विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर भंडाऱ्याच्या वाट्याला एक मंत्रिपद येणार ?

महामंडळ अध्यक्षाला राज्य मंत्र्यांचा दर्जा असतो. लवकर अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या (MLA Narendra Bhondekar) रूपाने जिल्ह्याला हे पद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर भंडाऱ्याच्या वाट्याला एक मंत्रिपद येणार ?
MLA Narendra Bhondekar with Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : ज्यासाठी भंडारा (Bhandara) जिल्हावासी आतुरतेने वाट बघत होते, तो प्रसंग भंडारा जिल्हावासियांच्या वाट्याला येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर भंडारा जिल्ह्याला राज्यमंत्री दर्जाचे पद मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

येत्या काही दिवसात भंडाऱ्यात मंत्र्याची गाडी पाहायला मिळणार आहे. येत्या २० जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीनंतर भंडारा जिल्ह्याला ही मंत्रीपदाची लॉटरी लागणार आहे. अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांना ही लॉटरी लागणार असल्याचे सूत्र सांगतात. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत राहण्यासाठी महामंडळाची ऑफर त्यांना देण्यात आली असल्याची माहिती आहे. या अपक्ष आमदार (MLA) महोदयांना विदर्भ पाटबंधारे महामंडळ मिळणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले असल्याचेही सांगण्यात येते. महामंडळ अध्यक्षाला राज्य मंत्र्यांचा दर्जा असतो. लवकर अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या रूपाने जिल्ह्याला हे पद मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप-सेना युतीच्या उमेदवाराला न जुमानता भंडारा- विधानसभा क्षेत्रासाठी अपक्ष आमदार म्हणून निवडणूक लढविली. यात त्यांनी आमदार पदाची माळ गळ्यात पाडून घेतली. मी अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढविली असली तरीही मी अजूनही शिवसेनेत असल्याचे भोंडेकर नेहमीच बोलत असतात. आज सकाळीही त्यांनी माध्यमांना तशी माहिती दिली. महाविकास आघाडी सरकार तयार झाले तेव्हा पक्षासोबत प्रामाणिक राहिल्याची परतफेड म्हणून मंत्रिपद मिळेल, अशी आशा भोंडेकर यांना होतीच. मात्र तेव्हा त्यांचा हिरमोड झाला होता. त्या काळात शिवसेना नेत्यांशी त्यांनी दुरावा निर्माण केला होता.

राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांचे महत्व वाढू लागल्याने अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकरांना अच्छे दिन येऊ लागले आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारचे मित्र असलेल्या अपक्ष आमदारांची मते फुटली होती. त्याचा धसका महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यातही शिवसेनेला संजय पवार यांचा पराभव जिव्हारी लागला आहे. विशेष म्हणजे राज्यसभा निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर यांचे मत फुटल्याचा आरोपही झाला. त्यामुळे शिवसेनेने आपल्या पक्षाशी समर्पित असलेल्या आमदारांना जवळ करण्यात सुरुवात केली. नाराज अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांना चक्क विदर्भ पाटबंधारे महामंडळाची ऑफर दिली गेली आहे. त्यामुळे भोंडेकर यांच्या रूपाने भंडारा जिल्ह्याला लवकरच राज्यमंत्री दर्जाचे पद मिळणार आहे.

MLA Narendra Bhondekar with Uddhav Thackeray
विधानपरिषद निवडणूक : सर्वच पक्ष संपर्क साधत आहेत, पण मी शिवसेनेसोबतच...

भंडारा जिल्ह्यात एक तरी मंत्री पद असावे, ही इच्छा जिल्हावासियांची होती. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर नानाच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद भंडारा जिल्ह्याच्या वाटेला येईल, अशी चर्चा होती. मात्र शक्यता आता जवळपास मावळली आहे. प्रदेशाध्यक्ष स्वतः मंत्री पद मिळवू शकले नाही. तर इतर आमदार काय मिळविणार, हाच विचार लक्षात घेत महाविकास आघाडी सरकारमध्ये भंडाऱ्याला मंत्री पद मिळणार नसल्याची खात्री जिल्हावासियांना झाली. पण आता अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या रूपाने पुन्हा जिल्हावासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महामंडळ तर महामंडळच सही. जिल्ह्यात राज्यमंत्री दर्जाचे पद मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. उशिरा का होईना विधान परिषद निवडणुकीनंतर भोंडेकर यांना लॉटरी लागणार, हे जवळपास निश्‍चित असल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in