
Akola District Political News : राजकारणातही आपल्याला आता अस्पृश्यतेची वागणूक मिळत असल्याचा संताप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. ट्विटरवरील एका पोस्टच्या माध्यमातून आंबेडकर यांनी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली आहे. (Untouchability has started to be observed in politics)
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय राजकारणावर प्रभाव वाढला आहे. तेव्हापासून सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षसुद्धा राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.
वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत निमंत्रण द्यायला ती काही सत्यनारायणाची पूजा थोडीच होती, असे वक्तव्य महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) केले होते. वडेट्टीवार यांच्या त्या वक्तव्याचाही आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी जर कोणालाही निमंत्रणाची गरज नव्हती, तर काँग्रेस इतर पक्षांना निमंत्रण वाटत का फिरत होती, असा परखड सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला. लालूप्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का, याबद्दल मला शंकाच आहे, असेही आंबेडकर यांनी नमूद केले आहे.
परवा परवा बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना `प्रकाशभाऊ सोबत या, आपण मिळून लढू’, अशी साद विजय वडेट्टीवार यांनी ॲड. आंबेडकर यांना घातली होती. पुढच्या वेळी निमंत्रण नक्की देऊ, असा शब्दही वडेट्टीवारांनी संत गजानन नगरी शेगावमध्ये बोलताना दिला होता. पण त्याबाबत मात्र आंबेडकरांनी भाष्य केलेले नाही.
केवळ ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण दिले नाही, याच मुद्द्यावर आंबेडकर अडकून आहेत. वडेट्टीवारांनी जी साद घातली, त्याला प्रतिसाद ॲड. आंबेडकर यांनी द्यावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यावर मात्र ॲड. प्रकाश आंबेडकर काहीही बोललेले नाहीत. यासंदर्भात ‘सरकारनामा'ने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.