
नागपूर : मला सांगण्यात आलं आहे की विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. धरणाच्या बॅक वॉटर मुळे रस्ते बंद झाले, शेतांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी सांगितले म्हणून विश्वास न ठेवता मी स्वतः पाहून सगळी परिस्थिती जाणून घेणार आहे आणि त्यानंतर सगळे विरोधक बसून सभागृहात प्रश्न मांडणार आहोत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार आज येथे म्हणाले.
अजित पवार (Ajit Pawar) यांचा गडचिरोली दौरा आज सुरू झाला. पहाटे ते नागपुरातून (Nagpur) गडचिरोलीसाठी (Gadchiroli) रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री (Chief Minister) व उपमुख्यमंत्र्यांनी (Deputy Chief Minister) मदत करतो, असे सांगितले. पण फक्त सांगून काही होणार नाही, तर ते कृतीत उतरवायला पाहिले. किमान पावसाळ्यात तरी शेतकरी आत्महत्या करत नाहीत, मात्र आज ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरळ मदत करावी अशी मागणी अजिदादांनी केली आहे.
राज्यातील अतिवृष्टीबाबत बोलताना पवार म्हणाले, पहिली पेरणी वाया गेली आहे, दुबार पेरणीचे संकट आहे. शेतातील रोपे गळून गेली आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूल वाहून गेले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडचिरोलीत आले होते, मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या आतील भागांत जाऊ शकले नाही. एवढ्या दिवसांत जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसडीआरएफचे निकष बाजूला ठेऊन आम्ही मदत करत होतो. गेल्या काही दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. खासकरून मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे.
मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे. मात्र हे शक्य नाही. प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे कडे जाणार असेल तर ते शक्य नाही. त्यांना एवढं मोठं बहुमत मिळाल आहे, त्यांनी ते विधानसभेत दाखविले ही आहे. मग मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही? आजही मी काही मुद्द्य़ांबद्दल मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना विचारले मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही. ते म्हणाले आम्ही करतो. मात्र ते विस्तार करतो, असे म्हणत असले तरी ते होत नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. कदाचित त्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नसावी, की इतर काही समस्या आहे, हे माहीत नाही, असे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना पवार म्हणाले.
लवकर अधिवेशन बोलवा, अशी आमची मागणी होती. मात्र, ते ही बोलावले जात नाही आहे. त्यामुळे जशी मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, तशी मदत मिळताना दिसत नाही. माझी अशी ऐकीव माहिती होती की मुख्यमंत्री काल दिल्लीत जाणार होते. मात्र ज्यांना त्यांना भेटायचे होते, कदाचित ते उपलब्ध नव्हते, अखेर दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पहायचा असतो. त्यामुळे त्यावर आम्ही टीका करण्याचे कारण नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या बाबतीत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.
उद्धव ठाकरे यांनी एकीकडे मुलाखत द्यायची आणि त्याला मग उत्तरे दिली जातात. यातून राज्याचे प्रश्न सुटणार नाही ही वस्तुस्थिती आहे. सत्ता बदल होताना मोठ्या प्रमाणावर आश्वासन देण्यात आली. त्याची पूर्तता करणे कठीण होत आहे म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होत नाही का? भाजपकडे ११५ आमदार आहेत भाजप कार्यकारिणीमधील रोख लक्षात घेतला तर आमदारांनी त्यागाची भावना ठेवा, असे सांगण्यात आले आहे. तिकडे शिंदे गटातूनही कोण मंत्री होणार कोण राज्यमंत्री होणार, असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे विस्तार होत नसावा, असे अजित पवार म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.