
Malpractice happened during the tenure of Home Minister : ज्यांना गल्लीत कुणी विचारत नाही, अशा कॉंग्रेस नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत संधी दिली आहे. हे केल्याने काहीही फरक पडणार नाही. कॉग्रेसला चांगले दिवस येतील, असेही काही नाही. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणखी डबघाईस आल्यास नवल वाटू नये, असे म्हणत भाजप नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींवर निशाणा साधला आहे. (Believing in Modi's development politics, the NCP leaders joined the BJP)
आज (ता. २१) नागपुरात साम टीव्हीसोबत बोलताना आशिष देशमुख म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत आले. महाराष्ट्राचा विकास करता यावा, हा त्यांचा प्रांजळ उद्देश आहे. पवार म्हणत असतील, की अनिल देशमुख गेले नाही. तर त्याने काहीही फरक पडत नाही.
अनिल देशमुखांच्या गृहमंत्रिपदाच्या काळात अनियमितता आणि गैरव्यवहार झाले. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळे ते संलग्नित करून घेण्यासाठी मनाई केली म्हणून आज अनिल देशमुख शरद पवारांसोबत आहेत. भारतीय जनता पक्ष किंवा केंद्र सरकार कुठल्याही यंत्रणेच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करत नाही. ज्यांनी कुणी अनियमितता, गैरव्यवहार केले, त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणा कारवाई करीत असतात, असे डॉ. देशमुख म्हणाले.
दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, वळसे पाटील हे शरद पवारांचे स्वीय साहाय्यक होते. तेव्हापासून त्यांची पवारांसोबतची जवळीक पाहिली आहे आणि आज त्यांनाच शरद पवारांवर विश्वास नाही.
सन १९७८ पासून ते आजतागायत असे अनेक लोक आहेत की, ज्यांनी शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले आणि अगदी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळातही बघितले तर ६० ते ७० आमदारांपेक्षा जास्त आमदार आजतागायत ते निवडून आणू शकले नाहीत.
अरविंद केजरीवाल स्वतःच्या बळावर दोन-दोन राज्यांत सरकार आणू शकतात. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर सत्ता आणू शकतात आणि तीसुद्धा तीन वेळा आणि पवारांनी आजवर कधीही एकट्याच्या बळावर महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित केलेली नाही, हे जगजाहीर आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांचे म्हणणे कुठे चुकले, असे वाटत नाही.
येणाऱ्या लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पुन्हा डबघाईस आल्यास नवल वाटू नये. कॉंग्रेसने सीडब्ल्यूसीमध्ये युवकांना ५० टक्के स्थान देण्याचे आश्वासन रायपूर आणि उदयपूरच्या अधिवेशनामध्ये दिले होते. १० महिन्यानंतर सीडडब्यूलसी गठीत झाली, त्यामध्ये फक्त तीन लोक ५० वर्षांच्या आतील वयाचे आहेत.
कॉंग्रेसने (Congress) पुन्हा एकदा युवकांना दूर लोटण्याचे काम केले आहे. ओबीसी (OBC) चार, आदिवासी तीन आणि ८० - ८५ वर्षांच्या लोकांना स्थान देण्यात आले आहे. जुन्याच बॉटलमधअये जुनेच औषध कॉंग्रेस देणार असेल, तर कॉंग्रेसचा दारूण पराभव होणार, हे निश्चित असल्याचे डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी ठामपणे सांगितले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.