भंडारा : प्रदेशाध्यक्षांनी योग्य उमेदवार न दिल्यास कॉंग्रेसची मते फुटणार ?

माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला मदतीचा हात दिला. याच मित्राच्या सहकार्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) जिल्हा परिषदेत येत्या १० मे रोजी सत्ता स्थापन करणार.
भंडारा : प्रदेशाध्यक्षांनी योग्य उमेदवार न दिल्यास कॉंग्रेसची मते फुटणार ?
Nana PatoleSarkarnama

भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेत प्रबळ दावेदार असलेल्या काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी आपसी वाद सुरू झाल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी योग्य उमेदवार न दिल्यास १० मे रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची ८ मते फुटणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून ‘सरकारनामा’ला मिळाली.

भंडारा (Bhandara) जिल्हा परिषदेच्या राजकारणात कालपासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे प्रबळ दावेदारी असूनही केवळ गटबाजीमुळे कॉंग्रेसला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद गमावण्याची वेळ येऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आधी कोरोना नंतर ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवत तब्बल २ वर्षांनंतर भंडारा जिल्हा परिषदेची (ZP) निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली. येत्या १० मे रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. यात ५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्षाला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या असून काँग्रेस जिल्ह्यात सत्तेची प्रबळ दावेदार ठरली आहे.

काल झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा परंपरागत मित्र राष्ट्रवादीने साथ सोडल्यावर भाजपमध्ये नाराज असलेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला मदतीचा हात दिला. याच मित्राच्या सहकार्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिल्हा परिषदेत येत्या १० मे रोजी सत्ता स्थापन करणार, असे जवळपास निश्‍चित झाले होते. आता सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा एक समस्या नाना पटोले याच्यासमोर येऊन ठेपली आहे. ती म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारीची. नाना पटोलेंनी नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षाच्या उमेदवारासाठी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे केल्याचे समजते.

मोहन पंचभाई यांना ‘जुन्या’ काँग्रेसचा विरोध आहे. १० मे रोजी पंचभाई यांचे नाव अध्यक्षपदासाठी आल्यास काँग्रेसची ८ मते फुटणार असल्याचे निश्‍चित असल्याचे बोलले जात आहे. काहीही झाले तरी मोहन पंचभाई यांना मतदान न करण्याचा निर्धार जुन्या काँग्रेसकडून केला असल्याचेही सांगितले जात आहे. ऐन वेळी काँग्रेसची ८ मते फुटल्यास राष्ट्रवादी व भाजप (डॉ. फुके व मेंढे गट) यांना सत्ता स्थापनेची आयती संधी मिळणार असल्याचे बोलते जात आहे. त्यामुळे सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला येन वेळी सत्तेबाहेर रहावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Nana Patole
रामदास आठवले म्हणाले, नाना पटोले डॅशींग; दिली ‘ही’ ऑफर...

भंडारा जिल्ह्यात नवीन काँग्रेस व जुनी काँग्रेस हा वाद काही नवीन नाही. नाना पटोले जुन्या काँग्रेसला डावलून नवीन काँग्रेसच्या सल्ल्यानुसार काम करीत असल्याची ओरड खूप काही सांगून जात आहे. नाना पटोले यांनी पंचायत समितीत सत्ता स्थापनेची जबाबदारी जुन्या काँग्रेसला दिली असती तर काँग्रेसला पंचायत समिती सभापती निवडणुकीत नामुश्की ओढवून घ्यावी लागली नसता. यात काँग्रेस चे जे २१ उमेदवार जिल्हा परिषदेत निवडणूक आले आहेत, त्यात जुन्या काँग्रेसचे उमेदवार जास्त आहेत. त्यांमुळे नाना पटोले यांना जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाची उमेदवारी देण्यापूर्वी जुन्या काँग्रेसचे मत घेणे गरजेचे आहे.

नाना पटोले यांनी मोहन पंचभाई यांचा नावावर शिक्कामोर्तब केल्याचे पुढे आल्यावर जुनी काँग्रेस प्रचंड नाराज झाली आहे. त्यांमुळे ऐन अध्यक्षपदाच्या मतदानाच्या वेळी जुन्या काँग्रेसची ८ मते फुटून ते सदस्य क्रॉस व्होटींग करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे त्याचा फटका काॅंग्रेसला भोगावा लागण्याची शक्यता आहे. त्यांमुळे पक्षश्रेष्ठींनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर पंचायत समितीत नामुश्की ओढवून घेतल्यावर जिल्हा परिषदेतही तिच परिस्थिती आल्यास आधीच नाना पटोले यांच्यावर नाराज असलेली हायकमांड अधिक नाराज होण्याची शक्यता जास्त आहे आणि हे नाना पटोले यांना परवडणारे नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.