Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu and Ravi RanaSarkarnama

Bacchu Kadu : बच्चू कडूंची लढाई राजकीय अस्तित्वासाठी तर रवी राणांची मंत्रिपदासाठी ?

बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) हे दोघेही तोलामोलाचे नेते आहेत. दोघेही स्वतंत्र आहेत. राणांची युवा स्वाभिमानी संघटना तर कडूंची प्रहार संघटना. दोघांचेही संघटन मजबूत आहे.

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींवर फैरी झडत आहेत. त्यातच परवा परवा बच्चू कडूंनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यानंतर काल रवी राणांनी त्यावर जे प्रत्युत्तर दिले, त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) हे दोघेही तोलामोलाचे नेते आहेत. दोघेही स्वतंत्र आहेत. राणांची युवा स्वाभिमानी संघटना तर कडूंची प्रहार संघटना. दोघांचेही संघटन मजबूत आहे. आपआपल्या मतदारसंघात दोघांचीही पकड घट्ट आहे. रवी राणांकडे एक खासदार (पत्नी नवनीत राणा) (Mp Navnit Rana) असल्यामुळे ते सरस ठरतात. खासदार पत्नीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) गृहमंत्री अमित शहा (Shaha) यांच्यापर्यंत त्यांची पोच आहे. इकडे राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत राणांचे मैत्रीचे संबंध आहेत. या जोरावर आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा रवी राणा बाळगून आहेत. तर महाविकास आघाडी सरकारमधले मंत्रिपद त्यागून बच्चू कडू एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीला गेले. त्यामुळे या सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे, अशी त्यांची आग्रही आणि रास्त मागणी आहे.

रवी राणांचे आरोप म्हणजे एकट्या बच्चू कडूंचा प्रश्‍न नाही, तर गुवाहाटीला गेलेल्या ५० आमदारांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍‍न आहे. थेट पैसे घेतल्याचा आरोप करून आमच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्‍नचिन्ह लावले गेले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा आमदारांना पैसे दिले का, हे सांगावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर अद्याप तरी शिंदे-फडणवीसांकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. महाविकास आघाडीतून मंत्रिपद त्यागून बच्चू कडू एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यामुळे मत्रिपदाचा त्यांचा प्रश्‍न नाही, ते मिळेलच. राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. पण रवी राणांची लढाई मात्र मंत्रिपदासाठी आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.

शिंदे-फडणवीस एकाच जिल्ह्यात दोन मंत्रिपदे देणार नाहीत, असे सांगितले जाते आणि रवी राणांना मंत्री व्हायचे आहे. पण शिंदे-फडणवीस सरकार ज्या पद्धतीने स्थापन झाले, त्यामुळे मंत्रिपदावर बच्चू कडूंचा पहिला अधिकार आहे आणि तोच नैसर्गिक न्याय आहे. मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी रवी राणांचा खटाटोप सुरू आहे. त्यासाठी त्यांनी बच्चू कडूंना टारगेट केले आहे. दोन्ही नेते समाजकारणाची, समाजसेवेची सबब पुढे करीत असले तरी दोघांमधली लढाई ही खरी मंत्रिपदासाठीच आहे, ही बाब आता लपून राहिलेली नाही.

प्रतीक्षा १ नोव्हेंबरची..

आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, त्यासाठी बच्चू कडूंनी त्यांना १ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. १ नोव्हेंबरला दिवशी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत अमरावतीच्या टाऊन हॉलमध्ये कडू वाट बघणार आहेत. त्यानंतर ते ॲक्शन मोडमध्ये येतील, असे त्यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता १ नोव्हेंबरला काय घडते, हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.

Bacchu Kadu and Ravi Rana
Bacchu Kadu : रवी राणांबद्दल विचारताच बच्चू कडू म्हणाले, ‘ते स्वतःच तेवढं वात्रट आहे...’

शिदे-फडणवीसांसह मोदी-शहांवरही प्रश्‍नचिन्ह..

गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. जर आम्ही पैसे घेतले तर देणाराही कुणी असेल ना? असा प्रश्‍न बच्चू कडूंनी केला आहे. पैसे देणारे एक तर मुख्यमंत्री शिंदे किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस असतील नाहीतर पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शहा असतील. राणांच्या आरोपानंतर आता त्यांनीच या बाबीचा खुलासा करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर शिंदे किंवा फडणवीसांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

शिंदे-फडणवीस तोडगा काढतील..

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये काहीतरी गैरसमज झालेला आहे. दोघेही चांगले कार्यकर्ते आहेत, दोघेही आपआपल्या मतदारसंघांमध्ये प्रभावी आहेत. गैरसमजातून ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांमधील गैरसमज दूर करतील, असा विश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Bacchu Kadu and Ravi Rana
खिसे कापणारे महाठग : बच्चू कडू यांचा राणा दाम्पत्यावर जहरी प्रहार!

आमदार बच्चू कडूंचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होणार का ?

रवी राणांच्या बच्चू कडूंना विरोध करण्यामागे भाजपची खेळी आहे, अशीही एक चर्चा सध्या सुरू आहे. बच्चू कडूंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठीच राणांना पुढे केले जात आहे. राणा दाम्पत्याकरवी हनुमान चालिसा प्रकरण घडवून भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर सरकार पाडण्यात त्यांना यश आले होते. त्यामुळे बच्चू कडूंचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी भाजपने आमदार रवी राणांना मैदानात उतरविल्याचेही सांगितले जाते. पण बच्चू कडूंचा करेक्ट कार्यक्रम होणार की भाजपला याचा फटका बसणार, याबाबतही राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.

राणांमुळे दुखावताहेत भाजपचे कार्यकर्ते..

गत निवडणुकीत ज्या रवी राणाच्या विरोधात काम केले, त्यालाच जर आता पक्ष आता डोक्यावर घेत असेल, तर आपल्या कामाला काय अर्थ, या मतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील काही भाजप कार्यकर्ते येऊन पोहोचले आहेत. भाजप नेते हल्ली राणांना नको तितके महत्व देतात. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते दुखावले असल्याचे सांगितले जाते. पूर्वी भाजप किरीट सोमय्यांना पुढे करून ‘गेम’ करीत होती. आता राणांना पुढे करून बच्चू कडूंवर निशाणा साधला जात आहे. स्वपक्षीय व्यक्तीला पुढे केल्यापेक्षा इतराला पुढे केलेले केव्हाही चांगले. कारण प्रकरणातून केव्हाही हात झटकता येतात. त्यामुळे भाजपने रवी राणांना पुढे केल्याचे सांगितले जाते. पण रवी राणांसारखा ‘युवा’ नेता आपला ‘स्वाभिमान’ गहाण ठेवेल, असे वाटत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com