Monkey : कृषी अधीक्षकाचे माकड प्रेम : अंत्यविधी केला, शेंदूर फासला अन् आता श्राद्धही घालणार...

Chandrapur : अपघातात मृत पावलेल्या माकडाचा कार्यालयाच्या परिसरात अंत्यविधी केला.
Chandrapur
ChandrapurSarkarnama

Superintendent of Agriculture News : संविधानाने प्रत्येकाला आपला धर्म आणि श्रद्धा पाळण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचे वैयक्तिक पातळीवर अनुसरण करावे, असेही सुचविले आहे. मात्र येथील जिल्हा कृषी अधीक्षकांनी संविधानाच्या मूळ तत्वालाच नख लावण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर अपघातात दगावलेल्या माकडाला या अधीक्षकांनी शासकीय कार्यालयाच्या परिसरात विधिवत दफन केले. त्यावर दगड ठेवून शेंदूरही फासला. आता मंदिर बांधण्याची तयार सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत या माकडाचे श्राद्ध घालण्याचे प्रयोजनही आहे. यासाठी सहकारी कर्मचाऱ्यांकडून वर्गणीसुद्धा उकळली जात असल्याची चर्चा आहे.

यासंदर्भात कृषी अधीक्षक भाऊसाहेब वराटे यांना विचारले असता, ‘अपघातात मृत पावलेल्या माकडाचा (Monkey) कार्यालयाच्या परिसरात अंत्यविधी केला. वन्यप्राण्यांना सन्मान देण्याचा हेतू यामागे आहे’, असे त्यांनी सांगितले. २९ नोव्हेंबरला वराटे नागपूर (Nagpur) येथून चंद्रपूरला (Chandrapur) येत असताना वरोरा नजीक मार्गावर एक माकड अपघातात मृत झाल्याचे दिसले. दोन किलोमीटर समोर आल्यानंतर वराटे यांची भूतदया जागृत झाली. त्यांनी आपले चारचाकी वाहन माघारी फिरविले. मेलेले माकड वाहनात टाकून त्यांनी थेट कृषी अधीक्षक कार्यालय गाठले. रात्री नऊ वाजताच्या सुमाराला त्यांनी माकडाला विधिवत दफन केले. त्यानंतर त्यावर एक दगड ठेवून शेंदूर फासला.

एवढ्यावरच वराटे थांबले नाही. माकडाच्या समाधीवर दिवा लावण्याची जबाबदारी एका कर्मचाऱ्यावर दिली आहे. रोज रात्री या समाधीवर दिवा लावण्याचे काम एक कर्मचारी नित्यनेमाने करीत आहे. ज्या परिसरात माकडाचे दफन करण्यात आले. तो कृषी संशोधन केंद्राचा परिसर आहे. आधुनिक शेतीसंदर्भात येथे वेगवेगळे प्रयोग केले जातात. कृषी अधीक्षकांच्या या प्रयोगाने काही कर्मचाऱ्यांचे डोके चक्रावले आहे. साहेब इथपर्यंत थांबतील, असे समजून कर्मचाऱ्यांनी झाला प्रकाराची कुठे वाच्यता केली नाही. परंतु प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच माकडाच्या दफनविधीला पाय फुटले.

Chandrapur
Dhanorkar : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीवरील स्थगिती कायम..

काल वराटे यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. नेहमी सारखीच बैठक असेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती. मात्र वराटे यांना पुन्हा माकडाचा विषय कर्मचाऱ्यांसमोर ठेवला. माकडाला श्राद्ध घालायचे आहे. त्यासाठी वर्गणी गोळा करू, असा प्रस्ताव त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर ठेवला. साहेबांचाच आदेश असल्याने एकही कर्मचारी विरोध करू शकला नाही. येत्या दोन दिवसांत माकडाच्या श्राद्धाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर भव्य मंदिरसुद्धा या शासकीय परिसरात बांधण्याची साहेबांची इच्छा आहे, अशीही चर्चा आहे. सध्या साहेबांचे माकड प्रेम कृषी विभागात चर्चेचा विषय झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com