Prashant Kishor : मागणीचा रेटा रचनात्मक पद्धतीने पुढे नेल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य शक्य...

नागपूर येथे डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी सुप्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना निमंत्रित केले होते.
Dr. Ashish Deshmukh and Prashant Kishor
Dr. Ashish Deshmukh and Prashant KishorSarkarnama

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य होणे हे पूर्णतः शक्य असून या आंदोलनासाठी एका परिपूर्ण रणनीतीची गरज आहे. कुठलाही प्रस्थापित राजकीय पक्ष जो सत्तेत असो किंवा विरोधात हा विदर्भ राज्य देणार नाही. विदर्भ राज्य हे सध्या विदर्भ राज्यासाठी कार्यरत असलेल्या विविध पक्ष, संघटना आणि समर्पित विदर्भवादी कार्यकर्त्यांकडूनच होईल. स्वतंत्र विदर्भ राज्याचा रेटा रचनात्मक पद्धतीने पुढे नेल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य लवकरच अस्तित्वात येऊ शकेल, असे प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना म्हटले आहे.

विदर्भातील (Vidarbha) जनतेने आपल्या सूचना द्याव्यात. त्यात रोजगार, शेतकरी, उद्योग, खनिज, पर्यटन, कुपोषण असे सर्वच मुद्दे समाविष्ट करावेत. त्यानुसार सर्वंकष रणनीती तयार करून विदर्भाचा मुद्दा पुढे नेता येईल. विदर्भासाठी १०० वर्षे वाट बघितली, अजून १०० दिवस वाट बघितल्यास आंदोलनाचे एक पक्के मॉडेल तयार करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्यासाठी वारंवार बैठकी घेण्यात येतील. ३६० डिग्रीचा विचार करून, विदर्भाच्या भावनेला एका साच्यात टाकून मूर्तरूप द्यायचे आहे आणि हे निश्चितपणे होणे आहे. सुनियोजित पद्धतीने विदर्भ राज्य १०० टक्के निर्माण होणार. विदर्भासाठी कुठल्याही पक्षासोबत काम करीत नसून वैदर्भीय जनतेची दयनीय अवस्था आपल्या गैर-राजनैतिक कार्यशैलीने व रणनीतीने दूर करणार असल्याचेही ते म्हणाले.

Dr. Ashish Deshmukh and Prashant Kishor
प्रशांत किशोर यांच्या सोबत आशिष देशमुख नव्याने उभारणार स्वतंत्र विदर्भाची चळवळ !

नागपूर वगळल्यास विदर्भाची स्थिती बिहारसारखीच (Bihar) आहे. तेलंगणा राज्यातून हैदराबाद वेगळे केल्यास त्या राज्याची स्थिती विदर्भासारखीच आहे. विदर्भाची चळवळ धारदार व्हावी, जेणेकरून त्या चळवळीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचावा. समाजाला जागृत केल्यास ते सहज शक्य आहे. वेगळ्या विदर्भाचा रस्ता समाजातून उघडेल. विदर्भातील १० खासदार विदर्भ राज्य देऊ शकत नाही. त्यासाठी २.५० कोटी जनता या चळवळीचा हिस्सा होणे गरजेचे आहे. जनतेच्या मनात विश्वास आणि आशा निर्माण केल्यास विदर्भ राज्य मिळणार. विदर्भवादी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात युवकांनी या आंदोलनात भाग घ्यावा. जाती-धर्माला बाजूला सारून विदर्भप्रेमींना एकत्र आणावे. २-३ वर्षे कठोर मेहनत केल्यास विदर्भ राज्य सहज शक्य आहे, त्यासाठी आक्रमक होण्याची गरज नाही. यश मिळविण्यासाठी मी हे काम हाती घेतले आहे. त्यासाठी कठोर परिश्रम करायची तयारी आहे.

