एसडीओंवरील हल्ला हा जीवे मारण्याचा प्रयत्न!, पवनी पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष...

ही घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यात वाळू तस्करांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.
एसडीओंवरील हल्ला हा जीवे मारण्याचा प्रयत्न!, पवनी पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष...
Bhandara Attack on SDO, Bhandara latest Marathi NewsSarkarnama

भंडारा : वाळू तस्करांवर कारवाई करायला गेलेले भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर वाळू तस्करांनी (Sand Mafiya) केलेला हल्ला हा साधा हल्ला नसून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पवनी पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Attack on SDO in Bhandara)

उपविभागीय अधिकाऱ्यांचा गाडीत हल्लेखोरांचे तुटलेले पावडे व मोठमोठाले दगड आता जीवघेण्या हल्ल्याची साक्ष देत आहेत. तर दुसरीकडे ही घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यात वाळू तस्करांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. आताही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात याहीपेक्षा गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीच्या सुबक वाळूला विदर्भात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे वाळू तस्करांची नजर या जिल्ह्याकडे आहे. भंडारा जिल्ह्यात वाळू तस्करी जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे भंडाऱ्याच्या वाळूला नागपुरात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने पवनी तालुका वाळू तस्करीचे ‘हब’ बनले आहे. वाळू तस्करीच्या हबमधून तस्करी सुरू असल्याची गोपनीय माहिती भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांना मिळाली होती. त्यावरून बुधवारी पहाटे ते तलाठी, पोलीस कर्मचारी असलेल्या पथकासह पवनी निलज रस्त्यावर आपल्या वाहनाने गेले होते. पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास रेतीचे चार-पाच टिप्पर एकापाठोपाठ येताना त्यांना दिसले. टिप्परला थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर बेटाळाजवळ टिप्पर पथकाने टिप्पर अडविला.

Bhandara Attack on SDO, Bhandara latest Marathi News
वाळू तस्कर व महसुल-पोलीस प्रशासनाच्या मिलीभगत विरोधात भाजप आमदाराचे उपोषण

कुणाला काही कळायच्या आतच 15 ते 20 तस्करांनी हातात काठ्या दगड, फावडे घेऊन हल्ला पथकावर हल्ला चढवला. यात उपविभागीय अधिकारी राठोड जखमी झाले असून त्यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यात हल्लेखोरांनी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कसेबसे 15 ते 20 लोकांच्या टोळीतून स्वतःचा बचाव केला. या प्रकाराची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले खरे मात्र तोपर्यंत तस्कर पसार झाले होते. लागलीच उपविभागीय अधिकारी राठोड यांनी पवनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विशेष म्हणजे लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरात दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या पथकांवर रेती तस्करांनी लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. लाखनीच्या प्रकरणात दोन तस्करांना अटकही करण्यात आली होती. दुसरीकडे कारवाई करायला गेलेल्या पवनीच्या तहसीलदार नीलिमा रंगारी यांना वाळू तस्करांनी दमदाटी गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. आता थेट एसडीओंच्या पथकावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ माजली असून ही घटना भंडाऱ्यात वाळू तस्करांना झुकते माप देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.