सर्व आमदार हॉटेलात; किशोर जोरगेवार मात्र मंत्रालयात !

आमदार जोरगेवारांनी (MLA Kishor Jorgewar) आज विविध विभागांच्या पाच मंत्र्यांच्या भेटी घेतल्या असून मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रश्नांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले आहे.
सर्व आमदार हॉटेलात; किशोर जोरगेवार मात्र मंत्रालयात !
MLA Kishor Jorgewar and Minister Jayant PatilSarkarnama

नागपूर : राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेता राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीने आपआपल्या आमदारांना मुंबई येथील पंचतारांकित हॉटेलांमध्ये बंदिस्त केले आहे. एकप्रकारे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यातल्या त्यात अपक्ष आमदारांकडे विशेष लक्ष ठेवले जात आहे. मात्र अशातही चंद्रपूर मतदार संघातील अपक्ष आमदार हॉटेलमध्ये नाही तर मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात मंत्र्यांच्या भेटी घेत असल्याचे दिसून आले आहे.

आमदार जोरगेवारांनी (MLA Kishor Jorgewar) आज विविध विभागांच्या पाच मंत्र्यांच्या भेटी घेतल्या असून मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रश्नांकडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रथेला यावेळी बगल देत भाजप आणि शिवसेनेने (Shivsena) उमेदवार उभे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे. अधिकाधिक संख्येने अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. अशात मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराची शक्यता दोन्ही पक्षांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा संभावित धोका टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपआपल्या आमदारांना मुंबईतील (Mumbai) हॉटेलमध्ये ठेवले आहे.

हॉटेलमध्ये घडत असलेल्या घडामोंडीवर सदर पक्षांतील वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. मात्र अशातही चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा मतदार संघातील प्रश्नांसाठी मंत्रालयात मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्याला अधिक महत्व दिले. त्यामुळे सर्व आमदार हॉटेलमध्ये नजरकैदेत असताना अपक्ष आमदार मंत्रालयात कसे काय, हा विषय चर्चेचा ठरला आहे. आज त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत त्यांनी वर्धा नदीवरील धानोरा बॅरेजची तात्काळ निर्मिती करण्यासंदर्भात चर्चा केली. हा विषय मार्गी लावण्यासाठी बैठक लावण्याची विनंतीही यावेळी आमदार जोरगेवार यांनी जयंत पाटील यांना केली. यावर लवकर बैठक लावण्याचे निर्देश जयंती पाटील यांनी संबंधित विभागाला दिले आहे.

चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी २० कोटी रुपये निधी देण्यात यावा, मा. सा. कन्नमवार बॅटमिंटन कोर्टसाठी ५ कोटी रुपये आणि विसापूर येथील क्रीडा संकुलाच्या विकासासाठी अतिरिक्त 9 कोटी रुपये देण्यात यावे. तसेच घुग्घूस येथे क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी क्रीडामंत्री सुनील केदार यांची भेट घेतली. यावेळी सुनील केदार यांनीही सदर सर्व विषयांसंदर्भात बैठक लावण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक लावण्यात यावी तसेच मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली.

MLA Kishor Jorgewar and Minister Jayant Patil
Video: पाणीपुरवठा ठप्प, आमदार जोरगेवार संतापले...

अशोक चव्हाण यांच्या सोबत आमदार किशोर जोरगेवार यांची सकारात्मक चर्चा झाली असून सदर मागणी संदर्भात बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी संबोधित विभागाला दिले आहे. चंद्रपूर शहरात प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर योग्य उपाययोजना करण्यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांचीही आज मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली आहे. शिवभोजनची संख्या वाढविण्यात यावी, सुरू असलेल्या शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in