Akola Riots Analysis : पहिला दगड झेलणारे पोलिसच होते, अन् आता मदतीच्या नावावर राजकीय वर्चस्वाची स्पर्धा !

Politics : राजकीय पोळी शेकून घेणाऱ्यांनी त्याला जे खतपाणी घालायचे ते घातलेच.
Akola
AkolaSarkarnama

Akola city Riots News : अकोला शहर तसं फारच संवेदनशील. येथे कोणत्या कारणावरून सामाजिक सौख्य बिघडले याचा नेम नाही. त्याला खतपाणी घालणारे राजकीय नेते आणि सांत्वन व मदत करणारेही राजकीय नेतेच. शनिवारी (ता. १३) रात्री दोन समाजांत उफाळून आलेल्या वादानंतरही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाचा शिमगा केलाच. (It is a competition for political supremacy)

राजकारण्यांच्या या शिमग्यात, सर्व भानगडींत नाहक बळी गेलेल्या निष्पाप विलास गायकवाड यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी राजकीय पक्ष पुढे आले. ही बाब कौतुकास्पद आहेच. मात्र, ज्या प्रकारे मदतीचा ओघ राजकीय पक्षांकडून सुरू आहे, ते बघता ही खरोखरच मदत आहे की, मदतीच्या नावावर केवळ राजकीय वर्चस्वातून सुरू असलेली स्पर्धा आहे, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

एक घटना, जी टाळता येण्यासारखी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली खदखद शनिवारी रात्री उफाळून आली. राजकीय पोळी शेकून घेणाऱ्यांनी त्याला जे खतपाणी घालायचे ते घातलेच. त्यानंतर राजकीय शिमगाही झाला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. उपमुख्यमंत्र्यांपर्यंत त्याची झळ पोहोचली. मात्र, जी घटना घडली, ती पुन्हा घडू नये म्हणून कुणीही पुढाकार घेऊन काम करताना दिसले नाही.

पोलिसांकडूनही चूक झालीच. मात्र, त्यानंतर परिस्थिती हाताळताना पहिला दगड माथ्यावरून झेलणारे पोलिसच होते. तेथे कुणी राजकीय पुढारी पुढे आला नाही. घटना होऊन गेली आणि त्यात एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला. त्याचे कुटुंब उघड्यावर आले. त्यांना तातडीने धीर देण्याची गरज होतीच, ती राज्य शासनाचे कर्तव्य म्हणून दिलीही गेली. मात्र, त्यासोबतच राजकीय पक्षांमध्ये मदतीसाठी सुरू झालेली स्पर्धा ही राजकीय श्रेयवादाची स्पर्धा होऊ नये.

Akola
Akola riots : ठाकरे गटाने घेतली मृत विलास गायकवाडच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी…

खरोखरच पीडित कुटुंबाला आधार होईल, या दृष्टीने मदत होणे गरजेचे आहे. आता माहौल गरम आहे, तेव्हा दोन दिवस मदतीसाठी सर्वच पुढे येतील, मात्र, संपूर्ण संसाराचा डोलारा पीडित कुटुंबालाच सांभाळावयाचा आहे. पुढे संपूर्ण आयुष्य पडले आहे. मुलींच्या शिक्षणाची, त्यांच्या लग्नाचीही चिंता आहे, मुलगा लहान आहे. त्यालाही शिकवून पायावर उभे करण्याची जबाबदारी पीडित कुटुंबातील त्या एकट्या माउलीला उचलावी लागणार.

नाही म्हणायला मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी राजकीय नेत्यांनी (Political Leaders) स्वीकारली आहे. मोठ्या मुलीच्या लग्नाचा भारही शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते उचलणार आहेत. ही बाब कौतुकास्पदच आहे. मात्र, साप गेल्यावर काठी मारण्याचा हा प्रकार आहे. अशा घटना घडूच नये, सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, यासाठी खतपाणी कुणी घालणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याची खरी गरज आहे.

Akola
Akola APMC Election Analysis : राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसला तोड मिळाला, वंचितचा सहकारात शिरकाव !

राजकीय स्वार्थाची पोळी शेकू नये !

अकोला (Akola) शहरात शनिवारी घडलेला प्रकार संतापजनकच होता. या पूर्वनियोजित घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आरोप-प्रत्यारोप होत आहे. त्यात कोण खरं आणि कोण खोटं, हे ठरविण्याची गरज नाही. मात्र, अशा संतापजनक घटनांमधून राजकीय स्वार्थाची पोळी शेकून घेण्याचे प्रकार राजकीय पक्षांनी करू नये, अशी अपेक्षा येथील सर्वसामान्य नागरिकांची आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in