Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा : स्थानिक नेत्यांवर चैतन्य कायम ठेवण्याची जबाबदारी…

राहुल गांधी (Rahul Gandhi) शिस्तीचे किती पक्के आहेत, हे या यात्रेमध्ये बघायला मिळाले. त्यांच्यामुळे अनेक नेत्यांनी यात्रेच्या काही दिवस आधीपासूनच पहाटे उठून चालण्याचा सराव केला. तो त्यांना कामी आला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnam

नागपूर : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात तब्बल १४ दिवस होती. यामध्ये पश्‍चिम विदर्भातील वाशीम, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांतून यात्रेने मार्गक्रमण केले. पश्‍चिम विदर्भासह पूर्व विदर्भातील नेत्यांनीही तन, मन, धनाने यात्रेमध्ये योगदान दिले. या यात्रेने निर्माण केलेले सकारात्मक वातावरण कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी कॉंग्रेस नेत्यांवर आली आहे.

यात्रेने महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश केला तेव्हापासून ते निरोप घेईपर्यंत शिस्त बघायला मिळाली. कॉंग्रेसने (Congress) कधी नव्हे तो सोशल मिडीयाचा योग्य वापर केला. त्यामुळे ते १४ दिवस महाराष्ट्रभर भारत जोडोचीच चर्चा होती. राहुल गांधी (Rahul Gandhi) शिस्तीचे किती पक्के आहेत, हे या यात्रेमध्ये बघायला मिळाले. त्यांच्यामुळे अनेक नेत्यांनी यात्रेच्या काही दिवस आधीपासूनच पहाटे उठून चालण्याचा सराव केला. तो त्यांना कामी आला. यात्रेत सहभाग नोंदवला नाही, असा एकही नेता कदाचितच सापडेल. पक्षश्रेष्ठींनी यावेळी प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या आणि संबंधितांनी त्या योग्य पद्धतीने पार पाडल्यासुद्धा, हे यात्रेचे मोठे यश म्हणावे लागेल.

यात्रा विदर्भात दाखल होण्यापूर्वीच कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्यासह अनेक नेत्यांनी तेलंगनामध्ये यात्रेला भेट दिली होती आणि प्रत्येक नेता आपआपल्या प्रभागातून जास्तीत जास्त लोक यात्रेमध्ये कसे सहभागी होतील, याची खटपट करताना दिसला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पूर्ण वेळ राहुल गांधी यांच्यासोबत चालताना दिसले. महाराष्ट्र कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी संपूर्ण मिडिया व्यवस्थापन सांभाळले होते. राहुल गांधी, जयराम रमेश किंवा इतर पत्रकार परिषदा आयोजित करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. पटोले आणि लोंढे हे यात्रेसोबत जवळपास ३५० किलोमीटर पायी चालले.

माजी मंत्री डॉ. नितीन राऊत त्यांचे पुत्र युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याकडे वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील व्यवस्थेची जबाबदारी होती, तर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे बुलढाणा जिल्हा आणि मुख्य म्हणजे संतनगरी शेगाव येथील जाहीर सभेची मोठी जबाबदारी होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. ‘न भूतो न भविष्यति, अशी ही सभा झाल्याचे संतनगरीतील लोकांनी सांगितले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात चार हजाराहून अधिक लोक शेगावच्या सभेसाठी स्वयंस्फूर्तीने गेले होते.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले, ओबीसी जनता या देशाचा कणा आहे...

विदर्भातील कॉंग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार, त्यांची मुलगी शिवाणी वडेट्टीवार, माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजी मंत्री आमदार राजेंद्र मुळक, प्रफुल्ल गुढधे, आमदार अभिजित वंजारी, गिरीष पांडव, युवक कॉंग्रेसचे महासचिव बंटी शेळके, अजित सिंह, आमीर लोरी, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, महिला कॉंग्रेसच्या नॅश नुसरत अली, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, विरेंद्र जगताप, अमर काळे, आमदार अमित झनक, पूजा मानमोडे यांच्यासह कॉंग्रेस सर्व महत्वाचे पदाधिकारी यात्रेमध्ये सक्रिय सहभागी झाल्याचे दिसले. भारत जोडो यात्रेने कॉंग्रेसमधील मरगळ झटकली गेली आणि एक नवचैतन्य निर्माण केले. आता यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात गेली आहे. पण विदर्भ आणि महाराष्ट्रातील नेत्यांपुढे हे चैतन्य कायम ठेवण्याचे आव्हान आहे. कॉंग्रेस नेते हे आव्हान कसे पेलतात, हे २०२४ मध्ये कळणार आहे आणि ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com