Ajit Pawar यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बॅनर नाही, कॉंग्रेसच्या खासदाराची तऱ्हाच न्यारी..

अजित पवारांना (Ajit Pawar) आज गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी कॉंग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर व वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यालयात भेट दिली.
Ajit Pawar, Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar
Ajit Pawar, Balu Dhanorkar and Pratibha DhanorkarSarkarnama

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात व शहरात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा दौरा असताना काँग्रेस पक्षाच्यावतीने पवार यांच्या स्वागतासाठी मोठी बॅनरबाजी केली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसने या दौऱ्याबाबत कुठलीही बॅनरबाजी केली नाही. मात्र काँग्रेस खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या बॅनरबाजीने शहरात विविध चर्चांना ऊत आलाय.

यासंदर्भात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना विचारले असता 'मी भपकेबाज गोष्टींवर भर देत नाही' असे मत त्यांनी व्यक्त केले. या राज्यातील जनतेच्या मूळ समस्या सुटल्या पाहिजेत, याकडे तुम्ही व आम्ही लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. धानोरकर दांपत्याच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अटकेतील नेते माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या मुलाचे देखील छायाचित्र असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या महिनाभरापासून पाऊस विदर्भाला झोडपतो आहे. या पावसाने शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी कॉंग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) व वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Prathbha Dhanorkar) यांच्या कार्यालयात भेट दिली.

यावेळी धानोरकर दाम्पत्याने जिल्ह्यातील पूर परिस्थितीची इत्थंभूत माहिती अजित दादांना (Ajit Pawar) दिली. या अतिवृष्टीने झालेले नुकसान, त्याचे होणारे दूरगामी परिणाम आणि करावयाच्या उपाययोजना यावर या नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. खासदार व आमदार धानोरकर यांनी केलेल्या सूचना शासन दरबारी मांडून पूरग्रस्तांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी ७५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मोठी मागणी शासनाकडे मांडणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी भगवान गौतम बुद्धांची लाकडी कोरीव प्रतिमा अजित दादांना भेट देण्यात आली. सोबतच विविध विषयावर चर्चा केली. खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश वारजूरकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रय, शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संगीता अमृतकर, शहर महिला जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, काँग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवार, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, बल्लारपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, मेघा भाले, सुनीता लोढीया, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, सुनीता अग्रवाल, चंद्रपूर तालुका अध्यक्ष शामकांत थेरे, सेवादल महिला अध्यक्ष स्वाती त्रिवेदी, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अनु दहेगावकर, अश्विनी खोब्रागडे, सुनील पाटील, माजी नगरसेवक प्रशांत दानव, राज यादव, सौरभ ठोंभरे यांची उपस्थिती होती.

Ajit Pawar, Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar
आदिवासींसाठी सरसावले बाळू धानोरकर; म्हणाले, स्वतंत्र रेजिमेंट निर्माण करा...

याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्याचीही पाहणी केली. धानोरकर दाम्पत्यांनी पूर परिस्थितीवर केलेल्या सूचना तात्काळ शासन दरबारी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याकरिता देखील त्वरित निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पडू, असे अजित पवार यावेळी म्हणाले. हे सर्व ठिक असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते अजित पवार यांच्या स्वागतासाठी चंद्रपुरात राष्ट्रवादीचा एकही नेता पुढे नाही, मात्र कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी हिरीरीने पुढाकार घेतला. याची चर्चा रंगली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in