिवासी विद्यार्थी संघटनेने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले होते. गावखेड्यांतील मतदारांनी कुणालाही एका पक्षाला स्पष्ट कौल दिलेला नाही, तर प्रत्येक पक्षाला त्यांच्या कुवतीप्रमाणे मते दिल्याचे या निकालातून दिसून येते. भंडारा जिल्ह्याप्रमाणे येथेही भाजपला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. सत्ता असली की, एक तर मस्ती येते नाहीतर सुस्ती येते. येथे भाजपला (BJP) सत्तेची सुस्ती आली, असे म्हणता येईल. ही सुस्ती भाजपला कॉंग्रेसच्या वाटेवर घेऊन गेल्यास नवल वाटायला नको.

भाजपच्या मंडळींनी एकदिलाने काम केले असते, तर निकाल काही और लागले असते, अशी चर्चा दबक्या आवाजात पक्षातले कार्यकर्ते करताना दिसतात. पक्षसंघटनेत पक्षाची तळातली फळी किती मजबूत आहे, हे ग्रामपंचायत निवडणुकीतून दिसत असते. या निवडणुकीत भाजपची ही फळी कमकुवत झाल्याचे दिसते. तुलनेत राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर पक्षांनी चांगले काम केले. तरीही जनतेचा कौल आमच्यासोबत आहे, असे कुणीही म्हणू शकत नाही.

जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले असून केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपलाच ग्रामीण भागातील जनतेचा कौल राहील, असा अंदाज वर्तविला जात असताना या निकालातील कौल संमिश्र दिसून आले. या निकालात भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 7 ठिकाणी सरपंच पद मिळविले असले, तरी काँग्रेस फक्त एकानेच मागे असून काँग्रेसलाही 6 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत 5 ग्रामपंचायती खिशात घातल्या आहेत. तर दक्षिणेकडे मजबूत पकड असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघालाही 3 जागा मिळाल्या आहे.

Gadchiroli
सत्ताधाऱ्यांना गडचिरोली जिल्हा मागास ठेवायचा आहे, झेडपी अध्यक्षांचा आरोप...

या 27 ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना जवळपास सारखेच यश मिळाले आहे. भाजपपेक्षा काँग्रेस एका संख्येने आणि काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस एका संख्येने मागे आहे. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद व नगर परिषदांमधील राजकीय समीकरणे अधिक क्लिष्ट होणार आहेत. सर्वत्र भाजपची हवा असताना काँग्रेसनेही तोडीस तोड कामगिरी केली, राष्ट्रवादी काँग्रेसही मागे नाही आणि आविसंनेही आपली ताकद दाखवली आहे. फक्त शिवसेनेच्या दोन्ही गटांची कामगिरी सुमार झाल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com