
नागपूर : चारही बाजुंनी लक्ष ठेऊन असणारे चार शांत सिंह आणि खाली सत्यमेव जयते, जे मंडुप उपनिषदातून घेतलेलं आहे, असं भारताचं राष्ट्रीय चिन्ह आहे. सत्य, अहिंसा, प्रेम, शांती, विश्वास याचं ते प्रतिक आहे. प्रतिकं कशासाठी असतात, तर ते देशाचा स्वभावगुण दर्शवत असतात. प्रतिकावरून देशाचा स्वभाव आपण ठरवतो. मग त्यातून इतिहास घडतो. भगवान गौतम बुद्ध, महात्मा गांधी, महावीर यांचा शांतिप्रिय हा देश सर्वांना समभाव देणारा देश, असं आपण आजपर्यंत म्हणत होतो.
भारतीय जनता पक्ष (BJP) सातत्याने आक्रमक धर्मांधाचं राजकारण करीत आलेला आहे. सुरूवातीला रामाचं चित्र म्हणजे शांत, संयमी राम, सर्वांना हवाहवासा वाटणार राम, (Ram) असं होतं. मग हातात धनुष्यबाण घेतलेला आक्रमक राम भाजपने समोर आणला. त्यानंतर शक्ती, युक्ती, शांतीचे प्रतिक असलेले हनुमानजी, सर्वांना हवेहवेसे वाटणारे, विशेषतः लहान मुलांमध्ये विशेष क्रेझ असलेले हनुमानजी आक्रोषीत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच श्रृंखलेमध्ये आता राष्ट्रीय प्रतिकाच्या माध्यमातून देशाचा स्वभाव बदलवण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे, असे कॉंग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले.
सेंट्रल व्हिस्टामध्ये भारताचे राष्ट्रीय चिन्ह लावण्यात आले आहे, त्यामध्ये रागीट सिंह लावण्यात आलेले आहे. कुठेतरी रागीट प्रदर्शन त्यामधून घडवायचं आहे, असं दिसतंय. आपले राष्ट्रीय चिन्हे सारनाथमधून घेतलेले आहे. सारनाथमध्ये तो काल आला आणि त्याला का लॉयन किंगडम ऑफ अशोका म्हटले गेले. कलिंगामध्ये युद्ध झालं होतं. ओरीसाला तेव्हा कलिंगा म्हटले जायचे. तेथे तेव्हा लाखो लोकांची कत्तल अशोकाच्या हातून झाली होती. त्यानंतर सम्राट अशोक फार दुःखी झाले. नंतर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी बौद्ध धर्माची कास धरली. त्याला धेरीघोषापासून तर धम्मघोषापर्यंतचा प्रवास, असं म्हटलं गेलं आहे आणि २५० साली तो लावण्यात आला. या बाबी नरेंद्र मोदी यांनी लक्षात घेतल्या पाहिजे, असे लोंढे म्हणाले.
सम्राट अशोकांनी हा प्रवास केल्यानंतर युद्ध नव्हे तर बुद्ध, ही निती अवलंबण्यात आली. सन १९७४ मध्ये जेव्हा अणुस्फोट करण्यात आला होता, तेव्हाही हीच निती अवलंबण्यात आली होती. ही बाजू जर आपण बदलवण्याचा प्रयत्न केला, तर श्रीलंकेकडे आपण बघितले पाहिजे. त्यांच्या झेंड्यावर सिंहाच्या हातामध्ये तलवार आहे आणि आज त्यांची काय स्थिती झाली आहे, हे आपण बघतो आहे. ज्या ज्या देशांनी हिंसेचा मार्ग पत्करला, भूमध्ये समुद्रापासून पाकिस्तानपर्यंत त्यांची काय अवस्था आहे, हेसुद्धा आपण बघितले पाहिजे.
ज्या ज्या देशांनी अहिंसा, प्रेम, समता, समानता या गोष्टी स्विकारल्या, ते देश आज प्रगतीपथावर आहेत. अमेरिका, युरोपमधील काही देश आणि भारत हिंसा स्विकारलेल्या देशाच्या तुलनेत आज कुठे आहेत, याची तुलनत्मक मिमांसा आपण केली पाहीजे आणि त्यानंतर आपल्या देशाचे प्रतिक ठरवले पाहिजे, असे अतुल लोंढे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.