Bawankule : कुणाबद्दल बोलतोय, काय बोलतोय, याचा विचार अंधारेंनी करावा...

आपली आमदारकी टिकेल की नाही, असे आव्हाडांना वाटत असते. म्हणून अधूनमधून ते अशी नौटंकी करत असतात, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : सुषमा अंधारेंना येवढंच सांगणं आहे की, त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी जपून बोलावं, ज्यांच्याबद्दल त्या बोलतात, त्या नेत्यांची उंची आणि स्वतःची उंची त्यांनी तपासून घ्यावी आणि मग बोलावे. महिलांचा आम्ही आदर करतो, त्यांनी महिला असल्याचे तारतम्य बाळगून बोलले पाहिजे. कारण समोरच्याचे तारतम्य सुटले तर पुन्हा महिलांच्या अपमानाचा विषय होतो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर आम्ही काही प्रतिक्रिया देत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आज नागपुरात (Nagpur) आले असता विमानतळावर (Nagpur Airport) आमदार बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अंधारेंना केवळ देवेंद्र फडणवीसच दिसतात. सुपारी घेतल्यासारख्या त्या बोलतात. अंधारे आणि फडणवीसांची (Devendra Fadanvis) कुठेही बरोबरी होऊ शकते का? असा सवाल बावनकुळेंनी केला. त्यांच्यावर जे काम सोपविले आहे, तेच त्या करत आहेत. पण त्यांनी ज्यांच्याबद्दल बोलतात, त्यांची उंची तपासली पाहिजे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला, याबाबतीत विचारले असता, आपली आमदारकी टिकेल की नाही, असे आव्हाडांना वाटत असते. म्हणून अधूनमधून ते अशी नौटंकी करत असतात, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत गलिच्छ शब्दांत टीका केली, यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्यांचा पक्ष चालवायचा आहे, ते काम त्यांनी करावे आणि महिलांचा सन्मानच प्रत्येकाने केला पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, सरकारमधील मंत्र्यांनी कुणावरही टिका टिप्पणी करू नये. अब्दुल सत्तारांच्या प्रकरणात मुख्यमंत्री लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. पवार कुटुंबावर आरोप करण्यासाठी अनेक जागा आहेत. पण महिलेच्या बाबतीत जे वक्तव्य केले गेले, खासकरून खासदार सुप्रिया सुळेंच्या बाबतीत जे बोलले गेले आहे, असे कुणीही बोलू नये. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्या पद्धतीने जनआक्रोश करीत आहे, ते योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
बावनकुळे म्हणाले, ...म्हणून पेंग्वीन सेना घेऊन ते 'टीव टीव' करीत आहेत; केजरीवालांवरही टिका !

यापूर्वीचा इतिहास बघितला तर असे लक्षात येते की, महाराष्ट्रात अनेक महिलांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार असताना सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आलेली आहेत. जेलमध्ये असलेले संजय राऊतसुद्धा आक्षेपार्ह बोलले आहेत. याचा अर्थ अब्दुल सत्तारांनी केलेले विधान मान्य आहे, असे नाही. तर सर्वांनीच ही बाब पाळली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महिलांचा अपमान झाल्याची ५० प्रकरणे सांगता येतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या नेत्यांनी भाजपच्या महिला नेत्यांवर आणि एकंदरीत महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह टिका टिप्पणी केली आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आणि काही नेत्यांच्या स्वतःच्या सोशल मिडिया हॅंडलवरून खूप काही वाईट वाईट कार्यकर्त्यांनी तेव्हा लिहिले आहे. पण जास्त मागे जाऊन विचार करू नये. यापुढे प्रत्येक नेत्याने महिला नेत्यांच्या बाबतीत बोलताना विचारपूर्वक बोलले पाहिजे, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in