
Nagpur Political News : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटा आरोप केला. त्यांनी हा आरोप शरद पवारांच्या सांगण्यावरून केल्याची माहिती आहे, असा खळबळजनक आणि गंभीर आरोप भाजपच्या ओबीसी विभागाचे प्रमुख नेते, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला. (We live close to each other in Nagpur too)
आज (ता. ५) डॉ. देशमुखांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनिल देशमुख आणि माझे अतिशय जवळचे संबंध आहे. गावाला आमचा वाडा एक आहे. काटोलला घर एक आहे. नागपुरातही आम्ही जवळ जवळच राहतो. त्यामुळे आमच्या घरी टाचणी जरी पडली, तर त्यांना कळते आणि त्यांच्या घरी फोन जरी आला, तरी आम्हाला ते कळते.
शरद पवारांनी (Sharad Pawar) फोन करून त्यांना सांगितले की, अशा प्रकारचा आरोप तुम्ही गृह मंत्रालयावर करा. त्यासोबत काटेवाडी गाव जे पवारांच्या बारामती तालुक्यात आहे. तेथील एका अज्ञात व्यक्तीला अजित पवारांना (Ajit Pawar) सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यास शरद पवारांनी सांगितले. अजित पवार हे त्यांचे आमदार घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले आणि शरद पवारांचा पक्ष जिर्ण झाला. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
मराठा समाजाची आड घेऊन पवार आता राजकारण करत आहेत. अनिल देशमुखांनी मराठा समाजाची आणि महाराष्ट्राची माफी मागावी आणि खोटेनाटे आरोप करण्यापासून लांब राहावे. ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबीदेखील आहेत. त्यांना आरक्षण २७ टक्क्यांपैकी १४ टक्केच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. त्यासाठी वेगळा कोटा सरकारने तयार करावा, असे माझे मत आहे आणि भाजपचीही तीच भूमिका आहे, असे आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले.
मराठा समाजाची आड घेऊन अजित पवारांना अडचणीत आणायचे आणि त्यांना आपल्या पक्षात परत आणायचे, असा घाट शरद पवारांनी घातला आहे, अशी शंका नाही. तर खात्रीची माहिती माझ्याकडे आहे. या आंदोलनाच्या मागून स्वतःची राजकीय पोळी शेकून घेण्याचे काम शरद पवार करत आहे. अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठीच कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण केली जात आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारच नाही तर आमच्यासारखे सर्व नेते ओबीसी आरक्षणाची टक्केवारी कमी होऊ देणार नाही. त्या व्यतिरिक्त मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. आता गृहमंत्री नसताना अनिल देशमुखांना गृह मंत्रालयातील सर्व गोष्टी माहिती होत आहेत. पण जेव्हा ते गृहमंत्री होते, तेव्हा त्यांना काहीच माहिती मिळत नव्हती का, असा सवाल आशिष देशमुख यांनी केला.
मनसुख हिरेनची हत्या झाली, हे त्यांना माहिती झाले नाही. अंबानींच्या घरामोर स्फोटके कुणी लावली होती, हेही माहिती झाले नव्हते. सचिन वाझे मुंबईच्या बार मालकांकडून वसुली करत होता, याचीही माहिती त्यांना गृहमंत्री असताना नव्हती. पालघरला साधूंवर झालेल्या हल्ल्याची माहिती अनिल देशमुखांना मिळाली नव्हती.
कोरोनाच्या काळात वाधवान कुटुंबाला प्रवासाची परवानगी कुणी दिली, हे त्यांना माहिती होते का?आता माजी झाल्यावर त्यांना सर्व माहिती कशी काय मिळू शकते, असा सवाल आशिष देशमुख यांनी केला. ज्यांच्याकडून ही माहिती मिळाली, ते अनिल देशमुख आणि सहभागी सर्वांची नार्को टेस्ट केली पाहिजे, असेही डॉ. आशिष देशमुख म्हणाले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.