सर्वांनी मिळून संपूर्ण ताकद, समर्पण, स्थिरता, गंभीरता आणि प्रामाणिकपणे काम करायचे आहे. विदर्भ राज्य निर्माण करणे इतके कठीण नाही, जितके वाटत आहे. हे जुने आंदोलन आहे. ज्या राजकारणी नेत्यांना जनतेने निवडून दिले आहे, ते जनतेचेच ऐकेनासे झाले आहेत आणि जनता दयनीय जीवन जगात आहे. पुढील बैठक १००० विदर्भवाद्यांची असावी. त्यानंतरची बैठक १०,००० लोकांची असेल. त्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमधून कमीत कमी एक व्यक्ती प्रतिनिधी म्हणून असावा. यातून विदर्भातील ११ ही जिल्ह्यांतील जवळपास १५० लोकांचा वर्किंग ग्रुप (जॉईन्ट अॅक्शन कमिटी) तयार करावा लागेल. ही संस्था सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे चालवावी. प्रथम चरणातील योजनेची अंमलबजावणी ६ ते ९ महिन्यात पूर्ण करावी.

जानेवारी २०२३ पासून खरे आंदोलन सुरू होईल. जून २३ पर्यंत पहिले लक्ष्य आत्मसात करायचे आहे. त्यानंतर डिसेंबर २३ पर्यंत विदर्भाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ३६५ ही दिवस आंदोलन होईल. या विदर्भाच्या चळवळीसाठी प्रत्येक पक्षातील लोकांचे स्वागत आहे. मी विचारपूर्वक हे काम हाती घेतले आहे, ते यशस्वी होईल. विदर्भ राज्य अस्तित्वात येणार, असा आत्मविश्वास आहे”, असे प्रशांत किशोर म्हणाले. २० सप्टेंबरला चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे डॉ. आशिष देशमुख यांनी सुप्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना निमंत्रित केले होते. त्यांची विदर्भातील निवडक विदर्भवादी नेत्यांसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत स्वतंत्र विदर्भाबाबत भूमिका आणि रणनीती मांडली गेली.

गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. मात्र मागणी मान्य होत नाही आहे, उलट विदर्भाचे आंदोलन आता कमजोर पडलं आहे. त्यामुळे या आंदोलनाला पुन्हा गती देण्यासाठी माजी आमदार व विदर्भवादी नेते डॉ. आशिष देशमुख यांनी सुप्रसिद्ध राजकीय रणनीतीकार श्री. प्रशांत किशोर यांची मदत घेतली आहे. मागील ३-४ महिन्यांपासून डॉ. देशमुख हे प्रशांत किशोर यांच्या सतत संपर्कात असून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. विदर्भातील शेतकरी आणि बेरोजगारांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. आर्थिकदृष्ट्या आणि उद्योगधंद्यांसकट सर्वच क्षेत्रात विदर्भ मागेच राहिला आहे. विकासासाठी लहान राज्य चांगले मानले गेले आहेत. त्यामुळे विदर्भाचा विकास व्हावा आणि त्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, यासाठी प्रशांत किशोर यांनी जबरदस्त रणनीती आखली आहे. ही एक नव्याने चळवळ उभी राहणार आहे आणि ही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्यांची रणनीती मोलाची ठरणार आहे.

ही चळवळ विदर्भातील गावा-गावात पोहोचली पाहिजे. स्वतंत्र विदर्भ राज्याचे आंदोलन हे स्केलेबल (सर्व क्षेत्रात प्रमाणानुसार समायोजित), सस्टेनेबल (कायमस्वरूपी) आणि स्ट्रक्चर्ड (संरचित) या तीन बाबींवर आधारित असेल. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. मात्र मागणी मान्य होत नाही आहे, उलट विदर्भाचे आंदोलन आता कमजोर पडलं आहे. विदर्भ हे स्वतंत्र राज्य व्हावे, ही येथील जनतेच्या मनातील इच्छा आहे. यापूर्वी कितीतरी माध्यमांतून ही बाब पुढे आली आहे. विदर्भ हे स्वतंत्र राज्य होण्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी प्रबळ रणनीती गरजेची आहे. युवकांनी व विदर्भप्रेमींनी विदर्भ राज्यासाठी जागृत व्हावे. विदर्भ राज्य हे विकासाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे असून आर्थिक समृद्धीसाठी आम्ही विदर्भ राज्य निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका माजी आमदार व विदर्भवादी नेते डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी या बैठकीत मांडली. यावेळी विदर्भातील अकराही जिल्ह्यांतून विदर्भवादी नेते या बैठकीत सामील झाले होते. त्यांनीसुद्धा आपले मत व सूचना यावेळी सर्वांसमक्ष मांडल्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in