नागपूरकरांच्या हृदयांवर सत्ता गाजविलेल्या अटलबहादूरसिंग यांचे निधन

माजी महापौर सरदार अटलबहादूरसिंग Sardar Atal Bahadur Singh गेल्या काही वर्षांपासून अस्वस्थ होते. परंतु त्यांना भेटायला जाणाऱ्यांसोबत ते अत्यंत हसतमुखपणाने गप्पांमध्ये रंगत होते.
नागपूरकरांच्या हृदयांवर सत्ता गाजविलेल्या अटलबहादूरसिंग यांचे निधन
Former Mayor Sardar Atal Bahudar SinghSarkarnama

नागपूर : संत्रानगरीच्या महापौरपदी दोनदा विराजमान सरदार अटलबहादूरसिंग यांचे आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास निधन झाले. एकेकाळी महापालिकेसह नागपूरकरांच्या हृदयावर सत्ता गाजविणाऱ्या अटलबहादूरसिंग यांच्या निधनाने शहराच्या राजकीय क्षितिजावरील तारा निखळला. मृत्युसमयी त्यांचे वय ७९ होते.

माजी महापौर सरदार अटलबहादूरसिंग गेल्या काही वर्षांपासून अस्वस्थ होते. परंतु त्यांना भेटायला जाणाऱ्यांसोबत ते अत्यंत हसतमुखपणाने गप्पांमध्ये रंगत होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सदर येथील शांती मोहन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे चाहते, मित्र आदींनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाचे वृत्त दिल्ली येथील त्यांचे चुलत बंधू तसेच बंगळुरू येथे पुतण्यांना देण्यात आले. ते आज सायंकाळपर्यंत शहरात पोहोचण्याची शक्यता माजी महापौर कुंदा विजयकर यांनी व्यक्त केली.

अटलबहादूरसिंग यांच्यावर उद्या अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचेही कुंदा विजयकर यांनी सांगितले. सरदार अटलबहादूरसिंग यांची महापालिकेच्या राजकारणावर जबरदस्त पकड होती. ते १९७४-७५ तसेच १९९४-९५ असे दोनदा महापौर होते. १९९४-९५ या त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात पावसाने कहर केला होता. अख्खे शहर पाण्याने तुंबले होते. त्यात शहराचे मोठे नुकसान झाले. त्यांनी शहर पूर्ववत करण्यासाठी नागपूरकरांकडून वर्गणी गोळा केली होती. त्यामुळे त्यांनी शहरवासीयांच्या हृदयात वेगळे आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांनी लोकमंच नावाचा राजकीय पक्षही काढला होता. ते खऱ्या अर्थाने शहराचे किंगमेकर होते. त्यांच्या मर्जीशिवाय त्या काळात कुणीही महापौर होत नसे.

राजकारणासोबतच शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपली छाप सोडली होती. त्यांनी पक्षीय राजकारणातील मतभिन्नता वेगळी ठेवून प्रत्येकाशीच मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध ठेवले व ते जपलेही. त्यांना तीन वर्षापूर्वी खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत क्रीडामहर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. याशिवाय महापालिकेतर्फेही त्यांचा गौरव करण्यात आला होता.

दिलदार मित्र गमावला : नितीन गडकरी

नागपूर शहराचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनामुळे एक जिवश्च-कंठश्च आणि दिलदार मित्र आपण गमावला असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक संदेशात व्यक्त केली आहे. कधीही जात-धर्म-पंथ या भेदांत न अडकलेले अटलबहादूर हे माझ्यासाठी मित्र आणि सुहृद होते. त्यांचा-माझा संबंध दीर्घकाळापासूनचा होता. आमची मैत्री पक्षातीत होती व शेवटपर्यंत टिकली. एक अनमोल मित्र गमावल्याचे अपार दुःख मला झाले आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

अटलबहादूर सिंग हे नागपूरच्या राजकारणात सदैव किंगमेकरच्या भूमिकेत वावरले. त्यांच्या नेतृत्वातील लोकमंचाने नागपूर महापालिकेच्या राजकारणात दीर्घकाळ भूमिका बजावली आणि सत्तेचे संतुलन राखण्यात योगदान दिले. महापौर म्हणून त्यांची कारकीर्द सर्वांच्या लक्षात राहील अशी होती. या शहराबद्दल त्यांना फार आस्था होती, प्रेम होते. त्यामुळे या शहरावर कोणतेही संकट आले तरी सर्वप्रथम धावून जाणाऱ्यांमध्ये, मदत देणाऱ्या व उभारणाऱ्यांमध्ये अटलबहादूर सिंग असत. संवेदनशील व सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेली व्यक्ती म्हणून ते नागपूरकरांच्या सदैव स्मरणात राहतील. दिलेला शब्द पाळणारा आणि कृत्रिम भेदाभेदांच्या पल्याड जाऊन माणुसकीसाठी राबणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्या अनेक आठवणी माझ्या मनात दाटून आल्या आहेत, असेही श्री. गडकरी यांनी म्हटले आहे. आम्ही मैत्रीचा धर्म अखेरपर्यंत पाळू शकलो आणि त्याचे सर्व श्रेय मी माझ्या या दिवंगत मित्राला देतो, अशा शब्दांत गडकरी यांनी अटलबहादूर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला : देवेंद्र फडणवीस

नागपूरचे माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग यांच्या निधनाने नागपूरचे कला-सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारा, शहराच्या विकासासाठी नितांत कळकळ असलेला आणि प्रखर राष्ट्रवादी नेता हरपला आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

सरदार अटलबहादूर सिंग यांनी नागपूरच्या सामाजिक-राजकीय संस्कृतीला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला सारत ते नेहमीच अग्रेसर असायचे. विद्यार्थी नेता ते समाजाच्या सर्वच क्षेत्रात नेतृत्व प्रदान करण्याचे काम त्यांनी केले. एक प्रखर राष्ट्रवादी म्हणून त्यांचा लौकिक होता. स्वातंत्र्यलढ्यातील सर्वच क्रांतिकारकांबद्दल त्यांना प्रचंड अभिमान होता. ते विद्यार्थी नेते असताना विद्यापीठातील विविध परिसरांना शहिदांची नावे देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांसाठी तर होतातच. पण, ते महापौर असताना फुले मार्केटमध्ये गरिबांसाठी पं. हरिप्रसाद चौरसिया आणि बिसमिल्ला खान यांचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता.

Former Mayor Sardar Atal Bahudar Singh
गडकरी, फडणवीसांना पत्करायची नाही जोखीम, नगरसेवकांना पाठवले घरोघरी...

या संकल्पनेने ते कलावंतही इतके प्रभावित झाले की, त्यांनी मानधन न घेता हा कार्यक्रम केला. सतत अभिनव संकल्पना ते राबवायचे. ‘ग्रामसेवक’च्या रूपाने त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमांतून लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. ध्येयसमर्पित जीवन जगलेला नेता त्यांच्या निधनाने आपल्यातून हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in