Ayodhya Ram Mandir News : श्रीराम मंदिरासाठी चंद्रपुरातून जाणार काष्ठ, भव्य सोहळ्याचे आयोजन !

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले होते.
Sudhir Mungantiwar, Chandrapur.
Sudhir Mungantiwar, Chandrapur.Sarkarnama

Ram Mandir Ayodhya News : चंद्रपूर जिल्ह्यात मिळणारे सागवान काष्ठ देशात सर्वोत्तम आहे. या सागवान काष्ठाचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक केले आहे. (Prime Minister Narendra Modi laid the foundation stone for the construction of the temple)

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी यासंदर्भात मुनगंटीवार यांना सविस्तर पत्र पाठविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी, यासाठी वास्तुतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराचे महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा आणि मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजांसाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे. निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील डेहराडून येथे असलेल्या फॉरेस्ट रिसर्च इंस्टिट्यूटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन अॅन्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली.

चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने मंत्री मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली. मुनगंटीवार यांनी या विषयात व्यक्तिशः: लक्ष घालत सर्वोत्तम दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येला पाठविण्याकरिता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सागवानाचे हे काष्ठ २९ मार्च २०२३ रोजी विधिवत पूजा करून आणि शोभायात्रा काढत अयोध्येकडे रवाना होणार आहे. यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला माहिती मिळताच ट्रस्टने मुनगंटीवार यांना तातडीने पत्र पाठवत या पुढाकाराबद्दल आनंद व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून श्रीराम मंदिरासाठी मिळणाऱ्या लाकडावर अभियंते व कलावंत नक्षीकाम करणार आहेत. सागवानाचे हे काष्ठ मुनगंटीवार यांनी आपल्या हस्ते अयोध्येकडे मार्गस्थ करावे, असेही चंपत राय यांनी पत्रात म्हटले आहे.

Sudhir Mungantiwar, Chandrapur.
BJP News : भाजप इलेक्शन मोडवर : बारामती, इंदापूर, कर्जत-जामखेडमध्ये रविवारी ५२ शाखांचे उद्‌घाटन

असा असेल काष्ठपूजन सोहळा..

चंद्रपूर जिल्हा हा देशातील घनदाट वने असलेला आणि खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा आहे. देशातील सर्वात जास्त वाघ याच जिल्ह्यात आहेत. रामायणकालीन सुप्रसिद्ध दंडकारण्यात वसलेल्या या जिल्ह्याला अगदी रामायण काळापासूनचा इतिहास आहे. त्यामुळेच नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच अतिशय समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरांचा वारसाही चंद्रपूरला लाभला आहे. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातही चंद्रपूर जिल्हा अग्रेसर होता.

ही शोभायात्रा दोन भागांत होणार असून २९ मार्च रोजी बल्लारपूर येथे दुपारी ३.३० वाजता काष्ठ पूजन आणि आरती होऊन दुपारी ४ वाजता पहिल्या शोभायात्रेची सुरुवात होईल. येथे राम लक्ष्मण नावाचे दोन प्राचीन वृक्ष आहेत. त्यांचा घेर देशातच नव्हे तर बहुधा आशियातील सर्व वृक्षांत सर्वात मोठा आहे. या वृक्षांचे पूजन यावेळी करण्यात येईल. ही शोभायात्रा सायं ६ वाजता संपेल आणि त्याच वेळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिरातून दुसरी शोभायात्रा सुरू होईल. चंद्रपूर येथील शोभायात्रा रात्री ९ वाजेपर्यंत चालेल.

Sudhir Mungantiwar, Chandrapur.
Mungantiwar News : ३३ कोटी वृक्षारोपण, उद्धव ठाकरे आणि मुनगंटीवारांची खुली ऑफर !

२१०० कलावंत..

या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे मनोहारी सादरीकरण करण्यात येणार असून, एकूण ४३ प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्यात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून ११००, असे एकूण २१०० कलाकार हे सादरीकरण करणार आहेत.

प्रत्येक चौकाचौकांत विविध कलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शोभायात्रेत पूजन केलेल्या काष्ठांवर घराघरांतून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शोभायात्रा मार्ग रांगोळ्यांनी सजविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गुढ्या तोरणे उभारण्यात येणार आहेत. या शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा “नारीशक्ती – साडॆतीन शक्तिपीठे हा चित्ररथ आणि उत्तर प्रदेशचा प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथही सहभागी होणार आहे.

अरुण गोवील, दीपिका येणार..

काष्ठ वाहून नेणाऱ्या रथाच्या भोवती कलाकारांचे रिंगण राहील. हा चित्ररथ श्रीराम मंदिरात पोहोचल्यावर ही शोभायात्रा चांदा चौकात संपन्न होईल. शोभायात्रेनंतर रात्री १० ते १२ या वेळेत कैलास खेर यांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीरामभक्तीची विविध गीते सादर करण्यात येतील. हा काष्ठ पूजन सोहळा आणि शोभायात्रेत दूरदर्शनवर गाजलेल्या रामायण मालिकेतील कलाकार अरुण गोवील, दीपिका, सुनील लहरी यांच्यासह हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठे कलाकार उपस्थित राहणार आहेत.

एक कोटी श्रीराम नाम जप..

या शोभायात्रेकरिता स्वामी रामदेव बाबा (Ramdeo Baba) तसेच सद्गुरू श्री जग्गी वासुदेव आणि श्रीश्री रवीशंकर यांनाही सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व खासदारांना आणि आमदारांना तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांना या भव्य काष्ठपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. उत्तर प्रदेशचे अनेक मंत्री आणि खासदार व आमदार यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे.

या काष्ठपूजन सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपुरातील (Chandrapur) घरोघरी दहा हजार श्रीराम जपाच्या वह्या वाटल्या असून एक कोटी श्रीराम नाम जपाचा संकल्प करण्यात आला आहे. काष्ठ पूजनात सहभागी होईन श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीत खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com