ऑटोरिक्षाचालक, झेडपी सदस्य, आमदार, ऊर्जामंत्री अन् आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष…

उत्तम उदाहरण म्हणजे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नशिबाची साथ कशी मिळाली आणि आयुष्याला कुठून कलाटणी मिळाली ?
Chandrashekhar Bawankule with Nitin Gadkari
Chandrashekhar Bawankule with Nitin GadkariSarkarnama

नागपूर : एखाद्याचं नशीब केव्हा, कुठे, कसं फळफळेल हे काहीच सांगता येत नाही. अर्थात त्याला प्रयत्नांचे सातत्य आणि परिश्रमांची जोड लागतेच. आपल्या राज्यात काही अशा व्यक्ती आहेत की, ज्यांनी एकेकाळी भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी मिळेल ते काम केले. नशिबाने कलाटणी घेतली अन् आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणातील बुलंद आवाज बनले आहेत. त्यातील एक म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे.

बावनकुळे एके काळी रिक्षा चालवायचे आणि आज राजकारणात (Politics) त्यांचे मोठे नाव आहे, चांगला दबदबा आहे. हिंदी भाषेत एक म्हण आहे की, ‘समय से पहले और किस्मत से ज्यादा किसी को कुछ नही मिलता.’ अगदी याप्रमाणेच प्रामाणिक परिश्रम केले नशिबाने साथ दिली तर काय होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नशिबाची साथ कशी मिळाली आणि आयुष्याला कुठून कलाटणी मिळाली हे आपण आज जाणून घेणार आहोत.

धडपडीला मेहनतीची जोड आणि ठरवलेली गोष्ट करून दाखवण्याची जिद्द असेल तर माणूस कुठे जाऊन पोहोचू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. उदरनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला ऑटो रिक्षाचे स्टेअरिंग हाती धरले. त्यानंतर कोराडी औष्णिक केंद्रात छोटे-मोठे कंत्राट घेऊन कामे करणे सुरू केले आणि योगायोग म्हणजे नंतर त्याच खात्याचे मंत्रिपद भूषवण्याचे भाग्यही त्यांना लाभले. असे म्हटले जाते की, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. ही बाब बावनकुळे यांनाही लागू होते.

कोराडी औष्णिक विद्युत केंद्र उभारले जात असताना त्यांचे वडिलोपार्जित घर या प्रकल्पात गेले. प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्रसुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यावेळी भविष्यात याच खात्याचे आपण ‘बॉस’ होऊ असे स्वप्नही त्यांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी कधी बघितले नव्हते. ऑटो चालवून त्यांनी चरितार्थ चालवला. नागपूर-कोराडी या दरम्यान कितीतरी लोक प्रवासी म्हणून त्यांच्या संपर्कात आले. यातून मिळालेल्या ऊर्जेनेच त्यांचे भवितव्य घडले. असेही म्हणतात की, कुठल्याही क्षेत्रात वर जायचे असेल तर गॉडफादर लागतो. बावनकुळे यांना नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासारखे तगडे गॉडफादर लाभले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही ते अत्यंत विश्वासातले आहेत.

ते जेव्हा राजकारणात आले तेव्हा भाजपला कोणी विचारत नव्हते. भाजपमध्ये काम करणे म्हणजे लष्करात जाऊन घरच्या भाकरी भाजणे, असे म्हटले जात होते. राजकीय घराणे नसल्याने कोणी विचारत नसताना गडकरींसारख्या नेत्याने आपल्यावर विश्वास दाखवला हीच त्यांच्यासाठी समाधानाची बाब होती. त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता भाजपचे काम करणे सुरू केले. या दरम्यान जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली. बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनीही भाजपला निराश केले नाही. ते निवडून आले. त्यावेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आपले सर्व राजकीय कौशल्य दाखवण्याची त्यांना संधी मिळाली. ही निवडणूक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक सक्रिय सदस्य म्हणून अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली.

Chandrashekhar Bawankule with Nitin Gadkari
BJP : भाजपमध्ये लॉबिंग होतच नाही; आमचा फडणवीसांवर विश्वास... बावनकुळे

ही टर्म पूर्ण होत असतानाच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने दिग्गज नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली. तत्कालीन आमदार व राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन बहुजन रिपब्लिकन एकता मंच नावाचा पक्ष स्थापन केला. त्यांनीही रिंगणात उडी घेतली. भाजपचे त्यावेळी फारसे तगडे उमेदवार नव्हते. तेव्हा बड्या नेत्यांच्या लढाईत बावनकुळे यांना भाजपने उतरवले. त्यावेळी डमी उमेदवार म्हणून बावनकुळे यांना संबोधले जात होते. मात्र त्यांनी चमत्कार घडविला आणि आमदारही झाले. त्यानंतर सलग तीन निवडणुका त्यांनी जिंकल्या.

भाजपची सत्ता येताच मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांना ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले. पाच वर्षांचा कार्यकाळ त्यांनी ऊर्जावान मंत्री म्हणूनच गाजवला. दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या व्यक्तीला ऊर्जा खात्याची खडानखडा असलेली तांत्रिक माहिती बघून अनेक वर्षांपासून याच खात्यात काम करणारे अभियंते व अधिकारीही आश्चर्य व्यक्त करायचे. आज बावनकुळे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो, हेच शेवटी खरे आणि तेच बावनकुळेंनी सिद्ध केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com