अतुल लोंढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी रश्‍मी शुक्लांना दिले होते ‘ते’ आदेश…

या प्रकरणात फक्त रश्‍मी शुक्लांवर (Rashmi Shukla) गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचीही चौकशी झाली पाहिजे, असेही अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले.
Atul Londhe on Devendra Fadanvis
Atul Londhe on Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : फोन टॅपिंग प्रकरणात विधानसभेच्या अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालिन डीजीपी संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. समितीने अहवाल दिला आहे. त्यानंतर तत्कालिन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शुक्लांना तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्त अतुल लोंढे यांनी केली आहे.

येवढे मोठे प्रकरण कुणीही अधिकारी स्वतःहून करणार नाही. यामागे नक्कीच मोठ्या राजकीय शक्तीचा हात आहे. त्यामुळे रश्‍मी शुक्लांना (Rashmi Shukla) फोन टॅप करण्याचे आदेश तत्कालिन गृहमंत्री (Home Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीच दिले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात फक्त रश्‍मी शुक्लांवर गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी झाली पाहिजे, असेही अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅपिंग झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या काळात लोकांवर पाळत ठेवण्याचे गुजरात (Gujrat) मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते, असा आरोपही लोंढे यांनी केला आहे.

आज येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना लोकांवर पाळत ठेवण्याचे, त्यांचे खासगी संभाषण चोरून ऐकण्याचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवले जात होते. २०१७-१८ साली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते. अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे दाखवून राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, अमजद खान नाव दाखवून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, निजामुद्दीन बाबू शेख हे नाव दाखवून राज्यमंत्री बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

Atul Londhe on Devendra Fadanvis
भाजपच्या ट्रोलर्सवर कठोर कारवाई करा; काॅंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे,पाहा व्हिडिओ

दहशतवादी कारवाया, अंमली पदार्थांचा व्यापार अशा गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले जाते. परंतु नाना पटोले व बच्चू कडू या नेत्यांचा याच्याशी काहीही संबंध नसताना त्यांचा मोबाईल क्रमांक आणि मुस्लीम व्यक्तींची नावे वापरून त्यांचे फोन टॅप करण्यात आले. ही अत्यंत गंभीर बाब आहे. फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे तसेच हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा आम्ही येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पाठपुरावा करु.

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी फोन टॅपिंगचे रेकॉर्ड त्यांनी कोणाला दिले? फोन टॅपिंगचा मुळ उद्देश काय होता? रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे आदेश कोणी दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील जनतेला मिळाली पाहिजेत. राज्य सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवून तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी, त्यातून या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण होता हे उघड होईल, असे लोंढे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in